Goat Rearing : कोरडवाहू शेतीला मुख्य आधार शेळीपालनाचा

Article by Santosh Munde : जालना जिल्ह्यातील राममूर्ती(ता. जालना) येथील प्रयोगशील शेतकरी सुरेशराव आसाराम रोडगे यांनी आधी ब्रॉयलर कुक्कुटपालन करून पाहिले. त्याचा अर्थकारण कुटुंबासाठी फायदेशीर ठरत नसल्याने वेळीच ते थांबवण्याचा निर्णय घेतला.
Sureshrao Shedge and Goat Farming
Sureshrao Shedge and Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

संतोष मुंढे

Goat Management : जालना जिल्ह्यातील राममूर्ती (ता. जालना) येथील प्रयोगशील शेतकरी सुरेशराव आसाराम रोडगे यांची सुमारे १९ एकर संपूर्ण कोरडवाहू शेती आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, रब्बी ज्वारी अशी त्यांची पीक पद्धती आहे. कुटुंबात पत्नी सीता, मुलगा आकाश, त्याची पत्नी सौ. पूजा, दुसरा मुलगा विकास, त्याची पत्नी सौ. वर्षा आणि दोन्ही मुलांच्या दोन मुली असे मिळून दहा सदस्यांचे हे कुटुंब आहे.

पूरक व्यवसायाचा आधार

निसर्गाच्या भरवशावर सारं काही असल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवणे कठीण होते. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे महत्त्वाचे होते. त्यासाठी सुरेश यांनी मुलगा आकशच्या मदतीने ब्रॉयलर कुक्कुटपालनाचा पर्याय निवडला. त्यासाठी गुंतवणूक, शेडची उभारणी करून २०१६ मध्ये व्यवसाय सुरू केला.

दरवर्षी दर दोन महिन्यांत एक अशा वर्षभरात सहा बॅचेस ते बाराशे पक्षांच्या घ्यायचे. सन २०१८ पर्यंत हा प्रपंच सुरू राहिला. प्रति बॅचमागे कधी वीसहजार, कधी ३० हजार तर अनेकदा पदरात काहीच पडत नव्हते. त्यामुळे जमाखर्चाचा हिशोब लावता कुक्कुटपालन फायदेशीर ठरत नसल्याचे जाणवले. त्यामुळे २०१८ मध्ये हा व्यवसाय थांबवला.

Sureshrao Shedge and Goat Farming
Goat Farming : शेळ्यांना पौष्टिक खाद्यासाठी विविध चारा पिकांचे नियोजन

उस्मानाबादी शेळीचे संगोपन

समस्येतून मार्ग काढण्यासाठी व अन्य पूरक व्यवसायाचा पर्याय शोधण्यासाठी रोडगे जालना येथील कृषी विज्ञान केंद्रात पोचले. तेथे त्यांना कोरडवाहू शेतीला उस्मानाबादी शेळीपालनसारखा जोडव्यवसाय शास्त्रीय पद्धतीने करण्याचा सल्ला पशुतज्ज्ञ डॉ. हनुमंत आगे यांनी दिला.

त्याचे प्रशिक्षणही रोडगे दांपत्याने घेतले. जून २०१७ मध्ये एक बोकड व पाच उस्मानाबादी शेळ्या सुखापुरी येथील बाजारातून आणल्या. सुमारे ३५ हजारांची गुंतवणूक करून अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन सुरू केले.

व्यवस्थापनातील बाबी

कुक्कुटपालनासाठी उभारलेल्या शेडचाच वापर शेळीपालनासाठी झाला. रात्रीच्या वेळे, सुरक्षिततेसाठी शेडला तारांच्या जाळीचे कुंपण केले. बाकी दिवसा शेळ्या मुक्तपणे सोडण्याचे नियोजन केले. कुटुंबातील सर्व सदस्य सकाळपासून कामास लागतात. सकाळच्या सत्रात परिसराची स्वच्छता होते. मुक्त शेडमध्येच छोटे हौद तयार करून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

आरोग्याची काळजी म्हणून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण व अन्य आरोग्य विषयक दक्षता घेण्यात येते. शेतातील चाऱ्यासह वर्षातील आठ महिने शेताच्या बाजूला असलेल्या डोंगर देखील चाऱ्यासाठी उपयोगी ठरतो. सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत शेळ्या चरण्यासाठी सोडल्या जातात. पाच एकरांत बांधावर सुबाभूळ व बोरींचा झाडपाला आहे. तुती, ज्वारीचा कडबा, मका यांचाही उपयोग होतो.

