Success Story: गूळ चहा, पूरण प्रीमिक्सने वाढला गोडवा

Small Business Success: सोलापूरमधील सौ. पल्लवी धनराज वाले यांनी आले, गवती चहा, मसाला, वेलदोड्याच्या चवीचा गुळाचा चहा आणि पुरणाच्या प्रीमिक्स निर्मितीतून प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली आहे.
Pallavi Dharaj Vale
Pallavi Dharaj ValeAgrowon
Published on
Updated on

सुदर्शन सुतार

Food Industry Innovation: सोलापुरातील सौ. पल्लवी वाले आणि त्यांचे पती धनराज हे दोघेही बी.कॅाम पदवीधर आहेत. धनराज हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. पल्लवी यांच्या माहेरची परिस्थिती जेमतेम होती. त्यांना शिकून स्वतःचा पूरक उद्योग करायची इच्छा होती. परंतु आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने बारावीच्या पुढे शिक्षण घेणे शक्य नव्हते. लग्नानंतर त्यांना पुढे शिकायचे होते, यास पती धनराज यांनी चांगला पाठिंबा दिला. अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासह पूरक व्यवसायासाठी पाठबळ दिल्याने आत्मविश्‍वास वाढला.

पल्लवीताईंनी घरसंसार सांभाळत, बीकॉमची पदवी घेतली. त्यानंतर किराणा दुकान, मेस डबे या सारख्या व्यवसायात स्वतःला पारखून पाहिले. यामध्ये पती धनराज यांच्यासह मुलगा मयूर, मुलगी प्राची यांचे चांगले सहकार्य मिळू लागले. त्यामुळे न थकता त्या सात्यत्याने कष्ट करत राहिल्या. पण नशीब साथ देत नव्हते, तरीही सतत नवीन प्रयोग त्या करत राहिल्या. गेल्या चार वर्षाच्या प्रवासातून गूळ चहा प्रीमिक्स आणि पूरण प्रीमिक्स उत्पादनातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

विविध व्यवसाय करून झाल्यानंतर, पल्लवीताईंनी व्यावसायिकदृष्ट्या शिवणकामामध्ये मोठा हातखंडा मिळवला. त्यात त्यांना चांगले पैसेही मिळू लागले होते. पण पुढे कोरोनाने त्यांची वाट अडवली, त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. पुन्हा एका व्यवसायात त्यांना माघार घ्यावी लागली, तरीही त्यांचा नावीन्याचा शोध सुरूच राहिला, म्हणतात ना, संकटे हीच कधीकधी संधी घेऊन येतात, त्याप्रमाणे तयार प्रक्रिया उत्पादनामध्ये मोठे मार्केट आणि संधी आहे, हे त्यांनी ओळखले.

Pallavi Dharaj Vale
Agrowon Newspaper Success Story: तयाचा वेलू गेला गगनावरी!

विशेषतः आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गुळाच्या चहा उत्पादनात त्यांनी उतरायचं ठरवलं. यू-ट्यूबसह अनेक सोशल मीडियावर माहिती घेत, व्हिडिओतून त्यांनी उत्पादनाची माहिती घेतली. सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामधील विषय विशेषज्ञ सौ. अनिता सराटे-शेळके यांच्याकडून प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन घेतले. स्वतः बाजारपेठेचा अभ्यास केला आणि २०२२ मध्ये त्यांनी गूळ चहा प्रीमिक्स निर्मितीस सुरुवात केली.

विविध स्वादांचा चहा

पल्लवीताईंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत गुळापासून चहा प्रीमिक्स पावडर बनवायला सुरुवात केली. यामध्ये रसायन अवशेष विरहित गूळ पावडर वापरली जाते. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी आले गूळ चहा पावडर, मसाला गूळ चहा पावडर, वेलदोडा गूळ चहा पावडर, गवती चहा गूळ पावडर आणि हॉट कॅाफी गूळ पावडर अशी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ग्राहकांना चवीसाठी मोफत चहा प्रीमिक्स दिले. साखरेच्या तुलनेत गूळ चहा प्रीमिक्सचे महत्त्व पटवून दिले. ग्राहकांना उत्पादनाची चव आवडल्याने मागणी वाढू लागली.

