Intercropping Method : कपाशी -सोयाबीन आधारित आंतरपीक पद्धती

Dryland Farming : गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचे फटके प्रामुख्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना अधिक बसत आहेत. भविष्यातील पावसाचे खंड लक्षात घेता कोरडवाहू शेतकऱ्यांना आंतरपीक किंवा दुबार साखळी पीक पद्धतीला प्राधान्य द्यावे.
Intercropping Method
Intercropping MethodAgrowon
Published on
Updated on

रविकिरण माळी, डॉ. एम. एम. गणवीर

देशातील एकूण पिकाखालील क्षेत्राच्या जवळपास ४५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. मात्र महाराष्ट्रात  हे प्रमाण १८ टक्के आहे. पूर्ण सिंचन क्षमता विकसित केल्यावरही राज्यातील जवळपास ७० टक्के क्षेत्र कोरडवाहू असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्याकरिता कोरडवाहू शेतीच्या विकासावर प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

वातावरणातील बदलांचा शेती व शेतीशी संबंधित क्षेत्रांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा काळात पावसावर आधारित (कोरडवाहू) शेती जास्तीत जास्त वातावरणाशी निगडित करावी लागेल.

या वर्षी महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस चक्क बारा दिवस आधी आलेला असल्याने अनेक शेतकऱ्यांना मशागतीची व अन्य कामे करण्यास पुरेसा वेळ मिळालेला नाही. मे महिन्यामध्येच दीर्घकाळ अवकाळी पाऊसही कोसळत राहिला होता.

गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचे फटके शेतकऱ्यांना बसत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, मॉन्सून सुरुवातीच्या काळात कोसळून नंतर दीर्घकाळ खंड पडणे, अतिप्रखर उन्हे, अधिक तापमान अशा अनियमित वातावरणीय घटकांचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे.

Intercropping Method
Sugarcane Intercropping : उसात कोणतं आंतरपीक घ्याल?

शेतीच्या उत्पादनामध्ये घट होत असून, अंतिमतः अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट होते. या वातावरणावर मात करण्याच्या उद्देशाने सलग किंवा एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचा आग्रह धरला जातो.

यासाठी अकोला येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पामध्ये कपाशी व सोयाबीनवर आधारित आंतरपीक पद्धती विकसित केल्या आहेत. ही दोन्ही नगदी पिके असून, त्यांच्या आंतरपीक तसेच दुबार पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये शाश्‍वतता प्राप्त होऊ शकते.

Intercropping Method
Agriculture Intercropping : रब्बी पिकांमध्ये वेळेवर आंतरमशागत महत्त्वाची

आंतरपीक पद्धती ः कपाशी + मूग (१:१), कपाशी + चवळी (१:१), कपाशी + गवार (१:१)

दुबार पीक पद्धती ः कपाशी + सोयाबीन (६ :६) > मोहरी व कपाशी + सोयाबीन (४ :१०) > करडी

या विकसित केलेल्या आंतरपीक पद्धतीचे संशोधन प्रयोगाच्या अभ्यासातून मिळालेले निष्कर्ष पुढील प्रमाणे आहेत.

१. कपाशी + सोयाबीन (६:६) त्यानंतर रब्बीत मोहरी साखळी आंतरपीक पद्धतीची पेरणीची पद्धत व निष्कर्ष

ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राच्या साह्याने या आंतरपीक पद्धतीची पेरणी करावी. सर्वप्रथम पेरणी यंत्राच्या सर्व फणातील अंतर ४५ सें.मी. राहील अशी यंत्राची रचना करून घ्यावी. कपाशी पिकाची पेरणी ४५ × १५ सें.मी. अंतरावर, तर सोयाबीन पिकाची पेरणी ४५ × ५ सें.मी. अंतरावर करावी.

