Cashew Processing : काजू प्रक्रियेत आश्वासक ‘झेप'

Article by Rajesh Kalmbate : गाव परिसरात आंबा, काजूची मोठ्या प्रमाणात लागवड असल्यामुळे मावळंगे (ता.जि. रत्नागिरी) येथील झेप महिला बचत गटाने काजू प्रक्रिया युनिट सुरु केले.
Self Help Group
Self Help GroupAgrowon
Published on
Updated on

राजेश कळंबटे

Success Story of Cashew Processing : मावळंगे (ता.जि.रत्नागिरी) येथील मातोश्री ग्रामसंघाच्या माध्यमातून शेकडो महिला एकत्र आल्या आहेत. हा संघ २०१६ मध्ये स्थापन झाला. यामध्ये बहुतुले वाडीमधील तीन महिला बचत गट कार्यरत होते. प्रत्येक गटातील महिला दर आठवड्याला २० रुपयांची बचत करत होत्या. गटामध्ये जमा झालेले पैसे गरज असेल तेव्हा सदस्यांना महिलांना दिले जातात.

गटाद्वारे महिला एकत्र येणे, जमा-खर्च हिशेब ठेवणे यासारख्या गोष्टी करू लागल्या. ग्रामसंघाच्या बैठकांमधून रोजगाराविषयी माहिती मिळत होती. परिसरातील आंबा,काजू लागवड आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन बहुतुलेवाडीतील महिला सदस्यांनी पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. संग्राम प्रभाग संघाच्या अध्यक्षा वृषाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बहुतुलेवाडीतील १५ महिलांनी एकत्र येऊन २०१९ मध्ये झेप महिला बचत गटाची स्थापना केली.

काजू प्रक्रियेस सुरवात

गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांनी सुरवातीला भाजीपाला, कुळीथ पीठ तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांना गटातून ६० हजार रुपये खेळते भांडवल मिळाले. सुमारे दहा गुंठे क्षेत्रावर गटातर्फे पालेभाजी लागवड करण्यात आली. गावामध्येच दर महिन्याला भाजीपाल्याच्या एक हजार जुडींची विक्री सुरू झाली. गावामध्येच प्रति जुडी दहा रुपये दर मिळत होता.

गटाला कुळीथ पीठ विक्रीमधूनही पैसे मिळू लागले. परंतु मिळणारे उत्पन्न गटातील महिलांसाठी पुरेसे नव्हते. त्यामुळे प्रक्रिया उद्योग करण्याचा निर्णय महिलांनी घेतला. पावस परिसरात दर्जेदार आंबा आणि काजूचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे गटाने काजू बी प्रक्रिया उद्योग उभारणीचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये गटाने सुरवातीला पावस परिसरातून एक टन किलो काजू बी खरेदी केली.

Self Help Group
Cashew Plantation : काजू पिकापासून मद्यनिर्मिती शासन लवकरच निर्णय : अजित पवार

प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी ‘उमेद'च्या माध्यमातून मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध झाला. तालुका समन्वयक नीलेश ढमाले, प्रभाग समन्वयक परमवीर जेजूरकर आणि प्रभाग व्यवस्थापिका रिया पवार यांनी महिलांना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. गटामधील महिलांनी सोलगाव येथील काजू युनिटला भेट देऊन प्रक्रिया, व्यवस्थापन आणि विक्रीविषयी माहिती घेतली. काजू प्रक्रिया युनिट खरेदीसाठी प्रभागामधून दोन लाख रुपयांचे कर्ज मिळाले. २०१९ मध्ये गटाने काजू बी खरेदी करून ठेवली होती.

परंतु त्याचवेळी कोरोना प्रादुर्भावास सुरवात झाली. कुडाळ येथून गटाने काजू प्रक्रियेसाठी कटर, बॉयलर, ओव्हन अशी यंत्रणा मागविली होती. कोरोना काळ असल्याने ही यंत्रणा गटापर्यंत पोहोचण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. कोरोनामुळे काजू प्रक्रिया युनिट सुरु करता आले नव्हते. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर महिला पुन्हा एकत्र आल्या आणि काजू प्रक्रियेस सुरवात केली, अशी माहिती गटातील सदस्या वृषाली कदम यांनी दिली.

