
Cashew Processing Business : सिंधुदुर्ग जिल्ह्याला विविध फळपिकांचे समृद्ध वरदान लाभले आहे. मात्र आंबा आणि काजू ही या प्रदेशातील दोन प्रमुख फळपिके आहेत. आंबा लागवड संपूर्ण जिल्हयात असली तरी किनारपट्टी आणि किनारपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या भागात हापूस लागवडीला अधिक पोषक वातावरण असते.
त्या तुलनेत जिल्ह्यात काजू लागवडीला मात्र पोषक वातावरण आहे. त्यामुळे मागील २० ते २५ वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजूची लागवड झाली. अलीकडील काही वर्षांत तर दरवर्षी पाच हजार हेक्टर याप्रमाणात लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सुमारे ७९ हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून, पैकी ६२ ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.
काजू उत्पादनातून जिल्हयात प्रतिवर्षी साधारणपणे बाराशे ते पंधराशे कोटींची उलाढाल होते. जिल्ह्यातील दीड लाख कुटुंबे काजू लागवडीशी निगडित आहेत. अशी परिस्थिती असली तरी हवामान बदलाचा मोठा फटका गेल्या काही वर्षांपासून अन्य फळांप्रमाणे काजूलाही बसू लागला आहे.
लांबणारा पाऊस, सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, धुके, थंडीचा अभाव, अलीकडील काही वर्षांत वाढत असलेले तापमान, गारपीट अशा विविध नैसर्गिक समस्यांमुळे पाच-सहा वर्षांत काजू बागायतदार संकटात आला. मोठ्या प्रमाणात काजू बी आयात होत असल्यामुळे त्याच्या दरांत होणारी घसरण शिवाय काजूमध्ये होणारी भेसळ अशा विविध समस्यांमुळेही बागायतदार अस्वस्थ आहेत.
ओल्या काजूगरांचे वाढले महत्त्व
प्रक्रियायुक्त काजू ही जशी कोकणची खासियत आहे. त्याचबरोबर ओल्या काजूगरांचेही महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही. कोकणात हंगामात घरोघरी ओल्या काजुगराची भाजी बनविली जाते. ती अत्यंत चविष्ट असते. काही वर्षांपासून काजू बीच्या दरात होणाऱ्या चढउतारामुळे ओल्या काजूगरांचे महत्त्व वाढले आहे.
जिल्ह्यातील काही गावांमध्ये पंधरा वर्षापासून ओले काजूगर आणि ओल्या बिया यांच्या विक्रीला सुरवात झाली. कुणकवण (ता. देवगड), खारेपाटण (ता. कणकवली), एडगाव (ता. वैभववाडी), शिरगाव (ता. देवगड), सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ यांसह विविध गावांतील शेतकरी या विक्री व्यवसायात असल्याचे पाहण्यास मिळते.
जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ओले काजूगर आणि ओल्या काजू बी यांचा हंगाम असतो. मोहर आल्यानंतर ६० दिवसांनी ओली बी काढणीयोग्य होते. बी फोडण्याचे यंत्र असले तरी त्याचा उपयोग तितकासा न होता मनुष्यबळाचा वापरच अधिक होतो. हे काम प्रामुख्याने महिलाच करतात. त्यासाठी शेकडा ४० ते ५० रुपये मजुरी घेतली जाते.
ओल्या काजूगरात भेसळीचे प्रमाणही शून्य असते. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने ओल्या काजूगरांसाठी वेंगुर्ला १० ही जात विकसित केली आहे. या काजूच्या बियाची साल पातळ असून टरफलांमध्ये तेलाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काजूगर सहजपणे काढणे शक्य होते.\
काजूगराचे दर
जिल्ह्यात ढोबळमानाने दररोज ५०० ते ६०० किलो ओल्या काजूगरांची विक्री होत असावी. यात दोनशेहूनहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश असावा. किलो, शेकडा या पद्धतीनुसार दर निश्चित केलेले आहेत. ओल्या काजूगराला सध्या प्रति किलो १२०० ते १४०० रुपये, तर शेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळत आहे.
ओली काजू बी प्रति किलो १३० रुपये दराने खरेदी केली जाते. तर शेकडा २५० ते ३०० रुपये दर आहे बी आणि गराच्या आकारानुसार दर ठरतो. पाव, अर्धा व एक किलो यामध्ये काजुगरांचे पॅकिंग केले जाते.
स्थानिक बाजारपेठेत छोट्या व साध्या पध्दतीचे तर मोठ्या शहरांसाठी मोठ्या पॅकिंगचा वापर होतो. प्रतिदिन ओले काजूगर आणि बियांची मिळून काही लाखांची तर चार महिने चालणाऱ्या हंगामात १२ ते १५ कोटींपर्यंत उलाढाल होते.
बाजारपेठ
ओल्या काजूगरांना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यांसह स्थानिक बाजारपेठांमध्ये मोठी मागणी असते. मुंबई, पुणे येथील तारांकित हॉटेल्समध्येही त्यांचा मागणीनुसार पुरवठा होतो. स्थानिक बाजारपेठांमध्ये हॉटेल्स, शीतपेयांची दुकाने यामधूनही विक्री होते. कोकणातील तरुण पिढी सोशल मीडियाचा खुबीने वापर करून ‘मार्केटिंग’ करू लागली आहे. त्यामुळेही विक्रीला मोठी चालना मिळत आहे. मुंबईकरांच्या विविध व्हॉट्स ॲप ग्रुप्सचाही चांगला उपयोग होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.