पेरणी यंत्राचा वापर करताना पेरणी यंत्र किती पेट्यांचे आहे, हे लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे. ६ ओळी कपाशीच्या व ६ ओळी सोयाबीनच्या या प्रमाणात पेरण्यात येतील. सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर सोयाबीनच्या ६ तासांमध्ये असलेल्या जागेमध्ये रब्बी हंगामामध्ये मोहरी या पिकाची ४५ × १५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

२. कपाशी + सोयाबीन (४:१०) त्यानंतर रब्बीत करडई साखळी आंतरपीक पद्धतीची पेरणीची पद्धत व निष्कर्ष :

ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राच्या साहाय्याने या आंतरपीक पद्धतीची पेरणी करावी. पेरणी यंत्राच्या सर्व फणातील अंतर ३० सें.मी. असावे याप्रमाणे यंत्राची रचना सर्वप्रथम करून घ्यावी. कपाशी पिकाची पेरणी ६० × ३० सें.मी. अंतरावर, तर सोयाबीन पिकाची पेरणी ३० × ८ सें.मी. अंतरावर करावी. आठ पेट्या असणाऱ्या टोकण पेरणी यंत्राचा वापर करणार असल्यास पहिल्या पेटीमध्ये कपाशीचे बियाणे टाकावे व त्यानंतरची पेटी रिकामी ठेवून तिसऱ्या पेटीमध्ये पुन्हा कपाशीचे बियाणे टाकावे.

नंतरच्या पाचही पेट्यांमध्ये सोयाबीनचे बियाणे टाकावे. अशा पद्धतीने पेरणीची सुरुवात केल्यास ट्रॅक्टरने पहिले वळण घेतल्यास पुन्हा पाच ओळी सोयाबीनला लागून पेरल्या जातील. त्याच्या बाजूला दोन ओळी कपाशीच्या पेरल्या जातील.

दुसरे वळण घेतल्यानंतर कपाशीला लागून पुन्हा दोन ओळी कपाशीच्या पेरल्या जातील. याच पद्धतीने पेरत राहिल्यास चार ओळी कपाशीच्या आणि दहा ओळी सोयाबीन पिकाच्या या प्रमाणामध्ये कपाशी + सोयाबीन ४:१० या पद्धतीने पेरणी होत राहील. सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर दहा तासांमध्ये रब्बी हंगामामध्ये करडई या पिकाची ४५ x २० सें.मी. अंतरावर लागवड करावी.

आंतरपीक व साखळी पीक पद्धतीचे फायदे

कपाशी समतुल्य विचार केल्यास अधिक उत्पादन व निव्वळ नफा मिळतो.

बदलत्या हवामानास अनुकूल, अधिक पाणी वापर कार्यक्षमता व शाश्‍वत पीक उत्पादन मिळते.

सोयाबीन / गवार / चवळी ही द्विदल पिके असल्यामुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर होते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर.

पीक पद्धतीमध्ये कपाशी व सोयाबीन या दोन प्रमुख पिकांचा अंतर्भाव आहे. त्यामुळे एकाच हंगामात दोन्ही पिकांचे शाश्वत उत्पादन मिळण्याची हमी.

कपाशी व सोयाबीन हे विविध कालावधीचे पिके असल्याकारणाने हवा, सूर्यप्रकाश, जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्याकरिता स्पर्धा निर्माण होत नाही. तसेच रोग-किडींचा विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत नाही.

सोयाबीन या लवकर परिपक्व होणाऱ्या पिकामुळे रब्बी हंगामात दुबार पीक घेण्याची संधी उपलब्ध होते.

सोयाबीन, मोहरी व करडई या तेलवर्गीय पिकांचा समावेश पीक पद्धतींमध्ये आहे. सध्याची देशांतील तेल उत्पादनाची कमतरता भरण्यात आपलाही हातभार लागेल.

रविकिरण शा. माळी (वरिष्ठ संशोधन वेत्ता), ७५८८९६२२३२

डॉ. एम. एम. गणवीर (वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषिविद्या), ७५८८९६२१९८

(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com