Cow Breeding : उच्च गोवंश निर्मितीचा राज्यातील आदर्श

Dairy Farming : निरोगी, धडधाकट व दिवसाला ३० ते ३८ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई त्यांच्या गोठ्यात आहेत. खाद्य, आरोग्य व्यवस्थापनही दर्जेदार ठेवून स्वाती यांनी हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व राज्याला आदर्श असाच केला आहे.
Dairy Farming
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यात होणाऱ्या एकूण दूध संकलनापैकी ५० टक्क्यांहून अधिक वाटा एकट्या फलटण तालुक्याचा आहे. येथील दुग्ध व्यवसायात महिलादेखील आघाडीवर आहेत. तालुक्यातील मुंजवडी येथील स्वाती विजयकुमार पवार यांचे नाव राज्यातील आदर्श दुग्ध व्यावसायिक म्हणून ठळकपणे घेतले जाते. त्यामागे १७ वर्षांचा अनुभव, त्यातील प्रशिक्षण, अभ्यास व कष्ट यांचे मोठे योगदान आहे.

शून्यातून सुरुवात

स्वाती यांचे माहेर पुणे येथे असून येथेच त्यांचे सगळे शिक्षण झाले. शेतीची पार्श्‍वभूमी वा अनुभव त्यांना नव्हता. आई-वडील व भाऊ नोकरी करायचे. विजयकुमार बबन पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंजवडीला आल्या. सासू-सासरे शेती करायचे. दोन गाई होत्या. स्वाती यांचे पती नजीकच्या गावी दररोज अपडाउन करून खासगी कंपनीत नोकरी करीत असल्याने शेतीची मुख्य जबाबदारी स्वाती यांच्यावर आली.

मात्र गोंधळून न जाता दुग्ध व्यवसायावर लक्ष केंद्रित करून एकेक गोष्ट शिकून घेण्यास व आत्मसात करण्यास सुरुवात केली. पती व घरच्या सर्व सदस्यांनी मोठे पाठबळ दिले. तीन गाई विकत घेऊन दुग्ध व्यवसायाला आकार येऊ लागला. मध्यंतरी काही कारणाने दोन गाई दगावल्या.

मात्र न खचता अभ्यासूवृत्तीने स्वाती व्यवसायात पुढे जात राहिल्या. हळूहळू व्यवसायात जम बसू लागला. मिल्किंग मशिन घेतले. फलटण येथील गोविंद डेअरी यांच्याकडून मुक्तसंचार गोठा व व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर तंत्रज्ञान वापर व सुधारणांना सुरुवात झाली. सन २००८ मध्ये बांधावरील लाकडे व कळक यांचा वापर करून तीन- चार हजारांमध्ये मुक्तसंचार गोठा उभारला.

Dairy Farming
Dairy Farming : एका गाईपासून ३३ गायींपर्यंतचा प्रवास ; कल्पनाताईंच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा

गोवंश सुधारणा व उत्तम वंशावळ निर्मिती

पुढील टप्प्यात (२०२०) स्वाती यांनी गोठ्यात उच्च वंशावळीच्या जातिवंत गाई पैदास करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. यात अधिक दूध उत्पादनक्षम, आपल्या वातावरणात तगून राहणाऱ्या, आजारांना कमी बळी पडणाऱ्या कालवडींची निर्मिती हे उद्दिष्ट ठेवले. त्यासाठी गोविंद डेअरीच्या वंश सुधार योजनेचा फायदा झाला.

त्यासह बायफ व अमेरिकन कंपनी यांच्याकडील जातिवंत, विविध गुणधर्मांनी युक्त वळूच्या विविध ब्रीडच्या सिमेनचा (कृत्रिम रेतन तंत्रज्ञान) वापर केला. आजमितीला गोठ्यात लहान-मोट्या मिळून जातिवंत ४० पर्यंत गाई आहेत. काही जर्सी तर बहुतांश एचएफ ब्रीड आहे. काही गाईंमध्ये ‘एंब्रियो ट्रान्स्फर’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यातून सध्याच्या गाईंची दुग्धोत्पादन क्षमता अजून वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

Dairy Farming
Cow Dairy Farm : आदर्श गोसेवा आणि अनुसंधान ठरले गोवंशाचे आश्रयस्थान

