Farmer First Project : ‘शेतकरी प्रथम’ मधून गाव शिवारांत समृद्धी

Article by Suryakant Netke : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नगर जिल्ह्यातील चार गावे सात वर्षांपूर्वी दत्तक घेत तेथे ‘शेतकरी प्रथम प्रकल्प राबवला. एकात्मिक शेती पद्धती, तंत्रज्ञान, विविध पूरक व्यवसायांचे उपक्रम यशस्वी राबवले.
Shetkari Pratham Project
Shetkari Pratham ProjectAgrowon

Prosperity in Agriculture : नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील बहुतांश गावांना मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणाच्या पाण्याचा लाभ मिळतो. मात्र पश्‍चिम भागातील गावांना धरणाचे पाणी मिळत नसल्याने पाऊस तसेच स्थानिक जलस्त्रोतांआधारे शेती करावी लागते. अशा तांभेरे, चिंचविहिरे, कानडगाव, कणगर या दुष्काळी वा कोरडवाहू गावांसाठी सात वर्षांपूर्वी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मदतीने ‘शेतकरी प्रथम प्रकल्प’’ सुरू केला.

एकात्मिक शेती पद्धतीद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे, जोडव्यवसायांच्या मदतीने अल्पभूधारक, शेतमजुरांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे हा प्रकल्पामागील उद्देश होता.

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे मार्गदर्शन प्रकल्पाला लाभले. संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, प्रकल्पप्रमुख डॉ. पंडितराव खर्डे, सह-प्रकल्पप्रमुख डॉ. सचिन सदाफळ, वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहायक किरण मगर व अमोल गायकवाड यांनी यात पुढाकार घेतला.

विविध सूत्रांचा अवलंब

प्रकल्पांतर्गत गावांच्या शिवारात हलक्या, मुरमाड पद्धतीची जमीन आहे. पूर्वी तेथे बाजरी, ज्वारी, हरभरा यासारखी पिके असत. पण त्यात तांत्रिक व्यवस्थापनाचा तितका वापर नव्हता. प्रकल्पात विविध हंगामी व फळपिकांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या.

मूलस्थानी जलसंधारण, जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाणांची निवड, बीज प्रक्रिया, पेरणीनंतर ओलावा व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आदी सूत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Shetkari Pratham Project
Farmer Exporter : निर्यात सुविधा केंद्राद्वारे झाला शेतकरी स्वतः निर्यातदार

प्रकल्पातील बाबी व फलश्रुती

चार गावांच्या शिवारात ७५० एकरांवर ज्वारी. जमिनीचा पोत व त्यास अनुकूल फुले सुचित्रा, फुले रेवती, फुले वसुधा, फुले अनुराधा या सुधारित वाणांचा वापर. एकरी चार क्विंटलवरून ८ क्विंटलपर्यंत उत्पादनवाढ.

सहा वर्षांत चारशे एकरांवर हरभरा. दिग्विजय, विशाल वाणांचा वापर. यंत्राद्वारे काढणी करता येत असल्याने खर्चात बचत. एकरी ५ क्विंटलवरून ८ क्विंटलपर्यंत उत्पादन वाढ.

तुरीच्या विपुला, फुले राजेश्‍वरी, बीडीएन ७११ आदी सुधारित वाणांचा वापर. एकरी पाच क्विंटलवरून ८ किलोपर्यंत उत्पादनवाढ.

सोयाबीनचे दोनशे एकरहून अधिक क्षेत्रात उत्पादन व २५ टक्के उत्पादन वाढ.

बाजरीचे आहारातील महत्त्व समजून विद्यापीठ संशोधित धनशक्ती व आदिशक्ती या सुधारित वाणांचा वापर. सहा वर्षांत ४०० हेक्टरवर बाजरी. एकरी नऊ क्विंटलवरून १२ क्विंटलपर्यंत उत्पादनवाढ.

राहुरी, राहाता तालुक्यांसह जिल्हाभरात डाळिंब क्षेत्र आहे. प्रकल्पाद्वारे भगवा, फुले सुपर भगवा या वाणांची ३५० शेतकऱ्यांकडे प्रायोगिक तत्त्वावर लागवड. विद्यापीठ विकसित निविष्ठा व अन्य तंत्रज्ञानाद्वारे एकरी पाच ५ टनांवरून साडेसात टनांपर्यंत उत्पादन वाढ.

