

Monsoon Update : मॉन्सूनचा पाऊस व खरीप हंगाम सक्रिय झाला आहे. शेतकरी पेरणी, पीक नियोजनात व्यस्त आहे. बाजारपेठेत केशर, बदाम वा अन्य प्रकारचे आंबे दिसत असले तरी आंब्याचा हंगाम आता जवळपास संपला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी सांगता झालेल्या आंबा बाजारपेठेचा वेध इथे घेतला आहे.
आंबा बाजारपेठेतील दरवर्षी महत्त्वाचा भाग असतो तो राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने होणाऱ्या आंबा महोत्सवाचा. यंदाचा महोत्सव एक एप्रिल ते तीन जून दरम्यान ‘मार्केट यार्ड’ मधील जिल्हा परिषदेच्या जागेवर यशस्वी पार पडला.
यात ६७ स्टॉल्स होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक असे १०५ शेतकरी सहभागी झाले.
हंगामातील विक्री, उलाढाल
यंदाच्या आंबा महोत्सवावर हवामान बदलाचे सावट राहिले. एप्रिलमध्ये महोत्सवाच्या प्रारंभाला आवक कमी राहिली. दर ७०० ते एकहजार २०० रुपये प्रति डझन राहिल्याचे पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक आणि महोत्सव नियंत्रक मंगेश कदम यांनी सांगितले. एप्रिलचा पूर्ण महिना हे दर कायम राहिले. मेमध्ये आवक सुरळीत होऊन दर ५०० ते ७०० रुपये राहिले.
त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून आवकेला सुरवात झाल्यानंतर आंबा ग्राहकांच्या थोडा आवाक्यात आला. यावेळी दर ३०० ते ५०० रुपयांच्या मर्यादेत होते. महोत्सवात अडीच ते तीन लाख डझन आंबा विक्री व सुमारे १९ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
हवामानाचे सावट
ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस तर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये थंडीचा कालावधी कमी राहिल्याचे पाहायला मिळाले. मोहोर लागण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यातील मोहोर काही प्रमाणात गळाला.
टिकलेल्या मोहोराच्या पहिल्या टप्प्यात आंब्याची आवक नियमित सुरू झाली. मार्च महिन्यात ती अपेक्षेएवढी होती. फेब्रुवारीत दिवसा तापमान अधिक असायचे. रात्री तापमानात घट व्हायची. त्यामुळे दुसऱ्या बहरात झाडांना पालवी जास्त येऊन मोहोर कमी आला.
पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व गारपीट हे प्रकार घडले. पणन मंडळाचा महोत्सव ब्रॅण्ड बाजारपेठेत अनेकवेळा हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची मोठी फसवणूकही होत असते.
ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा, शिवाय शेतकऱ्यांना मध्यस्थांविना ग्राहक मिळावा या उद्देशाने अनेक वर्षांपासून पणन मंडळाद्वारे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शेतकरी आणि ग्राहकांचे ऋणानुबंध त्यातून निर्माण झाले आहेत.
यातून दरवर्षी महोत्सवाला प्रतिसाद वाढत असून उलाढालीतही वाढ होत आहे. या माध्यमातून पणन मंडळाचा आंबा महोत्सव हा ब्रॅण्ड विकसित झाल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी सांगितले.
अक्षय्य तृतीयेला राहिलेले दर
-किरकोळ बाजार- ८०० ते १३०० रुपये (प्रति डझन)
घाऊक बाजार दर- चार ते सहा डझन पेटी- अडीच हजार ते चार हजार रु.
-पाच ते दहा डझन पेटी- साडेतीन हजार ते सहा हजार रु.
आंबा निर्यातीतही आघाडी
अलीकडील वर्षांत भारतीय आंब्याने निर्यातीतही चांगला वेग पकडला आहे. राज्य पणन मंडळांतर्गत वाशी (नवी मुंबई) येथे निर्यात सुविधा केंद्रामध्ये आंब्यावर विकिरण आणि उष्णजल प्रक्रिया केली जाते. यावर्षी त्याद्वारे ९४२ टन आंबा परदेशात निर्यात झाला. यात विकिरण केलेल्या आंब्यामध्ये अमेरिका येथे ८०६ टन, ऑस्ट्रेलियामध्ये २८ तर मलेशियामध्ये १ टन निर्यात करण्यात आली.
यामध्ये हापूस २५०, केशर २८५, बैंगनपल्ली १६३, दशहरी, लंगडा हिमायत, राजापूरी आणि रसालू आदींचा १०८ टनांचा समावेश आहे. उष्णजल प्रक्रियेद्वारे जपान येथे ४०, न्यूझिलंड येथे ८४, दक्षिण कोरिया येथे ४ आणि युरोपियन महासंघातील देशांमध्ये ८ टन निर्यात झाली. यात केशर, हापूस, बैंगनपल्ली आणि बदामी आंब्याचा समावेश राहिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.