Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Adaptive Agriculture : हवामान बदलाच्या काळात विविध संकटांशी लढताना डगमगून न जाता त्यास अनुकूल शेती करणे गरजेचे आहे. खिर्डी (जि. छ. संभाजीनगर) येथील तिघा वरकड बंधूंनी याच संकल्पनेवर विश्‍वास ठेऊन ती आपल्या ४२ एकरांत प्रत्यक्ष उतरवली आहे.
Varkad Brothers and Farm
Varkad Brothers and FarmAgrowon

संतोष मुंढे

Indian Agriculture : हवामान बदलाचे परिणाम जगभरात जाणवत आहेत. त्यावर संशोधन, चिंतन, उपाय शोधणे या गोष्टींमध्ये तज्ज्ञांबरोबर शेतकरीही मागे नाहीत. कल्पकता, प्रयोगशीलतेतून शेतकरी हवामान बदलाला सुसंगत असे शेतीत बदल करताना दिसत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिर्डी (ता. खुलताबाद) येथील वरकड बंधू हे त्यापैकीच एक आहेत. मजूरटंचाई, वाढता उत्पादन खर्च पाहता शेती परवडणारी नाही असे सातत्याने म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही वरकड यांची शेती आदर्श आहे.

अशी आहे वरकड यांची शेती

भाजीपाल्याचं गाव म्हणून खिर्डी गावची ओळख आहे. येथे राजेंद्र कमलाकर वरकड व त्यांचे बंधू विजय आणि मनसुब या तीन बंधूंची संयुक्त ४२ एकर शेती आहे. सन २००० पर्यंत त्यांची शेती तशी हंगामी पिकांची व पारंपरिक अशीच होती. निसर्गाच्या भरवशावर जमतील तशी पिके घ्यायची असा प्रपंच सुरू होता.

शेतीत केलेला खर्चही वसूल होत नव्हता. दुष्काळाची समस्या होतीच. सन २००३ मध्ये तर परिस्थिती अधिक भीषण झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने शेतीत बदलाचा स्वीकार काय करावा याचं चिंतन सुरू झालं. त्यासाठी विविध ठिकाणी जाऊन माहिती घेणे, प्रशिक्षण घेणे, पाणी फाउंडेशनसारख्या विधायक संस्थेसोबत विजयराव यांनी जोडून घेतले.

Varkad Brothers and Farm
Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

पीकपध्दतीत केला बदल

पीकपध्दतीत बदल करताना सन १९९३-९४ मध्ये पाच एकरांवर केसर आंब्याची लागवड केली. हंगामी पिके घेणे सुरू होते. सन २००७-८ मध्ये पुन्हा दोन एकरांत केसर आंब्याची लागवड केली. सन २०११-१२ पर्यंत दरवर्षी साधारणतः: २ ते ५ एकरांवर आले पीक होते. सन २०१६-१७ मध्ये साडेचार एकरांत सागवान लागवड केली.

त्याच वर्षी तीन एकरांत व पुढे २०१८-१९ मध्ये चार एकर अशी दोन टप्प्यांत सात एकरांत सीताफळ लागवड केली. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत एका पिकावर अवलंबून न राहाता बहुविध पध्दतीचा ‘पॅटर्न’ ठेवला. सागवानाला आता सुमारे सहा वर्षे झाली आहेत.

दहा ते बारा वर्षांनी त्यापासून व्यावसायिक उत्पन्न सुरू होईल. एका कंपनीसोबत करार करून २०२३-२४ मध्ये दोन एकरांत निलगिरीची लागवड केली आहे. जनावरांसाठी १५ गुंठ्यात कायमस्वरूपी लसूणघास घेण्यात येतो.

शेततळ्यांची भक्कम व्यवस्था

तेरा वर्षांपूर्वी संपूर्ण शेताची बांधबंदिस्ती केली. पाण्याची शाश्‍वत सोय म्हणून शासकीय योजनेतून दोन शेततळी उभारली. यात पहिले ३५ बाय ३५ मीटर लांबी-रुंदीचे प्लॅस्टिक कागद अंथरलेले शेततळे २००६ मध्ये घेतले. खरे तर त्यानंतर मनासारखा पाऊस झाला नाही.

शेततळे भरले नाही. मग त्याच वर्षी ६० बाय ४० फूट आकाराचे प्लॅस्टिक कागदाविनाचे शेततळे स्वखर्चातून उभे केले. सन २०१० मध्ये २५ बाय २५ मीटर लांबी-रुंदीचे तिसरे शेततळे घेतले. पहिल्या शेततळ्यातील पाणी हिवाळ्यात होतो.