सोयाबीन, हरभरा बीजोत्पादन

विद्यापीठ विकसित व शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या सोयाबीनच्या फुले संगम, हरभऱ्याच्या फुले विक्रम या वाणांच्या बीजोत्पादनाला चालना देण्यात आली. या प्रकल्पात सोयाबीनसाठी ७५, तर हरभरा पिकासाठी ६१ शेतकरी सहभागी झाले. त्यांना आर्थिक फायदाही चांगला झाला.

पूरक व्यवसायांना प्रोत्साहन

प्रकल्पांतर्गत गावांतील महिला, अल्प व अत्यल्पभूधारकांना प्रोत्साहन दिल्याने १२५ जण शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मस्त्यपालनाशी जोडले गेले. परसबागेतील कुक्कुटपालन या उपक्रमातून सहा वर्षांत चार गावांतील ५६४ कुटुंबांना कावेरी या देशी वाणाच्या एक दिवस वयाच्या प्रत्येकी साठ पिलांचे वाटप करण्यात आले. खाद्य व्यवस्थापन, लसीकरण व अन्य बाबीचेही प्रशिक्षण दिले.

आज या व्यवसायातून वर्षाला तीस ते चाळीस हजारांपर्यत उत्पन्नाची जोड मिळवणे कुटुंबांना शक्य होत आहे. मांसासह दुधाला फायदेशीर शेळीची पैदास, संवर्धन होण्यासा १० शेतकरी गटांना उच्च गुणवत्तेच्या बोकडांचे संगमनेरी शेळी संशोधन केंद्राद्वारे मोफत वाटप झाले. प्रशिक्षणांद्वारे सव्वाशे शेतकऱ्यांनी केलेल्या शेळीपालनातून सात वर्षात शेळ्यांची संख्या ६५० ने वाढली. प्रति कुटुंबाला वर्षाला ६५ ते ७० हजार रुपयांचा आधार झाला आहे. वीस शेतकऱ्यांना गांडुळ खतांचे बेड, बीज देण्यात आले.

Shetkari Pratham Project
Farmer First Project : ‘शेतकरी प्रथम’ प्रकल्प ठरला देशात उत्कृष्ट

दुग्ध व्यवसायाला चालना

दत्तक घेतलेल्या गावांत सहा वर्षांत पाचशेच्या जवळपास कुटुंबांनी दुग्ध व्‍यवसाय सुरु केला. त्यांना जातिवंत दुधाळ जाती, कृत्रीम रेतन, फुले जयवंत व गुणवंत ही चारा पिके तसेच मुक्त गोठा पद्धती, मुरघास तंत्रज्ञान आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चारा पिकांची ३२ हजार ठोंबे पुरवण्यात आली. काढणीपश्‍चात तंत्रज्ञानांतर्गत चिंचविहिरे व कणगर येथे दोन महिला बचत गटांना मिनी डाळ मिल देण्यात आल्या.

राज्यात केवळ आमच्या कृषी विद्यापीठातच ‘शेतकरी प्रथम प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट म्हणून त्याचा सन्मान झाला आहे. यात तृणधान्ये, कडधान्ये, फळपिके, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, परसबागेतील कुक्कुटपालन, गांडूळ खत उत्पादन, मुरघास, चारापिके आदी घटकांचा समावेश आहे. एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग मिळाला आहे.
डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
मार्गदर्शन, सुधारित वाण, तंत्रज्ञान व्यवस्थापन या गोष्टींमुळे ज्वारी, हरभरा, सोयाबीन आदी पिकांचे उत्पादन वाढले आहे. सोयाबीन बीजोत्पादनातूनही चांगला आर्थिक फायदा झाला.’’
ताराचंद गागरे ९८९०२९४२४५, तांभेरे, ता. राहुरी
माझी अल्प शेती आहे. प्रकल्पांतर्गत शेळीपालनासाठी बोकड, कुक्कुटपालनासाठी पिले मिळाली. आज या पूरक व्यवसायांमुळे मोठा आर्थिक आधार तयार झाला आहे.
विष्णू विधाटे ८८८८४३६५७२, तांभेरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com