
दिवाळी संपून आता तुळशी विवाहांना प्रारंभ होतो. पुन्हा एकदा सर्वत्र उत्साह व चैतन्यमय वातावरण तयार होऊन जाते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे श्री विठ्ठलाचे देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने येथे तुळशीला दररोज मोठी मागणी असते. साहजिकच पंढरपूर नजीक असलेली अनेक गावांनी तुळशीच्या शेतीची परंपरा अनेक वर्षांपासून जोपासली आहे. यामध्ये कासेगाव, गोपाळपूरसह कोर्टी, देगाव, अनवली अशा पाच-सहा गावांचा प्रामुख्याने समावेश होतो. एक-दोन गुंठे, अर्धा एकर, एक एकर अशा स्वरूपात येथील अल्पभूधारक शेतकरी तुळशीची शेती करतात. या सर्व गावांमध्ये मिळून हे क्षेत्र ७० ते ८० एकरांपर्यंत असावे. प्रत्येक शेतकरी दररोज ५०० ते ६०० रुपयांचे उत्पन्न हमखास मिळवतो. जोडीला गुलाब, झेंडू, शेवंती, वेलवेटसारख्या फुलशेतीचीही जोडही काहींनी दिली आहे.त्यामुळे त्यांच्या संसाराला उत्पन्नाची हमी मिळाली आहे.
तुळशीचे महत्त्व व प्रकार
श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचे रूप मानले जाते आणि तुळस हे श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे. श्री लक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते. त्यामुळे ती श्री विठ्ठलाला प्रिय आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवाय आरोग्यदायी म्हणूनही तुळशीचे वेगळे महत्त्व आहेच. राम तुळस, हनुमान तुळस, कृष्ण तुळस, देशी (रान) तुळस असे तिचे विविध प्रकार आहेत. त्यातही श्री विठ्ठलाला वाहण्यासाठी देशी तुळशीचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे तिची लागवड अधिक होते. तिची पाने हिरवी व मंजिरी लालसर असते. रामतुळशीच्या मंजिऱ्या पांढऱ्या असतात. हनुमान तुळशीची पाने मोठी, मंजिऱ्या पांढऱ्या असतात. तर कृष्ण तुळशीची पाने हिरवी आणि मंजिरी काळसर असते.
लागवडीचे नियोजन
मंजिरीतील बिया वेगळ्या करून सुकवून वाफ्यांमध्ये त्याच्या रोपे तयार केली जातात व नंतर त्यांची लागवड केली जाते. सुमारे दोन ते अडीच महिन्यांत उत्पादनास सुरुवात होते. ते वर्षभर सुरू राहते. पुढील वर्षी मात्र नव्याने लागवड करावी लागते. हिरवी, झुपकेदार पाने आणि काळ्या-सावळ्या मंजिऱ्या तुळशीचे सौंदर्य खुलवतात. ही गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन वरती गोलाकार पद्धतीने काढणी केली जाते. खाली नव्याने फुटवे येत राहतात. दर पंधरा दिवसांनी काढणी होते. वर्षभर मागणी असल्याने त्यानुसार उत्पादन मिळात राहावे यासाठी टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन असते.
विक्री, पण लिलाव नाही
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात तुळस-फुलांचे विक्रेते आहेत. त्यांना शेतकरी तुळशीची थेट विक्री करतात. महात्मा फुले चौकातील मंडईतही शेतकरी दररोज सकाळी तुळशीची गाठोडी घेऊन जातात. देवाला प्रिय असणाऱ्या तुळशीचा व्यवहार करायचा नाही या हेतूने कोणत्याही प्रकारे वजन केले जात नाही किंवा लिलावही होत नाही, घेणारा आणि देणारा अशा दोघांकडून अंदाजे किंमत ठरवली जाते. साधारण पाच ते सहा किलोचे गाठोडे असते. त्याला प्रत्येकी २०० ते ५०० रुपये दर मिळतो.
तुळशीहार निर्मितीतील कुटुंब
काही शेतकरी तुळस उत्पादनासह छोट्या तुळशीमाळा, तसेच मोठे तुळशीहार तयार करून विक्री करतात. कासेगावमधील दावलेमळा येथील अजय दावले त्यापैकीच तरुण शेतकरी. आपल्या चार एकरांपैकी दीड एकरात ते तुळस, अर्धा एकर गुलाब व गुलछडी घेतात. भाऊ शुभमसह आई, आजी-आजोबांसह संपूर्ण कुटुंब दोन फूट ते २० फूट लांबीपर्यंतचे तुळशीहार बनविण्यात दररोज व्यग्र असते.लांबीनुसार ५०० ते २००० रुपयांपर्यंत त्याचे दर असतात. पंढरपूर परिसरातील भक्त आणि व्यापारी त्यांच्याकडे आगाऊ मागणी नोंदवतात. पुणे, लातूर, नांदेड, परभणी, नाशिक, गंगाखेड, लोहा, यवतमाळ तसेच कर्नाटकातील विजापूर उमदी भागांतूनही तुळशीहारांना नियमित मागणी असते. विशेषतः श्रावणात मागणी सर्वाधिक असते.
तुळशीच्या खोडापासून माळा
तुळशीच्या वाळलेल्या खोडापासून माळा तयार केल्या जातात. पंढरपुरात काशीकापडी समाजातील सव्वाशेहून अधिक कारागीर या लघुउद्योगात आहेत. आजही पारंपरिक पद्धतीने रहाटाच्या साह्याने तुळशीच्या खोडावर विविध प्रकारे चकत्या पाडून माळेतील मण्यांना आकार दिला जातो. या माळांना प्रमुख वारीसह भाविकांकडून वर्षभर मागणी असते. आकार व कौशल्यरूपी कामानुसार दर ठरलेले असतात.
अजय दावले ८८५६८२८५५६, अशोक दावले ९९७५४३४२४७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.