Agriculture Production : उत्पादनवाढीतून साधली उत्पन्नामध्ये वाढ

Indian Agriculture : केवळ पारंपरिक पद्धतीने मिळेल तितक्या उत्पादनातून परवडणार नाही, हे लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील वरखडवाडी (ता. वाई) येथील नितीन वरखडे यांनी भात, ऊस व भुईमूग या पिकांमध्ये उत्पादन वाढ मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

विकास जाधव

Farmer Success Story : धोम धरणाच्या कुशीत वसलेल्या वरखडवाडी येथील शेतकरी बाजीराव वरखडे यांची ११ एकर शेती आहे. त्यांची ओळख पैलवान आणि त्याच वेळी हाडवैद्य अशीही आहे. त्यांचे वय ७६ झालेले असल्याने त्यांच्या हाडवैद्यकीचा वारसा प्रमोद चालवतात आणि शेतीचा वारसा नितीन चालवतात. खरेतर सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हळद पिकासाठी प्रसिद्ध आहे.

पण शेतीची जबाबदारी आल्यावर सुरुवातीला पारंपरिक ज्वारी, हरभरा, गहू, घेवडा अशी पिके घेतली. मात्र त्यातून उत्पन्नात वाढ साधणार नाही, हे लक्षात घेत नितीन यांनी पिकात बदल करत आधुनिक शेतीला प्राधान्य दिले.

सतत शिकण्याची प्रवृत्ती ठेवत वेगवेगळी प्रशिक्षणे, प्रदर्शन भेटी यातून नवीन व शास्त्रीय माहिती घेण्यावर त्यांचा भर असतो. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे प्रशिक्षण घेतल्याचा फायदा त्यांना उत्पादनवाढीतून दिसून आला. विविध पिकांमध्ये कमीत कमी खर्चात उत्पादन वाढ आणि त्याच वेळी जमिनीची सुपीकता वाढविण्यावर त्यांचा भर असतो.

भात पीक केले फायदेशीर...

परिसरात पर्जन्यमान चांगले असल्यामुळे खरिपात भात पीक घेतले जाते. नितीन यांच्याकडे दरवर्षी सुमारे एक एकरामध्ये इंद्रायणी या भात वाणाची लागवड केली जाते. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात रोपवाटिका करताना ६० किलो बियाणे वापरले जाते. यातील ५० किलोचे बियाणे एक एकरास पुरते. रोपवाटिका टाकल्यानंतर शेतात हिरवळीचे खत तागाची पेरणी केली जाते. ते गाडल्यानंतर एक महिन्याने म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चारसूत्री (१५ सेंमी बाय २५ सेंमी) व बारा ओळीनंतर दीड फुटाचा पट्टा सोडून भाताची पुनर्लागवड केली जाते.

हा पट्टा पिकाचे निरीक्षण, फवारणीसाठी उपयोगी ठरतो. भातात सेंद्रिय खतांसह युरिया- डीएपी ब्रिकेट खोचल्या जातात. एकात्मिक खत व्यवस्थापनातून ४५ ते ५० पर्यंत फुटवे येतात. २०२२ मध्ये प्रति गुंठा सर्वाधिक १३८ किलो भात उत्पादन मिळवत नितीन यांनी विभागात भात उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. एका प्रयोगात प्रति गुंठ्यास ११७ किलोप्रमाणे एकरी सुमारे साडेचार टनांपर्यंत उत्पादन मिळाले होते.

उत्पादनातील पद्धतीचे काटेकोर नियोजन करत दरवर्षी साधारण तेवढेच चार ते साडेचार टन उत्पादन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पिकाचा उत्पादन खर्च सुमारे ६० हजार रुपये खर्च येतो. त्यांच्याकडून दरवर्षी तांदूळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची थेट बाजारपेठ तयार केली आहे. प्रति किलो ५५ ते ६० रुपये दर मिळतो. साधारण दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता किमान दीड लाख रुपये हाती येतात. पीक कालावधीचा विचार करता अन्य नगदी पिकांपेक्षा भात, भुईमूग या सारखी पिके फायदेशीर ठरत असल्याचे नितीन यांचे मत आहे.

Agriculture
Agriculture Success Story : आदिवासी पाड्यांवर महिलांनी घडवली धवलक्रांती

ऊस पिकात गाठली शंभरी

ऊस हे दीर्घकालीन पीक असून, त्यातून वर्षाला मोठी रक्कम हाती येते. पूर्वी उसाचे केवळ एकरी ५० ते ५५ टन उत्पादन मिळत असे. हे कधीच परवडणार नाही, हे लक्षात घेऊन ऊस उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न केले. जमीन सुपीकतेसाठी अधिक प्रयत्न सुरू केले. दरवर्षी दोन ते अडीच एकर क्षेत्रावर को ८६०३२ वाणाची ठिबकवर लागवड केली जाते. त्यापूर्वी माती परीक्षण करून खतांचे नियोजन केले जाते. वर्षातून एकदा दोन ते तीन ताग, धैंचा या सारखी हिरवळीची खतपिके घेऊन ती बेवड केला जातो.

