
Shriwardhan News : कोकणचा मेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या फणसाची या हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाली आहे. कापा आणि बरका या दोन जातींचे पीक समाधानकारक आल्याने खवय्यांची चंगळ होणार आहे.
उष्ण व दमट हवामान फणस पिकास मानवते. तसेच डोंगर उतारावरील तांबडी माती व वाडीमधील काळ्याभोर मातीत या झाडांची चांगली वाढ होते. पूर्ण वाढ झालेल्या एका झाडावर दरवर्षी हंगामातील चार महिन्यांत दीडशे ते दोनशे फणस येतात. वरून काटेरी, ओबडधोबड आकारातील फणसामध्ये कापा व बरका या दोन जाती आढळतात.
यातही कापा फणसाला मागणी जास्त असते, तर बरका फणसाला कमी मागणी आहे. सद्यःस्थितीत श्रीवर्धन तालुक्यात फणसाचे उत्पादनक्षम क्षेत्रफळ हेक्टरी १७.८९ इतके आहे. पिकलेल्या कापा फणसाचे गरे पिवळसर, कोरडे, चविष्ट तर बरका फणसाचे गरे मऊ, तंतूमय, चवीला मधुर पण उग्र स्वादाचे असतात.
कापा फणस खाण्यासाठी योग्य असल्याने त्याला बाजारात एका नगास आकारमानानुसार दोनशे ते पाचशे रुपये इतका भाव आहे. बरका फणसाचे गरे तंतूमय असल्याने बाजारात या जातीला कमी प्रमाणात मागणी आहे. सध्या तालुक्यातील माल मोठ्या प्रमाणात राज्यासह परराज्यात विक्रीसाठी जात असल्याने शेतकरीवर्गाला लाभ होत आहे.
घरोघरी फणसाची भाजी
कोवळ्या फणसाचे चिवड (काटेरी सालं) काढून आतील गरा व आठळी (बी) चिरून फोडणीस टाकतात. या वेळी फोडणीत वालाचे दाणे, शेंगदाणे, हरभरा, चवळी टाकत चविष्ट फणसाची भाजी केली जाते. उपवासाला ही वेगळ्या पद्धतीने फणसाची भाजी केली जाते. फणसाचा हंगाम हा चार महिन्यांचा असल्याने सध्या घरोघरी फणसाची भाजी केली जाते. कोवळ्या फणसाचे गरे चिरून ते खोबरेल तेलात तळले जातात.
पाडेकरी दुर्मिळ झालेत
पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून हंगामातील चार महिन्यांत पिकलेले दीडशे ते दोनशे फणस निघतात. सध्या फणसाच्या झाडावर चढून फणस उतरवण्यासाठी पाडेकरी मिळेनासे झाले आहेत. जे मोजके पाडेकरी आहेत, ते मजुरी भरमसाट सांगतात. सध्या एका झाडावर चढण्याची मजुरी अडीचशे ते तीनशे रुपये झाली आहे. पिकलेला फणस झाडावर राहिला, तर पक्षी फणसाचा फडशा पाडतात.
उन्हाळी व्यवसाय बंद
बरका फणसापासून साठे (फणस पोळी) तयार केली जाते. रसाळ व तंतूमय गऱ्यातून आठळ्या(बी) काढल्यावर साखर एकत्र करून एकजीव केलेले मिश्रण ताटाला तुपाचा हात लावून पसरवले जाते. मिश्रण काही दिवस उन्हात ठेवून सुकवले जाते. पूर्णपणे सुकवलेले मिश्रण म्हणजे फणस पोळी. आजच्या परिस्थितीत फणस पोळी तयार करण्यासाठी महिला मजूर मिळत नसल्याने घरातील महिलावर्गाचे उन्हाळी व्यवसाय बंद होत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.