
गोपाल हागे
Indian Cattle Breed : अकोला शहराजवळील ‘आदर्श गोसेवा आणि अनुसंधान प्रकल्प’ हे प्रेरणादायी उदाहरण आहे. प्रामुख्याने निराधार गोवंश या ठिकाणी सांभाळला जातो. केवळ आठ गोवंशापासून सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या १४०० पेक्षा अधिक गोवंश सांभाळले जात आहेत. या ठिकाणी गोवंश संवर्धनाच्याबरोबरीने सेंद्रिय खत निर्मिती तसेच शेण, गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार केली जातात. लोकसहभागातून या प्रकल्पाने चांगली गती घेतली आहे.
सेवाभावी वृत्तीतून १९९३ मध्ये महावीर जयंतीच्या दिवशी अकोला शहराजवळील म्हैसपूर फाटा परिसरात आदर्श गोसेवा आणि अनुसंधान प्रकल्पाचा शुभारंभ झाला. गोशाळेच्या माध्यमातून गोवंश संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. गाय, वळूंची योग्य काळजी, त्यांच्या पोषणाची जबाबदारी घेण्यात आली आहे. प्रकल्पाची मुख्य शाखा अकोल्याजवळील म्हैसपूर फाटा येथे आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव आणि सावरगाव येथे विस्तारित शाखा आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, गोपालकांमध्ये समन्वय साधला जात आहे. बेवारस गोवंशाचे संगोपनासोबत तसेच शेण, मूत्रापासून सेंद्रिय खत निर्मिती तसेच विविध उत्पादने तयार केली जातात. यातून अकोला जिल्हा तसेच आसपासच्या अनेक ग्रामीण भागात जागरूकता वाढण्यास मदत होत आहे. या प्रकल्पाने भटके गाई, बैल तसेच कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सोडवणूक करून सुरक्षित आश्रय दिला जातो. सामाजिक, नैतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून एक मोठे योगदान या प्रकल्पातून दिले जाते. आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाचे कामकाज अध्यक्ष तसेच संचालक मंडळाच्या मार्गदर्शनात चालते.
निराधार गोवंशाला आश्रय ः
बऱ्याचदा निराधार गाई, बैल रस्त्यावर फिरताना दिसतात. यांना संरक्षण देणे, सुरक्षित वातावरणात ठेवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. भटके गाई, बैल, कत्तलीसाठी जाताना पोलिसांनी पकडलेल्या गोवंशाला येथे सुरक्षित ठिकाणी आणले जाते. त्यांना आहार, पाणी आणि इतर सुविधा पुरवल्या जातात. निराधार गायींना सुरक्षित आश्रय देण्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून एक मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकसहभागातून प्रकल्पाला चालना ः
आदर्श गोसेवा आणि अनुसंधान प्रकल्प हा एक प्रेरणादायी प्रकल्प आहे. आजवर कुठलेही अनुदान नसतानाही केवळ लोकसहकार्यातून कारभार चालतो. गोसेवा आणि पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने समाजातील दात्यांकडून आर्थिक मदत मिळते. या प्रकल्पात दरवर्षी जनावरांच्या खाद्याचा खर्च ४० लाखांवर आहे. या ठिकाणी होणारा प्रत्येक खर्च, उत्पन्नाची पारदर्शीपणे नोंद ठेवली जाते. प्रत्येक खर्चाचा तपशील उपलब्ध असतो. काही लोक प्रकल्पासाठी आर्थिक मदत देतात, काही जण जनावरांना चारा किंवा इतर मदतीतून साह्य करतात. गुप्तपणे दान करणारे अनेकजण तयार झाले आहेत. यातूनच गोशाळेतील गोवंशाच्या पोषणाचा खर्च भागवला जातो. नागरिकांचा प्रकल्पाच्या कार्यांमध्ये विश्वास तयार झाला असून, त्यांच्या योगदानातून हा प्रकल्प पुढे नेण्यास मदत होत आहे. प्रकल्पाला मिळत असलेल्या लोकसहकार्यामुळे नुसते आर्थिकच नाही तर सामाजिक आणि नैतिक बाबींनाही पाठबळ मिळाले आहे. गोवंश संरक्षण आणि संवर्धनाची भूमिका लोकांना समजलेली आहे.
