
Agriculture Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात चिपरी हे जिरायती पट्ट्यातील गाव आहे. येथील अनेक शेतकरी विहिरी, कूपनलिकांच्या माध्यमातून ऊसशेती करतात. नदीचा स्रोत नसल्याने अन्य ठिकाणाहून पाणी आणणे अडचणीचे ठरते. गावातील रमेश पांडव यांची साडेचार एकर शेती आहे. पूर्वी ऊस हे त्यांचे मुख्य पीक होते. परंतु पाणी कमी पडत असल्याने ते तोट्यात येत होते.
त्यामुळे पर्याय शोधण्याचे काम सुरू होते. सन १९९९ मध्ये कृषी विभागाच्या संपर्कात आल्यानंतर फळबाग लागवड योजनेअंतर्गत चिकू लागवडीचा पर्याय त्यांना मिळाला. हे पीक घेण्याचे नक्की केल्यानंतर नजीकच्या जयसिंगपूर येथील नर्सरीतून कालीपत्ती जातीच्या चिकूची ४० झाडे आणली. अनुभवी चिकू उत्पादकांकडे जाऊन लागवडीचे शास्त्र जाणून घेतले.
...आणि चिकूची बाग विस्तारली
चिकू बागेसाठी निवडलेली जमीन माळरानाची होती. त्यात ३३ बाय ३३ फूट अंतरावर लागवड झाली. सुमारे तीन वर्षांनी उत्पादनास सुरुवात झाली. दरम्यान, नव्या बागेत भुईमूग, झेंडू, शाळू, टोमॅटो, पपई अशी आंतरपिके घेतली. आज बाग सुमारे पंचवीस वर्षांची झाली असून, झाडांच्या शाखा मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. ठिबक पद्धतीचे सिंचन असते. मात्र हिवाळ्यापासून ते मेपर्यंत पाट पाणी देण्यात येते.
या पिकात फूल पोखरणारी अळी ही प्रमुख समस्या असून, जुलै ते सप्टेंबर या काळात ती अधिक सक्रिय राहते फुलावस्थेत ती जास्त नुकसान देते. अशावेळी कीटकनाशकांचा वापर करून अळीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न असतो. तापमान वाढल्यास फुलगळीचा धोका असतो. रासायनिक खते अगदी गरजेनुसार मात्र सेंद्रिय खते, गोमूत्र, जिवामृत आदींचा अधिकाधिक वापर होतो. सेंद्रिय निविष्ठांमुळे फळाला चकाकी, गोडवा, रंग व स्वाद येतो. त्यामुळेच चिकू अधिक तजेलदार दिसून बाजारात मागणी व दर वाढतात असे पांडव सांगतात.
काढणीचे नियोजन
डिसेंबर ते फेब्रुवारी व जून ते सप्टेंबर अशा वर्षभराच्या दोन कालावधीत उत्पादन मिळते. काढणीचे टप्पे तयार करून प्रत्येक काढणी दुपारी तीन ते सहा या कालावधीत होते. यात रमेश यांना आई कमल, वडील बाबूराव, पत्नी सविता अशा घरच्या सर्व सदस्यांची मदत होते. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी होऊन व्यवस्थापन खर्चात बचत होते. तोडणी झालेल्या फळांच्या देठाजवळून चिकट द्रव बाहेर येतो. तो सुकल्यानंतर फळांची प्रतवारी व पोत्यात भरणी होते. हंगामात आठवड्यातून सुमारे चार वेळा काढणी होते. प्रत्येक काढणीत १५० ते २०० किलोपर्यंतचिकू मिळतात.
थेट विक्री व्यवस्था
अनेक वर्षांपासून चिकूची घाऊक व थेट अशी दोन्ही पद्धतीची विक्री व्यवस्था उभारली आहे.स्वतः रमेश दुचाकीवरून जयसिंगपूर शहरासह आपल्या गावातील बाजारामध्ये थेट विक्री करतात. दोन्ही विक्री पद्धतीचा विचार केल्यास किलोला २५ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत दर मिळतात. या बागेतून दरवर्षी खर्च वजा जाता लाख रुपयांचा नफा मिळवणे पांडव यांना शक्य झाले आहे.
आसपासच्या गावांचा विचार करता पांडव यांची या भागात एक एकरभर असलेली चिकूची एकमेव बाग असावी. उत्पादनात सातत्य टिकवीत त्यांनी उसाला सक्षम पर्याय उभा केला आहे. उसापेक्षा चिकूतून मिळणारे उत्पन्न जास्त आहेच, शिवाय शाश्वत देखील आहे असे पांडव म्हणतात.
केवळ एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा फळबागेत आंतरपिके घेऊन वर्षभर उत्पादन मिळेल असा हेतू त्यांनी ठेवला. उसाच्या तुलनेत चिकूला देखभाल वा मशागत कमी लागते. शिवाय वर्षातून दोन वेळा त्यातून उत्पादन व साहजिकच उत्पन्न मिळते. त्यामुळे उसाला पर्याय म्हणून एकेकाळी चिकूबागेचा घेतलेला निर्णय सार्थ ठरल्या असल्याचे पांडव सांगतात. सध्या उसाचे क्षेत्र मर्यादित म्हणजे सुमारे २५ गुंठ्यांपर्यंत ठेवले आहे.
वर्षभर उत्पन्न देणारा भाजीपाला
ऊस व चिकूबागेला पांडव यांनी भाजीपाला व फुलशेतीची जोड दिली आहे. काकडी, दोडका, टोमॅटो व दुधीभोपळा अशा पिके ते खरीप व उन्हाळी हंगामात घेतात. त्यातून वर्षभरासाठी ताज्या उत्पन्नाचा स्रोत त्यांनी तयार केला आहे. डिसेंबर व उन्हाळ्यात अशा दोन कालावधीत काकडी असते. काकडीनंतर झेंडूचे उत्पादन घेतले जाते.
दुधीभोपळ्याचेही वर्षभर उत्पन्न सुरू असते. काकडीस प्रति किलो २० ते २५ रुपये, दोडक्यास ३० ते ४० रुपये व दुधीस २० ते २५ रुपये दर त्यांना मिळतो. या भाजीपाला पीक पद्धतीतून वर्षभरात लाख रुपयांचे उत्पन्न देणारा स्रोत त्यांनी तयार केला आहे. एक विहीर व दोन बोअर्स याआधारे सिंचन केले जाते.
रमेश पांडव ९५०३३३३०१३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.