तर तिसऱ्या शेततळ्यातील पाणी उन्हाळ्यात मे-जूनच्या दरम्यान राखीव पाणी म्हणून केला जातो. सर्व शेतीतून, शेततळ्यातून बाहेर पडणारे पाणी शेतालगतच्या एका पाणथळ जागेत साधारणतः ६० बाय ४० फूट आकाराच्या एका जागेत अडविण्याची सोय केली.

सुमारे १४ वर्षापूर्वी केलेल्या बांधबंदिस्तीमुळे शेतात पडणारे पाणी शेतातच मुरणे सुरू झाले. शेतालगतच्या पाणथळ जागेत अडविलेले पाणी त्याच ठिकाणी मुरल्याने आसपासच्या विहिरीला पाझरून येण्यास मोठी मदत होत आहे.

Varkad Brothers and Farm
Success Story : हवामानाला अनुकूल शेती पद्धतीचा साधला विकास

बांधावर झाडे

विजय सांगतात की बांधावर झाडे तयार केलीत तर नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कमी करता येईल. त्यामुळे जांभूळ, चिंच, कवठ,कडुनिंब, भोकर, पळस, पिंपळ, उंबर, बाभूळ, बोर, आपटा आदी नानाविध झाडांचे जतन त्यांनी बांधाच्या जागेला केले आहे.

उत्पादन व उत्पन्न

केसर आंब्याची बाग जुनी आहे. त्यातून एकरी तीन टन यानुसार दोन एकरांत सहा टनांपर्यंत उत्पादन मिळते. आंबा जागेवरून विकला जातो आहे. त्याला किमान ७० ते १०० रुपये प्रति किलोचा दर मिळतो. बाग नवी असताना त्यामध्ये हरभरा, ज्वारी, गहू, हळद, ताग अशी पिके घेतली.

करारावरील निलगिरीची दर तीन वर्षांनी तोड असून एकरी ४० ते ५० टनांपर्यंत लाकूड अपेक्षित आहे. सुमारे बारा वर्षांच्या करार कालावधीत एकूण चार वेळा तोडणी होईल. सागवानातही सुरवातीच्या काळात प्रत्येकी दोन वेळा आले व हळद आणि एक वेळ सोयाबीन आंतरपीक म्हणून घेतले. सीताफळातही दोन वर्ष आले आणि कांदा बीजोत्पादन प्रयोग करून पाहिला. या आंतरपीक पध्दतीमुळे मुख्य पिकातील खर्च कमी होण्यास मदत झाली.

देशी गोपालन व सेंद्रिय निविष्ठांचा वापर

साधारण २०१२ पासून रासायनिक खतांचा वापर जवळपास थांबवला किंवा कमी केला आहे. त्याऐवजी जिवाणू संवर्धके, जीवामृत, गोमूत्र, दशपर्णी अर्क यांचा वापर होतो. चार गीर गायींचे संगोपन केले जात आहे. सतराशे लिटरच्या टाकीत स्लरीची निर्मिती केली जाते. याशिवाय चिकट, कामगंध सापळे, निंबोळी अर्क आदींचा वापरही करण्यात येतो.

संरक्षित शेती : दुष्काळ, पाऊस, प्रतिकूल हवामान आदी बाबी लक्षात घेता वर्षभरापूर्वी वरकड संरक्षित शेतीकडे वळले असून एक एकरांत पॉलीहाउसची उभारणी केली आहे. त्यात सहा रंगांची जरबेरा फूलशेती केली आहे.

सुमारे सहा महिन्यापासून दर चार ते पाच दिवसांनी ८ ते १० हजार फुले या प्रमाणात उत्पादन मिळत आहे. प्रति फूल १.५० पैसे ते ४ रुपये असा दर मिळत आहे. फूलशेतीतून कुशल मजुरांना रोजगार मिळू लागला आहे. शिवाय पूरक उद्योगाप्रमाणे वरकड बंधूंच्या हाती पैसा खेळता राहतो आहे.

बीजोत्पादन :खरिपात सोयाबीन सुमारे १५ एकर, तूर ५ ते ६ एकर, रब्बीत हरभरा ७ ते ८ एकर, कांदा २ ते ३ एकर या प्रमाणे बीजोत्पादन घेतले जाते. त्यासाठी बियाणे कंपनीसोबत करार केला आहे. यात कांद्याचे एकरी ३ ते ४ क्‍विंटलपर्यंत, सोयाबीनचे १० ते १२ क्विंटल व काहीवेळा १४ क्विंटलपर्यंत, हरभऱ्याचे ८ ते १० क्विंटल असे उत्पादन मिळते.

विजय वरकड ९८८१०३०४८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com