दूध उत्पादनक्षमता, गायींना अधिक दर

गोठ्यातील जर्सी गाई प्रतिदिन २२ ते २४ लिटरपर्यंत, तर एचएफ गाई २५, ३० लिटरपासून कमाल ३८ लिटरपर्यंत दूध देतात. दिवसाला ४२ लिटरपर्यंत दूध देणारीही गाय आहे. दररोजचे दूध संकलन २०० ते २५० लिटरपर्यंत आहे. दुधाला फॅट ४.१, एसएनएफ ८.६, तर प्रथिनांचे प्रमाण ३.१ आहे.

त्यानुसार गोविंद डेअरीकडून दुधाला दर मिळतो. जातिवंत असल्याने व तसे रेकॉर्डही असल्याने जिल्ह्याबाहेरूनही गाईंना मोठी मागणी असते. दीड ते दोन लाख रुपयांच्या किमतीने त्यांची वर्षाला तीन ते चार संख्येने विक्री होते. दोन वर्षांपूर्वी एका कालवडींची एक लाख ८० हजार रुपयांना विक्री झाली. महिन्याला व्यवसायातून ३० टक्के नफा होतो.

व्यवस्थापनातील आदर्श बाबी

-आज सुमारे १७ ते १८ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.

-संपूर्ण सहा एकर शेतात चारा उत्पादन. एकदल व द्विदल चारा तसेच खासगी कंपन्यांच्या चारा वाणांची लागवड. चीकयुक्त गव्हापासून मुरघास निर्मिती.

ॲझोला व हायड्रोपोनिक चारानिर्मिती.

-पशुखाद्यावरील खर्च कमी होण्याच्या दृष्टीने मका, गहू भरडा,. फूल फॅट सोया, मीठ, मिनरल मिक्स्चर यांचे मिश्रण असलेल्या खाद्याची निर्मिती.

-एक गुंठ्यात हर्बल गार्डन विकसित केले आहे. गायींना प्रतिबंधक किंवा प्रथमोपचार म्हणून त्यातील आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर. मुक्तसंचार गोठ्यामुळे ८० टक्के गाई शक्यतो आजारी पडत नाहीत.

-आहारात कृत्रिम पदार्थ किंवा प्रतिजैविकांचा वापर होत नाही. (अत्यावश्‍यक वेळीच वापर). त्यातून दहा वर्षांपासून सेंद्रिय दूध निर्मितीला चालना. त्यासाठी शेतीतही सेंद्रिय व्यवस्थापन.

-स्वाती यांच्याकडे गोविंद डेअरीचे अधिकृत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्र. त्यास आजपर्यंत सुमारे २५ हजार व्यक्तींकडून भेटी. त्यात शेतकरी, अधिकारी, देश- परदेशातील तज्ज्ञांचा समावेश.

यश व प्रगती

दुग्ध व्यवसायातून पवार कुटुंबाला उल्लेखनीय प्रगती साधता आली. मोठा मुलगा पुष्कराज एमएस्सीचे तर धाकटा मुलगा हर्षद छत्रपती संभाजीनगर येथे बीटेक फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत आहे. चार एकर शेतीसह चारचाकी, अवजारे व टॅक्ट्ररची खरेदी केली आहे. आदर्श व्यवसायासाठी कंपन्या वा संस्थांचे प्रथम, द्वितीय पुरस्कार, सह्याद्री वाहिनी व आकाशवाणीवर मुलाखत, कृषी प्रदर्शन आदींच्या माध्यमातून स्वाती यांनी सन्मान मिळविले आहेत.

गोविंद डेअरीचे अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे स्वाती सांगतात. घेतलेले प्रशिक्षण, देशातील, परदेशातील तज्ज्ञांशी होणारी प्रत्यक्ष भेट, त्यांच्याकडून मिळणारे ज्ञान, गोठा पाहायला येणारी मंडळी अशा विविध स्वरूपातून मी दुग्ध व्यवसायाचा आनंद घेते. दररोज काहीतरी नवा अनुभव असतो. त्यातून व्यवसायात एकेक पाऊल पुढे जाण्याची दिशा मिळाली आहे.

-स्वाती पवार, ८७६६७१२९६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com