विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती जिल्ह्यात टाकळी बु. येथील उच्चशिक्षित पवन लुंगे यांनी १८ वर्षे बॅंकिंग क्षेत्रात नोकरी केली. त्यानंतर शेतीचा व्यासंग जपत आज पूर्णवेळ लेअर पक्षी पोल्ट्री व्यवसाय व गीर गायींच्या संगोपनात ते रमले आहेत.
गेल्या पाच वर्षांच्या काळात दोन वर्षे नफा, यंदाचे वर्ष नुकसान अशी स्थिती आली. मात्र केलेली गुंतवणूक व व्यवस्थापन पाहता खर्च कमी करून नफा मिळवण्याच्या अन्य बाबींकडे लक्ष द्यायचे पवन यांनी ठरविले आहे.
अंड्यांच्या दरात सातत्याने चढउतार होत असतात. कधी प्रति नग साडेतीन रुपये तर कधी साडेचार ते पाच रुपये असा दर अंड्यांना मिळतो. त्यासाठीचा उत्पादन खर्च साडेतीन ते साडेचार रुपयांच्या घरातही जातो. सध्या पशुखाद्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने दर साडेचार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मिळाला तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो असे पवन म्हणतात.
बाहेरून खाद्य विकत घेण्यापेक्षा प्रति दिन १० टन क्षमतेची फीडमीलही उभारली आहे. अशा प्रकारच्या खाद्य ट्रॉलीद्वारे पक्षांना खाद्य दिले जाते.
पवन लुंगे यांनी विहिरीवर सौर ऊर्जेचा वापर केला आहे. सौर उर्जेवरूनच ते पाण्याचा उपसा करतात.
पोल्ट्रीसह देशी गोपालनाचा व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचा पर्यायी आधार दिला आहे. दोन वर्षांपूर्वी गुजरातमधून गीर गायी आणल्या आहेत. सध्या गोठ्यात सुमारे २२ गायी आहेत.