Sureshrao Shedge and Goat Farming
Goat Poultry Farming : शेळी, कुक्कुटपालनावर भर द्यावा : डॉ. भिकाने

शेळ्यांची वृद्धी व विक्री व्यवस्था

टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षी १०, २०, ४० असे करीत पाचव्या वर्षी ६० पर्यंत शेळ्यांची संख्या वाढत गेली. पाटी घरी ठेवायची व बोकड विकायचा असा सुरवातीचा नित्यक्रम होता. सन २०२१ ते २३ दरम्यान दरवर्षी निश्‍चित स्वरूपात शेळ्या ठेवून त्यापेक्षा अतिरिक्त पाटी, बोकड वा पिल्ले विकण्याचे तंत्र अवलंबिले. आत्ताच्या घडीला लहान मोठ्या मिळून सुमारे ५० पर्यंत शेळ्या आहेत.

दरवर्षी ४० ते ५० शेळ्यांची सरासरी विक्री होते. वजनानुसार व बाजारात मिळणारे दर लक्षात घेऊन हे नियोजन केले जाते. आजपर्यंत कुठल्याही बाजारात विक्रीसाठी न जाता व्यापाऱ्यांना थेट शेडवर बोलावून जागेवरच विक्री साध्य केली आहे. व्यापारी येण्याआधीच काट्यावर वजन करून ठेवले जाते. वजनानुसार साडेपाचशे ते सहाशे रुपये प्रति किलो दर मिळेल या पद्धतीने व्यापाऱ्यांसोबत व्यवहार होतो. प्रति नग पाच ते सात हजारांच्या दरम्यानच विक्री केली असल्याचे रोडगे सांगतात.

शेतीपेक्षा किफायतशीर अर्थकारण

यंदा विहीर खोदण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या दहा शेळ्या व ३० लहान पिल्ले मिळून ४० शेळ्यांची विक्री केली त्यातून दोन ते सव्वा दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून शेती सिंचनाखाली आणण्याचे महत्त्वाचे काम करता आले.

संपूर्ण कोरडवाहू शेतीतील खर्चाचा विचार करता या हा व्यवसाय अधिक किफायतशीर असून त्यातून कमी गुंतवणुकीत अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न दरवर्षी मिळते असे रोडगे सांगतात.

लेंडी खताचा अतिरिक्त फायदा

दरवर्षी पाच ते सहा ट्रॉली घरचे लेंडीखत उपलब्ध होऊ लागल्याने रासायनिक खतांचा वापर निम्म्याहून अधिक कमी केला आहे. त्यामुळे शेतीतील उत्पन्न खर्च कमी झाला असून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. शेळीपालन प्रशिक्षण घेतल्याने व्यवस्थापनातील सर्व बाबी आत्मसात करणे सोपे झाले.

हवामान बदलासारख्या अनेक संकटांनी शेती व शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत, अशा परिस्थितीत अल्पभूधारक व मध्यम शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेऊन तसेच एक ते दोन शेळ्या विकत घेऊन व्यवसायास सुरवात करता येते. तीन ते चार वर्षांमध्ये २५ ते ३० शेळ्यांचा चांगला ‘फार्म’ तयार करता येतो. तीन ते चार वर्षानंतर दरवर्षी अडीच ते तीन लाख रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याची त्याची क्षमता आहे.
डॉ. हनुमंत आगे, विषय विशेषज्ज्ञ, (पशुविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना
Summary

सुरेश रोडगे, ९५०३५६०४३७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com