Success Story : गोधडीला मिळाला आधुनिकतेचा बाज

Article by Rajkumar Chaugule : कोल्हापूरमधील स्मिता राजेश खामकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून लोप पावत असलेल्या गोधडी शिवण कलेला आकर्षक बाज देत बाजारपेठ तयार केली. गोधडीमध्ये नवनवीन पॅटर्न आणून ‘संस्कार शिदोरी‘ हा ब्रॅण्ड तयार केला.
Sanskar Shidori
Sanskar ShidoriAgrowon

Godhadi Sewing Art : कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या स्मिता राजेश खामकर या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. याशिवाय त्यांनी योगाचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे पती राजेश हे मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. स्मिताताई इनरव्हील क्लबसह विविध सामाजिक संस्थांच्या विविध उपक्रमात सहभागी असतात. स्मिताताईंना नावीन्यपूर्ण कलाकुसरीची आवड आहे. यातूनच त्यांना लुप्त होत चाललेल्या गोधडी कलेस नवी दिशा देण्याचा विचार मनात आला.

याच दरम्यान कोरोना काळामध्ये अनेक व्यवसाय बंद पडले. परिसरातील महिलांना नवीन रोजगार देण्यासाठी स्मिताताईंनी २०२१ मध्ये गोधडी निर्मिती सुरु केली. महिलांच्या हाताला काम देणे त्यांचा प्रमुख उद्देश होता. लॉकडाऊनमध्ये अनेक गरजू कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली होती. कर्त्या पुरुषांचा कामधंदा, नोकरी गेली, तर कुणाला कोरोनाने हिरावून नेले. अशा कुटुंबातील महिलांना रोजगार देण्यासाठी त्यांनी गोधडी निर्मिती व्यवसायाला चालना दिली.

गोधडी परंपरेला आधुनिकतेचा साज :

ग्रामीण भागात अजूनही जुन्या वापरलेल्या साड्यांपासून घराघरात गोधडी शिवली जात असली तरी शहरात हे प्रमाण कमी झाले आहे. अनेकांना तर गोधडी म्हणजे काय हे देखील माहीत नसते. गोधडीतून मिळणारी मायेची ऊब प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जाते,त्याच्याशी मनाचा हळवा कोपरा जोडलेला असतो.

हे लक्षात घेऊन गोधडीच्या ग्रामीण परंपरेला आधुनिक टच देत नवीन कापडापासून गोधडी बनविण्यास सुरवात झाली. ही गोधडी जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी पॅटर्न, कापडाची रंगसंगती आणि फिनिशिंगमध्ये बदल करण्यात आले. गरजू महिलांच्या प्रयत्नातून ही गोधडी नव्या रूपात आणि नव्या दिमाखात आकाराला येऊ लागली. या गोधडीच्या विक्रीसाठी त्यांनी ‘संस्कार शिदोरी‘ हा बॅन्ड तयार केला.

Sanskar Shidori
Agriculture Success Story : प्रयोगशीलता जपत शेतीतून साधली प्रगती

महिलांसाठी प्रशिक्षणाची सोय :

सुरवातीच्या काळात स्मिताताईंनी वीस गरजू महिलांना गोधडी कशी शिवायची याचे प्रशिक्षण दिले. गोधडी शिवणाऱ्या महिलांच्याकडून विविध पॅटर्न शिकून घेतले तर काही नवीन पॅटर्न तयार केले. आता या महिला शिलाईमध्ये तरबेज झाल्यानंतर गोधडी निर्मिती आणि विक्रीला सुरवात केली. मागणी आणि पॅटर्ननुसार गोधडीची मशिन शिलाई, हात शिलाई करून घेतली जाते.

गोधडी निर्मिती आणि विक्रीला सुरवात झाली तेवढ्यात पुन्हा कोरोना काळातील संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने गोधडीची विक्री फेसबुकसारख्या समाज माध्यमावरून सुरू केली. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हा व्यवसाय वाढत गेला. आतापर्यंत स्मिताताईंनी सुमारे अडीच हजार महिलांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. अनेक नामवंत संस्थेमार्फतही त्यांनी हजारो महिलांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते.