सुरवातीला गटातील सदस्यांना काजू बी फोडण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान सोसावे लागले. परंतु हळूहळू शिकत या महिला आता काजू गर निर्मितीमध्ये सक्षम झाल्या आहेत. दिवसभरात घरगुती आणि शेतीमधील कामे आटपून गटातील महिला सायंकाळी एकत्र येतात. काजू बी पहिल्यांदा बॉयलरमध्ये ठेवली जाते. त्यानंतर काजू बी काढून सुकविण्यासाठी ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी काजू बी फोडण्यास घेतली जाते. पुढे अख्खे काजूगर आठ तास ड्रायरमध्ये ठेवले जातात. पुढील टप्यात काजूगर सुकवून चार प्रकारामध्ये प्रतवारी केली जाते. मागणीनुसार पॅकिंग केले जाते.

सुरवातीला काजू बी फोडताना सुमारे तीन ते चार किलो बी चा तुकडा होत होता. त्याला दरही कमी मिळतो. पहिले वर्षभर ही अडचण झाली. त्यानंतर आता महिला चांगल्या प्रकारे काजूगर तयार करतात. या गटाला प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी कृषी विभागाच्या योजनेतून तीन लाखांचे भांडवल उपलब्ध झाले आहे. प्रक्रिया केलेला काजूगर ७०० ते ११०० रुपये किलो दराने विकला जातो. वर्षभरात खर्च वजा जाता एक लाखांची उलाढाल गटातर्फे होते. मावळंगे हे गाव पावस या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या जवळ असल्याने पर्यटकांचा राबता असतो. तसेच गावात येणारे चाकरमानी महिला बचत गटाकडून काजूगर खरेदी करतात. पुण्यातील एका मॉलमध्ये गटातर्फे काजूगर विक्रीस पाठविला जातो.

या गटाच्या उपक्रमास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड तसेच ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानाचे अवर सचिव यांनी भेट दिली आहे. तसेच झेप बचत गटाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी राज्यातील अधिकारी परिसरातील महिला बचत गटाच्या सदस्या सातत्याने प्रक्रिया उद्योगास भेट देतात. त्यांच्या कामाची पध्दत जाणून घेतात, असे परमवीर जेजूरकर यांनी सांगितले.

Self Help Group
Cashew Seeds : काजू बीच्या हमीभावासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार

महिलांना रोजगार

झेप महिला बचत गटामध्ये प्रिया योगेश तोसकर (अध्यक्ष), नम्रता नीलेश बिर्जे (सचिव), वृषाली कदम, स्नेहाली कदम, शीतल चंदूरकर, अंकिता चंदुरकर, अर्चना बहुतूले, गिरिजा चंदूरकर, दर्शना बहुतूले, अपूर्वा तोसकर, वैशाली तोसकर, ममता तोसकर या महिला कार्यरत आहेत. काजू प्रक्रिया उद्योगात बचत गटातील अकरा महिलांना रोजगार मिळाला आहे.

महिन्यातील पंधरा दिवस प्रक्रियेचे काम सुरु असते. प्रत्येक महिलेस प्रतिदिन १५० रुपये मानधन दिले जाते. काम करेल त्या सदस्याला पैसे असे नियोजन गटाने केले आहे. शेती आणि घरगुती कामे सांभाळून या महिला काजू प्रक्रिया उद्योगामध्ये काम करतात. त्यामुळे आर्थिक मिळकत वाढीला चालना मिळाली आहे.

शेतकऱ्यांकडून काजू बी खरेदी

परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून मार्च ते मे या कालावधीमध्ये काजू बी खरेदी केली जाते. यासाठी बचत गटातील भांडवलाचा वापर केला जातो. सरासरी ११० ते १२० रुपये प्रति किलो दराने काजू बी मिळते. खरेदी केलेली बी तीन वेळा उन्हात सुकविण्यासाठी ठेवली जाते.

त्यानंतर गोणीमध्ये भरून कोरड्या खोलीत ठेवतात. पावसाळ्यात शेतीची कामे असल्यामुळे दोन महिने काजू बी प्रक्रिया उद्योग बंद असतो. ऑगस्ट महिन्यानंतर काजू बी प्रक्रिया सुरु होते. काजूगरास गणपती, दिवाळी, शीमगोत्सव या कालावधीत मोठी मागणी असते.त्यानुसार उत्पादन आणि विक्रीचे नियोजन केले जाते.

वृषाली कदम ९६७३२१५५६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com