Poultry : उच्च तंत्रज्ञान व स्वयंचलित पद्धतीचा लेअर पोल्ट्री फार्म

अमरावती येथील रवींद्र मेटकर यांनी अनेक वर्षांपासून जोपासलेला पोल्ट्री व्यवसाय आता उच्च तंत्रज्ञान, स्वयंचलित व वातानुकूलित तंत्रज्ञानावर आधारित विकसित झाला आहे. त्याआधारे विविध कामे सोपी होऊन वेळ, मजुरी खर्चात बचत झाली आहे. सध्या एक लाख ८० हजार पक्ष्यांची बॅच घेण्याची क्षमता तयार झाली असून, काही कोटींपर्यंत उलाढाल होत आहे.
Poultry
PoultryAgrowon
Published on
Updated on

परराज्यांत जाण्यासाठी दळणवळणाची साधने व लोहमार्गांमुळे अमरावती हे महत्त्वाचे ठिकाण झाले आहे. अनेक उद्योगधंदे या भागात वाढीस लागले आहेत. पोल्ट्री व्यवसायातही (Poultry Business) अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. लेअर पोल्ट्री उद्योगातून (Layer Poultry Industry) दररोज सुमारे दहा लाखांवर अंड्यांचे उत्पादन (Egg Production), तर ३५ ते ४० दिवसांतील ब्रॉयलर कोंबड्यांची (Broiler Chicken) ३० लाख नग इतक्‍या संख्येत उलाढाल होते. करार व्यवसायामुळे छोटे शेतकरीदेखील त्यासाठी प्रवृत्त झाले आहेत.

मेटकर यांचा पोल्ट्री व्यवसाय

अंजनगावबारी परिसरात (जि. अमरावती) रवींद्र मेटकर यांनी १९८४ मध्ये लेअर पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली. अनेक खडतर प्रयत्नांतून व चिकाटीतून त्यांनी व्यवसाय वृद्धी केली. आज मुलगा शिवराज वडिलांचा वारसा पुढे नेत आहे. बारामती (जि. पुणे) येथील कृषी महाविद्यालयांतर्गत कृषी व्यवस्थापन विषयातील पदवी अभ्यासक्रमाचा तो अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. संयुक्त मेटकर कुटुंबाची सुमारे ५० एकर शेती आहे. शिक्षणाचा प्रभावी उपयोग करीत शिवारात तो विविध प्रयोग करतो. कोरोना काळात सुमारे दोन वर्षे महाविद्यालय बंद होते. या संधीचे सोने करीत पोल्ट्री व्यवसायातही शिवराजने वडिलांना मोठी मदत केली व अनुभवही घेतला.

उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प

-मेटकर यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित पोल्ट्री व्यवसाय उभारला आहे. सध्या एकूण एक लाख ८० हजार पक्षी अशी व्यवसायाची क्षमता आहे.

- एकूण आठ शेड्‍स आहेत. स्वयंचलित यंत्रणेत तीन मजली पद्धत आहे.

-प्रति पिंजऱ्यात (केज) पाच पक्षी असतात.

-ट्रॉली पद्धतीने खाद्य देण्यात येते.

-यातील एक शेडची रचना पॅकहाउसमध्ये केली आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना पडदे लावले आहेत.

दोन्ही बाजूंना कूलिंग पॅड आहेत. तर दहा एक्झॉस्ट फॅन आहेत. उन्हाळ्यात तापमान २७ अंश सेल्सिअसच्या वरती गेल्यास सेन्सर ते सूचीत करतो. त्यानुसार कूलिंग पॅड्‍स सुरू होतात.

-प्रति तास सहा टन पशुखाद्य निर्मितीची फीडमिल आहे. दररोज एकूण १३ टन खाद्य लागते.

-या यंत्रणेत सुमारे १० ते १२ जण काम करतात.

Poultry
Poultry Business : नोकरीसह पोल्ट्रीतून उभारला उत्पन्नाचा स्त्रोत

स्वयंचलित यंत्रणा

-अलीकडेच शंभर टक्के स्वयंचलित व वातानुकूलित स्वतंत्र शेड तयार केले आहे. त्याची क्षमता तीस हजार पाचशे पक्ष्यांची आहे. विदर्भात किंवा अमरावती भागात अशा प्रकारचा हा एकमेव प्रकल्प असावा.

-यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

आतापर्यंतच्या व्यवसायात मिळालेल्या

उत्पन्नातून भांडवल उभे करणे शक्य झाले.

-प्रति केजमध्ये नऊ पक्षी असतात. त्यामध्ये पाणी पिण्यासाठी नोझलची व्यवस्था आहे.