गोधडीचा पारंपारिक बाज कायम ठेवत स्मिताताईंनी पॅटर्नमध्ये आधुनिकता आणली आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या मऊदार दुपट्यापासून ते हॉल, किचनमध्ये अंथरायचे कार्पेट, सिंगल-डबल बेडसाठी गोधडी, दुपट्टा पॅटर्न अशा वेगवेगळ्या आकारात आणि डिझाईनमध्ये गोधडी निर्मिती केली जाते. याशिवाय विविध सणांसाठी भेटवस्तू देण्यासाठी उपयुक्त असणारे बटवे, वॅाल हँगिंग, कार्पेट आदि प्रकारही गोधडी पॅटर्नमध्ये उपलब्धकरून दिले आहेत. बाजारपेठेची मागणी आणि ग्राहकांची आवड लक्षात घेऊनच विविध उत्पादनांचे पॅटर्न तयार केले जातात.

एकत्रित कल्पनेतून जोडला धागा

गोधडी तयार करण्यासाठी कापडाचा दर्जा महत्त्वाचा असतो. गोधडीच्या आकारानुसार विविध प्रकारच्या, रंगसंगतीच्या कापडाची गांधीनगर बाजारपेठेतून खरेदी होते. महिन्याला सुमारे पन्नास हजार रुपयांचे कापड खरेदी केले जाते. स्मिताताईंनी शिवाजी पेठेमध्ये गोधडी निर्मितीचे केंद्र सुरू केले आहे.

कापड आणल्यानंतर या केंद्रामध्ये स्मिताताईंसह सहकारी महिलांच्या कल्पनेतून गोधडीचे डिझाईन तयार केले जाते. हे डिझाईन तयार करताना कल्पना शक्तीचा कस लागतो. त्यातून नवीन आकार तयार होतो. या केंद्रातून प्रशिक्षित महिलांना गोधडी शिवायला दिली जातात. महिला त्यांच्या वेळेनुसार गोधडी शिवून देतात. एक गोधडी शिवण्यासाठी आकारमान आणि डिझाईन नुसार तीन दिवसापासून ते पंधरा दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो.

Sanskar Shidori
Success Story of Basil Farming : तुळस शेतीने आणला शेतकऱ्यांच्या संसारात बहर

गोधडी शिवताना मधल्या मुख्य डिझाईनचे कापड मशिनवर शिवले जाते. एकदा गोधडीचा आकार तयार झाला की, मग हाताने उभे आडवे धाव टाके घातले जातात. ही गोधडी दिसायलाही आकर्षक असते. धाव टाक्यामुळे गोधडीचा पारंपरिक बाज जपला जातो. गोधडी ही शिलाई यंत्रावर तसेच हात शिलाई पद्धतीनेही तयार केली जाते.

साधारणपणे गोधडीच्या डिझाईननुसार ३०० ते १००० रुपयांपर्यंत महिलांना शिलाई दिली जाते. सध्या स्मिताताई २०० महिलांकडून मागणीनुसार गोधडी शिवून घेतात. यातून प्रत्येक महिलेची घरबसल्या दरमहा ३००० ते ४००० रुपयांची कमाई होऊ लागली आहे.

गोधडीची विक्री प्रामुख्याने प्रदर्शनातून होते.तसेच सोशल मिडीयावरही गोधडीची जाहिरात केली जाते. स्मिताताई इनरव्हील क्लबशी संबंधित असल्याने अनेक महिलांशी त्यांचा दररोजचा संपर्क आहे.यातून त्यांना उत्सव, प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळते. याच बरोबर महिला तसेच महाविद्यालयात गोधडी शिकविण्याचे प्रशिक्षण त्या देतात.

यातूनही गोधड्यांची विक्री करतात. गोधडीसोबतट दुप्पटे, बटवे आदींनाही बाजारपेठेत चांगली मागणी आहे. बटवा ५० ते ३५० रुपये, दुप्पटा ८०० ते १५०० रुपये आणि डिझाईन आणि आकारानुसार गोधडीची किंमत १,००० ते ३,५०० रुपये आहे. या उत्पादनांना राज्यभरातून मागणी असते. या सर्व उत्पादनांच्या विक्रीतून स्मिताताईंना दहा टक्यापर्यंत नफा रहातो.

२१ बाय २१ फूट महागोधडी

स्मिताताईंनी २०२२ साली दसऱ्याच्या पाचव्या माळेला एक हजार गोधडी विणणाऱ्या महिलांच्या सहभागातून २१ फूट बाय २१ फूट आकाराची महा गोधडी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण केली. याशिवाय शिवाजी पेठेतील गणपती मूर्तीला कलाकुसरीचे वस्त्र प्रदान करण्यात आले. हे केवळ महिलांच्या संघटीतपणामुळे शक्य झाले. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमातून गोधडीबाबत जागृती करण्याचा स्मिताताईंचा प्रयत्न असतो.

संपर्क : स्मिता खामकर,९८६०१२८१५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com