चहासाठी फक्त दूध, पाणी आणि गूळ प्रीमिक्स पावडर लागते. दुसरा कुठलाही गूळ वापरला, तरी चहा फुटतो. पण या गूळ प्रीमिक्स पावडरने चहा अजिबात फुटत नाही. चहा तयार करण्यासाठी अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध आणि दोन चमचे गूळ चहा पावडर हे प्रमाण आहे. या प्रमाणानुसार मिश्रण करून गॅसवर उकळवले की पाच मिनिटांत चहा तयार होतो. याचबरोबरीने त्यांनी शेवगा, आवळा, बीटपासून हेल्थ ड्रिंक पावडर तयार केली आहे.

पौष्टिक बिस्किटांची निर्मिती

गुळाचा चहा, पुरणाच्या प्रीमिक्ससह पल्लवीताईंनी पौष्टिक आणि आरोग्यदायी मिलेट बिस्किटे बनवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केला आहे. ज्वारी, गहू, नाचणीची मऊ, कुरकुरीत आणि चवदार बिस्किटांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

Pallavi Dharaj Vale
Agriculture Success Story: तामशीने मिळवली प्रगतिशील शेतीत ओळख

उत्पादनांना वाढती मागणी

गूळ चहा प्रीमिक्स, पुरण प्रीमिक्ससह मिलेट्‌सच्या बिस्किटांना सोलापूर, मुंबई, पुण्यासह विविध शहरांतून व्यक्तिगत ग्राहकांची मोठी मागणी आहे. त्याशिवाय छोटी हॅाटेल्स, कॅफे, कॅन्टीनमध्ये त्यांच्याकडील गूळ चहा प्रीमिक्स पावडरची विक्री होते. चहाचे २०० ग्रॅम पाकिट ८० रुपये आणि ४०० ग्रॅम पाकिटाचा दर १५० रुपये आहे.

गूळ, तूप आणि ज्वारी, गहू, नाचणीपासून तयार केलेले बिस्किटाचे २०० ग्रॅम पाकिटाची १०० रुपये दराने विक्री होते. दरमहा ७०० किलो गूळ चहा प्रीमिक्स आणि ५० किलो बिस्किटांची विक्री होते. याचबरोबरीने पुरण प्रीमिक्स, कट आमटी प्रीमिक्सची चांगली विक्री होते. चहा प्रीमिक्स सहा महिने आणि पूरण प्रीमिक्स हे तीन महिने टिकते. स्वतः पल्लवीताई प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात.

तयार केला ब्रॅण्ड

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून पल्लवीताईंनी ड्रायर, मिक्सर, आटा चक्की, ओव्हन आणि पॅकेजिंग यंत्रणा खरेदी केली. यासाठी त्यांना सुमारे साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राने याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. यांत्रिकीकरणामुळे प्रक्रिया उद्योगाचे काम सोपे आणि कमी वेळेत होऊ लागले आहे. बाजारपेठेत उत्पादनांची स्वतंत्र ओळख होण्यासाठी त्यांनी ‘वाले फूड्‌स’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे.

पुरणासह कटाच्या आमटीचा प्रीमिक्स

पुरण पोळी हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा पदार्थ आहे. पण तो थोडासा अट्टहासाचा आणि काहीसा कौशल्याचा भाग असल्याने पल्लवीताईंनी चहा पावडर प्रमाणे पुरणाचेही खास प्रीमिक्स तयार केले. हरभऱ्याची डाळ शिजवून त्यामध्ये हळद, वेलदोडा आणि गूळ मिसळला जातो. त्यानंतर यंत्राच्या माध्यमातून या मिश्रणाची प्रीमिक्स पावडर तयार केली जाते. या प्रीमिक्सपासून केवळ पाच मिनिटांत पुरणाची पोळी तयार होऊ शकते.

पुरणपोळी तयार करण्यासाठी एका भांड्यात पुरणाचे प्रीमिक्स घेऊन, त्यात थोडे कोमट पाणी ओतून ते एकजीव करायचे, त्यानंतर पाच मिनिटे झाकून ठेवायचे. पुढच्या पाच मिनिटांत हे पुरण पोळीसाठी तयार होते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी कटाच्या आमटीचे प्रीमिक्स बनवले आहे. पुरणाच्या १ किलो प्रीमिक्समध्ये ४० पोळ्या तयार होतात. १०० ग्रॅम कट आमटीच्या प्रीमिक्समध्ये अर्धा लिटर आमटी तयार होते.

सौ. पल्लवी वाले ७०२८७८००३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com