विविध उत्पादनांची निर्मिती ः
आदर्श गोसेवा आणि अनुसंधान प्रकल्पात पर्यावरणीयदृष्ट्या फायदेशीर उत्पादने तयार केली जातात. विविध औषधीय गुणधर्म असलेले ही उत्पादने आहेत. पारंपारिक भारतीय औषधी पद्धतींमध्ये गोमूत्र आणि शेणाचा वर्षानुवर्षे वापर केला जातो. या प्रकल्पाद्वारे
गोमूत्र, शेण आणि इतर गोपालनापासून मिळणाऱ्या घटकांच्या चांगल्या प्रकारे उपयोग करण्यात येतो. विविध प्रकारच्या औषधी उत्पादनांमध्ये गोमूत्राचा उपयोग केला जातो. या ठिकाणी कपिला पंचगव्य औषधी तयार केली जाते. गोमूत्र अर्क, गोमूत्र घनवटी, मधुवटी, विविध प्रकारचे तेल, चूर्ण, दंतमंजन, साबण, शाम्पू, उटणे, गोवरी आदी विविध उत्पादनांच्या विक्रीतून वर्षाला १५ लाखांची उलाढाल होते. स्थानिक ग्राहकांसह मुंबई, पुणे, हैदराबाद, गोवा अशा विविध ठिकाणी या प्रकल्पाशी जोडलेले ग्राहक ही उत्पादने नियमित वापरतात. शेणापासून उत्तम सेंद्रिय खत तयार केले जाते. शेणापासून कंपोस्ट, गांडूळ आणि दाणेदार खत निर्मिती होते. या सर्व निविष्ठांना चांगली मागणी आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना गोकृपाअमृताचे सेवाभावी वृत्तीने वितरण केले जाते.
जनजागृतीवर भर ः
या प्रकल्पाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. यात गोमय स्नान महोत्सव, गोवत्सद्वादशी व्रत पर्व, सप्त गौमाता प्रदक्षिणा, गोरक्षण कार्यात सहकार्य होण्याच्या उद्देशाने विदर्भ स्तरीय अधिव्यक्ता (वकील) संमेलन घेतले जाते. संस्थेने आतापर्यंत ५०० हून अधिक कोर्ट केस लढवल्या आहेत.
दुधाळ गोवंश वाढीचे काम ः
या प्रकल्पात गोवंश वाढ आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. देशी गोवंशवाढीचे कार्य या प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. येथे आलेल्या गोवंशाचे संवर्धन आणि त्यांच्या उत्पादनक्षमतेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न होतात. देशी गोवंशाचे वळू तयार करून त्याचे वाटप केले जाते.
अकोला शहरात देशी गाईच्या दुधाला चांगली मागणी आहे. दूध उत्पादनाच्या उद्देशाने प्रकल्पात शंभर गीर गायी आहेत. या गायींचे दूध शहरातील ग्राहकांना पोहोच दिले जाते. या गायींमध्ये उच्च दूध उत्पादनाची क्षमता असते. तसेच त्यांचे आरोग्यही चांगले असते. त्यामुळे गीर गायींना प्राधान्य देण्यात आले आहे. संस्थेच्या २६ एकर शेतीत वर्षभर चारा पिकांचे उत्पादन घेतले जाते.
गोवंश संगोपन पुरस्कार ः
प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना उत्कृष्ट गोवंश संगोपन पुरस्कार उपक्रम राबवला जातो. या ठिकाणावरून शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना ११ महिन्यांसाठी बैल तसेच संगोपनासाठी गाय दिली जाते. जे शेतकरी गाय, बैलांची चांगल्या पद्धतीने देखरेख, निगा ठेवतात, जनावरास सशक्त करतात, अशा शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी निवड करताना तज्ज्ञांचा गट पाहणी करून आपले मत नोंदवितात. त्यातून शेतकऱ्याची निवड केली जाते. उत्कृष्ट गोवंश संगोपनासाठी ११ हजारांचा पहिला पुरस्कार तर द्वितीय पाच हजार, तृतीय पुरस्कारासाठी तीन हजार रुपये देऊन गौरविले जाते.
संपर्क ः रमाकांत भोपळे, ९३७०३६९८४२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.