
Global Jackfruit Day : चार जुलै हा जागतिक फणस दिन म्हणून ओळखला जातो. विविध खंड व देशांमध्ये फणस उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील कोकणाची देखील आंबा, काजू, सुपारी, नारळ आदींच्या बरोबरीने फणसासाठी प्रामुख्याने केली जाते. वरून काटेरी, आतून मधाळ असेच वर्णन फणसाचे केले जाते.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हे किंवा एकूणच पट्ट्यात त्याची स्वतंत्र लागवड कुणी करीत नाही, परंतु प्रत्येकाच्या घरासमोर शेकडो वर्षांपासून जोपासलेली फणसाची झाडे दिसून येतात. झाड वयानुसार ५० फळांपासून १०० ते १५० फळांपर्यंत उत्पादन देते. पूर्वी फणसाला तेवढी बाजारपेठ नव्हती. मात्र अलीकडील काळात प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळाल्याने त्याची मागणी वाढली आहे.
फणसाचे प्रकार
एप्रिल ते जूनपर्यंत फणसाचा मुख्य हंगाम चालतो. एप्रिलपासून कोकणी माणसाच्या आहारात त्याची भाजी दिसू लागते. डिसेंबर, जानेवारीच्या सुमारास तयार होणाऱ्या कोवळ्या फणसांचाही वापर भाजीसाठी होतो. फणसामध्ये कापा आणि रसाळ (बरका) असे दोन प्रकार आहेत. कापा फणस पिकल्यानंतर जास्त दिवस टिकून राहतो.
रसाळ फणस अत्यंत कमी टिकतो. त्यामुळे दूरवरील पाठवणुकीसाठी कापा फणसालाच पसंती दिली जाते. अलीकडील काळात बदलत्या वातावरणामुळे विविध पिकांवर किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
फणसात शक्यतो कोणता प्रादुर्भाव होत नाही. शेणखत, कीडनाशकांच्या फवारण्या यांचे नियोजन करण्याचीही गरज भासत नाही. कोकणात पूर्वी फणसाच्या स्थानिक जातीच पाहायला मिळायच्या अलीकडील वर्षात विविध जातींवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. काहींनी व्हिएतनाम जातीची तर काहींनी नीर फणसाची लागवड केली आहे.
आठळ्यांचा वापर
पिकलेल्या फणसाच्या बीवर म्हणजे आठळ्यांवर विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. त्यातील घटकांची चिकित्सा केली जात आहे. बी काढून योग्य पद्धतीने वाळवून ठेवली जाते. ती टिकून राहावी यासाठी चिखलमातीचा लेप देण्याची पद्धत आहे. पावसाळ्यात विविध वेलांच्या तुऱ्याची भाजी केली जाते. त्यामध्ये फणसाच्या बीचा वापर होतो. बटाटा आणि फणस बी यांची एकत्रित भाजी देखील बनविली जाते.
विविध उत्पादने
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक उद्योजक फणसावर प्रकिया करू लागले आहेत. त्यावर आधारित उत्पादनांना
बाजारपेठही चांगली आहे. यात कोवळ्या फणसाची भाजी, तयार गऱ्यांची भाजी, उकडलेल्या आठळ्या, उपवासासाठी वेफर्स, तळलेले गरे आदी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा समावेश होतो. अलीकडील काळात प्रक्रिया उद्योगात आंब्याप्रमाणे फणसाच्या पल्पची नव्याने भर पडली आहे.
कोकण वगळता अन्यत्र वटपौर्मिमेला फणसाला मोठी मागणी असते. कोकणातील प्रत्येक गावातून ट्रक, टेम्पो भरून फणस मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर यासह विविध शहरांत पाठवले जातात. या काळात कापा फणसाचा किरकोळ दर ३०० ते ४०० रुपये असतो. मात्र शेतकऱ्याला प्रति नग ५० ते १०० रुपये किंवा त्यापेक्षाही
कमी दर मिळतो. या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
प्रकियेमुळे वाढणार मागणी
कोकणात अधिकतर फणस खाण्यासाठीच वापरला जातो. त्यापासून फारसे आर्थिक उत्पन्न मिळेल अशी स्थिती कधीच नव्हती. मात्र कोकणात फणसावर आधारित प्रकिया उद्योग उभे राहू लागल्याने व अनेकांना रोजगार मिळू लागल्याने फणसाचे महत्त्व वाढू लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड दहिबाव येथील श्रीधर ओगले, न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील अक्षय काकतकर हे उद्योजक रेडी टू इट, रेडी टू कूक अशा संकल्पनेतुन विविध उत्पादने तयार करतात. नाडण (ता.देवगड) येथील गीताजंली वेलणकर यांनी तयार गऱ्यांची भाजी ‘रेडी टू इट’ स्वरूपात बाजारात उपलब्ध केली आहे. माणगाव येथील डॉ. हेडगेवार प्रकल्पात फणस पोळीपासून मोदकापर्यंत विविध उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे भविष्यात फणसाला मागणी वाढणार हे निश्चित.
पल्पमुळे बारमाही हंगाम
आंबा किवा अन्य फळांचे पल्प लोकप्रिय आहेत. मात्र डेगवे येथील प्रकिया उद्योजक नारायण गावडे यांची कन्या सिद्धीने अथक प्रयत्नांतून फणसाचा पल्प बाटलीबंद करण्यात यश मिळविले. त्यामुळे आतापर्यंत केवळ मे महिन्यात फणसपोळी तयार केली जायची. आता पल्प साठवणूक करून ठेवता येत असल्याने बारमाही पोळी तयार करणे शक्य झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.