इरफान शेख
New Cropping Systems : नव-नवीन पिके घेण्याचे प्रयोग नवीन नाहीत. अशा प्रयोगांतूनच पीक पद्धती बदलत गेली आहे. पीक पद्धती बदलणं धर्म बदलण्यापेक्षा कठीण काम आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तीन-चार पिढ्यांमध्ये पीक पध्दती कशी बदलत गेली, त्याचा धावता आढावा या लेखातून घेतला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र दिसून येईल.
शेतकरी पर्यायी पीक पद्धतीच्या शोधात मोठ्या प्रमाणावर दिसतात. निमित्त बाजारभावाचं असेल, वातावरण बदलाचं असेल किंवा मग नव्या संधी शोधण्याचं असेल. शेतकरी दर वेळी अनोळखी पीक (उदा. चिया, टर्की बाजरी इ.) आपल्या भागात घेण्याचे प्रयोग करत असतता. याशिवाय जिथे कधीच स्ट्रॉबेरी/ सफरचंद ही पिकं झालेली नाहीत; तिथं ती पिकं घेण्याचा प्रयोग अनेक तरुण शेतकरी करत आहेत. उद्देश हा की एखादी जादूची कांडी सापडेल; ज्यातून दोन रुपये अधिकचा नफा मिळवता येईल. पण दुर्दैव, अल्पसा आनंद मिळो न मिळो अनेक वेळा ये रे माझ्या मागल्या हीच परिस्थिती.
हे प्रयोग नवीन नाहीत. अशा प्रयोगांतूनच पीक पद्धती बदलत गेली आहे. पीक पद्धती बदलणं धर्म बदलण्यापेक्षा कठीण काम आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तीन-चार पिढ्यांमध्ये पीक पद्धती कशी बदलत गेली, त्याचा धावता आढावा या लेखातून घेतला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र दिसून येईल.
हयात असलेल्या पिढीच्या सुरुवातीला पाहिलं तर बीडमध्ये भुईमूग हे प्रमुख पीक होते. परंतु १९६० च्या दशकात भुईमुगामध्ये सर्कोस्पोरा नावाचा बुरशीजन्य रोग प्रचंड वाढला आणि त्यामुळे भुईमुगाचे क्षेत्र हळूहळू कमी झाले. आता रानडुकरांचे प्रमाण इतके वाढले आहे की क्वचितच कुणी भुईमूग करते.
त्यानंतर सूर्यफुल आले. ते इतके आवडते पीक झाले की खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत हे पीक घेतले जायचे. पण नंतर या पिकावर बिहार हेअरी कॅटर पिलर (घुले) अळीचा प्रादुर्भाव वाढला. दुसरं म्हणजे सूर्यफुल हे परपरागीभवनाचे (क्रॉस पॉलिनेटेड) पीक. या परागीभवणासाठी मधमाश्यांची आवश्यकता असते. रासायनिक फवारण्यांच्या अतिवापरामुळे मधमाश्यांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे सूर्यफुलाचा पेरा कमी होत गेला. सूर्यफुलाचे वजन आणि विक्रीचा दर तेलाच्या प्रमाणावर ठरतो. त्यात अपेक्षित संशोधन न झाल्यामुळे अधोगती होत गेली. त्यामुळे बाजारभाव कमी होत गेला. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सूर्यफुलाकडे ओढा राहिलेला नाही. बीड जिल्ह्यात २००५-१० या काळात सूर्यफुलाचे क्षेत्र जवळपास शून्यावर आले आहे.
पूर्वीच्या काळी गहू, ज्वारी या पिकांना मोटेने पाणी द्यायचे. नंतर वीज आली आणि पाण्याचे क्षेत्र वाढले. बोअरवेल तंत्रज्ञान आले. पाण्याची उपलब्धता वाढल्यासारखे वाटले. भूगर्भातील पाण्याचा वापर वाढला. या सगळ्यामुळे उसाकडे ओढा वाढला. बीड जिल्ह्यात १९७० च्या दशकात उसाची लागवड वाढली. काही काळात बीड जिल्हा राज्यातील आघाडीच्या ऊस उत्पादक जिल्ह्यांपेकी एक बनला. अति उपशामुळे भूगर्भातील पाणीसाठा संपुष्टात यायला लागला. त्यातच पावसाचे खंड वाढले. दुष्काळाची वर्षे वाढली. त्यामुळे १९९० च्या दशकात उसाचे उत्पादन कमी व्हायला लागले. सध्या कारखाने वाढले आहेत. या एकमेव पिकात शेतकऱ्यांना उत्पन्नाची किमान हमी वाटायला लागली. त्यामुळे ऊसाचे पीक कमी-अधिक वाढत आहे. ऊस वाढला पण डुकरांचा त्रास प्रचंड वाढला. शेतकरी यालाही त्रस्त झाले आहेत. वरून एफआरपीची शाश्वती या भागात कमीच.
