Purandar News : देशभरात अंजिराला भौगोलिक मानांकन (जी.आय.) नोंदणी झालेला एकमेव पुरंदर तालुका आहे. पुरंदरच्या या वैशिष्ट्यपूर्ण फळाला देश व अन्य १६० हून अधिक देशांची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी पुरंदर हायलॅण्ड शेतकरी उत्पादक कंपनीने प्रयत्न सुरू केले.
पुरंदर हायलॅण्ड शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रोहन सतीश उरसळ यांच्या नेतृत्वाखाली संचालकांनी जाधववाडी (ता. पुरंदर) येथे ६.५ हजार चौरस फूट क्षेत्राचे शेड भाडेतत्त्वावर घेतले. तिथे प्रकल्पातील यंत्रणा उभारली. येथे दोन वर्षांपासून संपूर्ण आरोग्यदायी आणि नियंत्रित तापमानामध्ये अंजिरावर प्रक्रिया केली जात आहे.
या प्रकल्पाकरिता सुमारे ६५ लाख रुपये खर्च आला. त्यात प्रथम ‘सुपर फीग’ (Super Fig) या ब्रॅण्डअंतर्गत अंजिरांची निर्यात जर्मनी, नेदरलँड, हाँगकाँग देशांमध्ये पावणेदोन वर्षांपूर्वी यशस्वी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अंजीर व लाल पेरू यांचा ‘ब्रेड स्प्रेड’ (Bread Spread) ही तयार केला.
लाल पेरूच्या ब्रेड स्प्रेडसाठी पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीसोबत करार केला. या बेकरीने ‘पुरंदर पेरू केक’ बनवून बाजारातही आणला आहे. त्या दरम्यान यंदाच्या वर्षी प्रारंभीच शुगर फ्री असा ‘जांभूळ स्प्रेड’ (Jambul Spread)ही लाँच केला. आता अंजीर ज्यूसही तयार केला असून, ही शेतकरी कंपनी आपल्या उत्पादनांची रेंज विकसित करत आहेत.
सध्या दर दिवशी अंजिरासह अन्य शेतीमाल २ टन लागतो. प्रक्रिया उत्पादनाची क्षमता ५०० किलो असून, ती वाढविणार असल्याचे मत संचालक अतुल कडलग यांनी व्यक्त केले.
ज्यूस निर्मितीची प्रक्रिया
* पुरंदरमधील शेतकऱ्यांनी पिकवलेले ‘जीआय’ प्राप्त अंजीर धुऊन घेतले जातात.
* फळाची साल काढून काप केले जातात.
* काढलेला गर किलोच्या पॅकिंगमध्ये वजा १८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवतात.
* प्रत्यक्ष ज्यूस निर्मितीवेळी सर्वसाधारण तापमानात तीन तास ठेवतात.
* पाश्चरायझर यंत्रणेमध्ये ९० अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी असते. त्यामध्ये निर्जंतुकीकरण प्रक्रियेसोबतच गर एकजीव मिसळून रस तयार केला जातो.
* या प्रक्रियेमध्ये साखर वापरली जात नाही.
* रसाचे तापमान कमी होताना बाटलीमध्ये पॅकिंग करून, त्यावर लेबल लावले जाते.
* हा ज्यूस सर्वसाधारण तापमानात साठवण केल्यानंतर मागणीनुसार बाजारपेठेमध्ये पाठवला जातो.
* २०० मि.लि. बाटली साधारणपणे ४९ रुपये प्रमाणे विकली जाते.
अंजीर ज्यूसची वैशिष्ट्ये...
* ज्यूसमध्ये गर प्रमाण ४० टक्के, पाणी ५९ टक्के, मीठ व इतर घटक १ टक्का.
* बाह्य साखर, कृत्रिम रंग, फ्लेवर यांचा अजिबात वापर नाही. अंजिराच्या अंगभूत गोडीवरच मिळवली जाते उत्तम चव.
* जीवनसत्त्व ‘सी’ आणि ‘के’ने परिपूर्ण ज्यूस. त्यात कॅल्शिअम, फाॅस्फरस, लोह, पोटॅशिअम, तंतुमय पदार्थ यांचे मुबलक प्रमाण यामुळे पचनशक्ती वाढते. रक्तक्षय घटू शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.