त्याचा फायदा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी होतो. दोन डोळ्यांच्या कांडीची लागवड बेणेप्रक्रियेनंतर केली जाते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एकरी शंभर टनांचे ध्येय त्यांनी गाठले आहे. २०१९ मध्ये उसाचे एकरी १०५ टन उत्पादन मिळवले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आडसाली उसाचे सरासरी ९५ ते १०० टन उत्पादन मिळते. पिकासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. उसाला २७०० ते २९०० रुपये दर मिळतो. भांडवली खर्चासह अन्य किरकोळ खर्च वजा जाता पावणे दोन लाख रुपये निव्वळ हाती राहतात.

उसामध्ये आंतरपीक म्हणून ते भुईमूग, घेवडा, सोयाबीन ही पिके घेतात. गेल्या वर्षी त्यांनी ३२ गुंठ्यांत १६ पोती (प्रति ३८ किलोचे) ओली शेंग उत्पादन मिळाले. प्रतिवर्षी २० गुंठे क्षेत्रावर उन्हाळी भुईमूगही असतो. या वर्षी लवकर म्हणजे मे महिन्यात निघाल्यामुळे ६० रुपये प्रति किलोने दर मिळाला. या प्रमुख पिकासह केळीची एक एकर लागवड करतात. एकरी ८०० रोपे लावली जातात. पहिल्या हंगामात प्रति झाड ७५ रुपये खर्च झाला, तर २० टनांचे उत्पादन मिळाले. विक्री शेतातून १२ ते १३ हजार रुपये प्रति टन या प्रमाणे झाली. सध्या बागेचा दुसरा बहर सुरू आहे.

Agriculture
Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

सहकार्य व सन्मान

२०१९ मध्ये ‘आत्मा’अंतर्गत उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार. याच वर्षी जिल्हा परिषदेकडून सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कार.

वर्ष २०२०, राज्यशासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार. २०२० -२१ मध्ये ज्वारी पिकांमध्ये एकरी ३८ क्विंटल उत्पादन घेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला.

वर्ष २०२३, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडून ‘आयडॅाल’ शेतकरी पुरस्कार जाहीर. जिल्हा परिषदेतर्फे डॉ. जे. के. बसू सेंद्रिय व आधुनिक शेती पुरस्कार मिळाला.

पुसेगाव येथील कृषी प्रदर्शनात भुईमूग शेंग, हिरवी मिरचीला पुरस्कार. तर लोणंद येथील शरद प्रदर्शनात भुईमूग व उसाला प्रथम क्रमांक.

आई रंजना, वडील बाजीराव, पत्नी कल्याणी यांच्यासह स्वतः राबतात. घरातील व्यक्ती हिरिरीने कामे करत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व कमी राहते. बंधू प्रमोद, वहिनी सोनिया यांचीही मोठी मदत होते. मुले शौर्य आणि आर्य अनुक्रमे चौथी आणि आठवीला आहेत.

नियोजनबद्ध शेती

नितीन यांचा प्रामुख्याने तीन पिकांवर भर. खरिपात भात, तर आडसाली व सुरू हंगामात ऊस घेतात.

भुईमुगाचे सलग (माडे) तसेच उसात ते आंतरपीक घेतात. (रब्बीत)

प्रत्येक पिकात शेणखत, गांडूळ खत, जिवामृताची फवारणी यांचा अधिकाधिक वापर करत असल्याने रासायनिक खतांत बचत होते.

गांडूळ खताचे वर्षाला २०० ते ३०० पोती (प्रति पोते ४० किलोचे) उत्पादन ते घेतात.

सुमारे दहा एकर क्षेत्र ठिबक खाली आणले. आता सर्व हंगामी पिकेही ठिबकवर घेतात.

तणनाशकांचा वापर करण्याऐवजी शक्य त्या पिकात हरभरा, कांदा, लसूण, सोयाबीन अशी आंतरपिकावर भर असतो.

शेतीला पूरक म्हणून वनराज, गिरिराज व देशी कोंबड्यांचे पालन करतात.

बांध उत्पादक करण्यासाठी बांधावर नारळ १०, आंबा २५, आवळा २, फणस १, चिकू २ अशा फळझाडांची लागवड केली आहे.

शेतीकाम, शेणखतासाठी दोन बैलांचे संगोपन केले जाते.

नितीन वरखडे, ९८९०३७४१३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com