मराठवाड्यात पूर्वी ज्वारीचे क्षेत्र बरेच होते. खरिपात बाजरी आणि रब्बीला ज्वारी ही अनेक वर्षे चाललेली पीक पद्धती होती. देशी वाण होते. १९६८ पासून दुष्काळाचा त्रास वाढत गेला. १९७२ च्या दुष्काळानंतर सर्व पिकांत संकरित वाण वाढले. त्यातच संकरित ज्वारी आली. १९९९ पासून पुढे संकरित ज्वारी जास्त उत्पादकता द्यायला लागली. याची प्रमुख कारणे म्हणजे एखादा खताचा डोस, अल्प मशागत करून आधी एकरी ५ क्विंटल उतार देत असलेली ज्वारी, संकरित वाण आल्यानंतर एकरी १० क्विंटल उत्पादन द्यायला लागली. बाजरी, ज्वारी, राळा आणि भगर ही भरडधान्ये होती. या पिकांचे उत्पादन कमी झाले. एकतर पशुधन कमी झाले. त्यामुळे चाऱ्याची गरज कमी झाली. तसेच बाजारभाव कमी झाल्याने, पोंगेमरमुळे उत्पादकता कमी होत गेली आणि क्षेत्रही घटत गेले. बीड जिल्ह्यात कोरडवाहू पिकांची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत आहे.
बीड जिल्ह्यात १९९० च्या दशकापर्यंत कापसाचे क्षेत्र वाढून ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. कापूस हे पारंपरिक पीक होते. देशी वाण होते. परंतु १९९० च्या दशकाच्या मध्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे क्षेत्र कमी होऊ लागले. त्या नंतर २००२ मध्ये बीडला बीटी कापसाची लागवड सुरू झाली. त्यामुळे कापसाचे क्षेत्र पुन्हा वाढू लागले आणि २०१० च्या दशकाच्या सुरुवातीला कापसाचे क्षेत्र ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. पण बोंड अळी स्वतःमध्ये प्रतिकारक्षमता वाढवत गेली आणि मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांना कापसावरून सोयाबीनकडे वळण्यास भाग पाडत आहे. इथे सुद्धा कृषी संशोधन, प्रतिकारक्षम व अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची कमतरता हा मुख्य अडथळा ठरत आहे.
सोयाबीन हे संरक्षित पाणी लागणारे पीक आहे आणि ते हलक्या जमिनीवर वाढत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र कमी आहे. दोन पावसांमध्ये २५ दिवसांपेक्षा अधिक खंड पडला तर सोयाबीन उत्पादनात मोठी घट होते. खात्रीशीर पाण्याचा स्रोत वाढला तर सोयाबीनचे क्षेत्र वाढू शकते. परंतु पोषक कसदार जमिनीची उपलब्धता कमी असल्यामुळे क्षेत्रवाढीला मर्यादा आहेत.
साखर कारखान नव्हते तेव्हा गहू हे सिंचित शेतीवर येणारे एक प्रमुख पीक होते. ऊस वाढल्यामुळे गहू कमी झाला. तसेच जेव्हापासून स्वस्त धान्य केंद्रांवर अत्यल्प दरात गहू मिळू लागला तेव्हापासून बाजारभाव दबावात यायला लागले. त्यामुळे हळूहळू गहू खूप कमी झाला. आता तर गव्हाचे प्रमाणित बियाणे सुद्धा जवळपास मिळत नाहीत.
रब्बी हंगामात हरभरा हे पीक अनेक वर्षे टिकून आहे. पण आता उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळणारा बाजारभाव, तुटपुंजी शासकीय खरेदी, मर रोगाचा वाढलेला प्रादुर्भाव, मर रोगास प्रतिकारक्षम वाणांचा अभाव इत्यादी अडचणींमुळे शेतकरी त्रासले आहेत.
मग २०१० नंतर थोडेसे क्षेत्र आले, ढोबळी मिरची, हळद यांसारख्या नगदी पिकांकडे वळले. ज्यांच्याकडे दीर्घ काळ गुंतवणूक करण्याची क्षमता आहे त्यांनी आंबा, डाळिंब, पेरू ही पिके घेण्यास सुरुवात केली. ज्यांचा चरितार्थ शेतीवर अवलंबून नाही असे नोकरी-धंद्यातले लोक ही पिके घेऊ लागली. पण याचे क्षेत्रही मर्यादित आहे.
आज हे पीक, तर उद्या ते अशी स्थिती दिसतेय. परंतु प्रश्न फक्त उत्पादनाचा नाही. बदलते हवामान, बेभरवशाची मार्केट व्यवस्था यात कसे टिकून राहायचे, याची उत्तरे शोधली पाहिजेत. यातला दुसरा घटक म्हणजे पीक कोणतेही असो; जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालकीची जागतिक दर्जाची पूर्ण मूल्यसाखळी उभी रहात नाही तोपर्यंत स्थिरता येणे अशक्यच वाटते. ग्राहकांना हवे तसे आरोग्यदायी, सुरक्षित व चवदार उत्पादने बनवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पिकवण्यासोबतच मार्केटवरसुद्धा भर द्यायला हवा. पण त्यासाठी धोरणात्मक पाठबळ लागेल. अन्यथा हे प्रयोग आणि त्यातून अपरिहार्य पीक फेरपालट हे दुष्टचक्र थांबणे कठीण आहे.
----------
लेखक बालाघाट फार्म्स, बीडचे संचालक आहेत. ९०२१४४०२८२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.