-या ठिकाणीही दोन्ही बाजूंना प्रत्येकी २५ फूट रूंदीचे व १९ फूट उंचीचे कूलिंग पॅड्‍स आहेत.

-पशुखाद्य देण्याची यंत्रणा देखील स्वयंचलित असून, त्यासाठी शेडच्या बाहेर १२ टन क्षमतेचा सायली उभारण्यात आला आहे. त्यात पशुखाद्याची साठवणूक होते. त्यापासून शेडपर्यंत पाइपलाइनद्वारे

स्वयंचलित पद्धतीने खाद्य पोहोचते. शेडच्या आतील यंत्रणा चालू केल्यानंतर क्षमतेइतके पशुखाद्य दिल्यानंतर यंत्रणा आपोआप बंद होते. त्यामुळे अतिरिक्‍त पशुखाद्याची नासाडी होण्याचा प्रश्‍न उद्‍भवत नाही.

-या यंत्रणेत केवळ दोन मजूर व्यक्तींची गरज भासते.

-स्वयंचलित यंत्रणेत अंडी दिल्यानंतर ती पक्षी असलेल्या कप्प्यांच्या समोरील बाजूस येतात.

त्या ठिकाणी कन्व्हेअर बेल्ट असून, त्या माध्यमातून ती बाहेरील बाजूस आणली जातात. त्या ठिकाणी संकलनाचे काम होते. या संपूर्ण प्रक्रियेत कोठेही मानवी हस्तक्षेप राहत नाही. त्यामुळे मजुरी खर्चात मोठी बचत होते.

-पक्ष्यांची विष्ठा बाहेर काढण्याचे कामही अशाच प्रकारे कन्व्हेअर बेल्टच्या माध्यमातून होते. शेडच्या बाहेर पडणारी ही विष्ठा नंतर ट्रॉलीत भरून संकलित केली जाते. पोल्ट्री खत म्हणून त्याचा उपयोग होतो. त्यातूनही पूरक उत्पन्न मिळते.

Poultry
Poultry Diseases : ओळखा कोंबड्यांतील विविध रोगांचा प्रादुर्भाव

उत्पादन व अर्थकारण

वर्षभरात प्रति पक्षी ३३० प्रांत एकूण अंडी मिळतात. वर्षभराची सरासरी काढली, तर अंड्याला

तीन रुपयांपासून ते कमाल सहा रुपयांपर्यंत दर मिळतो. प्रति अंडी उत्पादन खर्च हा सव्वाचार

रुपये असतो. एकूण वार्षिक उलाढाल १० ते १२ कोटी रुपयांपर्यंत आहे. सर्व स्थिती अनुकूल राहिल्यास प्रति अंडे ३० ते ४० पैसे फायदा मिळू शकतो. अर्थात, पशुखाद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने नफ्याचे प्रमाण कमी होत आहे. मागणीत होणाऱ्या वाढीच्या काळात दरात तेजी येते आणि तूट भरून निघते. अनेक वर्षांचा अनुभव असल्याने व्यापाऱ्यांशी पूर्वीपासून संबंध जुळलेले आहेत. मध्य प्रदेश, इंदूर, भोपाळ तसेच स्थानिक व्यापाऱ्यांकडून अंडी खरेदी होते.

शेतातील प्रयोग

शिवराज प्रयोगशील वृत्तीचा आहे. त्यातूनच भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारा (आयसीएआर) विकसित विविध वाणांची लागवड करण्यावर मेटकर कुटुंबाचा भर राहिला आहे. ट्रॅक्‍टरचलित यंत्रांचा वापर होतो. काळा तांदूळ, बासमती १६९२ वाण शिवारात लावले आहेत. हरिमन-९९ जातीच्या सफरचंदाची १५० झाडे बागेत असून, ती दोन वर्षांची आहेत. सोयाबीनच्या फुले संगम आणि फुले किमया या दोन वाणांची लागवड केली आहे. तुरीचे पुसा-९९१ हे वाण लावले आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सुमारे १४० दिवसांत परिपक्‍व होते. अन्य वाणांचा हाच कालावधी १८० ते २०० दिवस आहे. एकरी आठ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

प्रयोगशीलतेचा गौरव

नागपूर येथील ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे शिवराजला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ‘आत्मा’चा जिल्हास्तरीय, नाशिक येथील युवा शेतकरी कृषी प्रेरणा पुरस्कार २०२१ व वसंतराव नाईक कृषिरत्न पुरस्कारही त्यास मिळाला आहे.

शिवराजचा सामाजिक कार्यातही पुढाकार असतो. गरजूंना रक्‍तदान करण्यात त्याचा सहभाग असतो.

संपर्क ः शिवराज मेटकर, ९८८१३०३७०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com