Satara Drought : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जीहे कठापूर )चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अनेक दशके जी भूमी थेंब थेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत जलपूजन करण्याची संधी आज आपल्याला मिळाली याचा मनस्वी आनंद होत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, निरा देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात १२१ कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या भागात पाणी यावे यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी अथक परिश्रम आणि मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षाला आज चांगले फळ आले आहे. आपण विदर्भातून असल्याने दुष्काळी जनतेला ज्या यातना भोगाव्या लागतात त्याची जाणीव आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातील दुष्काळ संपविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी योजना गतीने पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे ते म्हणाले.
माण खटाव तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गुरुवर्य काही लक्ष्मण रावजी इनामदार उपसा सिंचन (जिहे कठापूर ) योजनेला फेर मान्यता देण्यात आली आहे. त्यातून माण तालुक्यातील २७ गावे व खटाव तालुक्यातील ४० गावी अशी एकूण ६७ गावे व त्यातील एक लाख ७५ हजार ८०३ लाभधारकांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे.
यातून २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेसाठी जवळपास १३३१ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते याचे या रूपाने फार मोठे मॉडेल तयार झाले आहे..
जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्यास आपण सुरुवात केलीय त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेर वाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्याच्या समर्पित भावनेने आमदार जयकुमार गोरे यांनी काम केल्याचे सांगितले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवधर, सोळशी धरणांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी विविध पाणी योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. दुष्काळी भागामध्ये उद्योग उभे राहावे यासाठी कॉरिडॉरचा विषय लवकर तडीस न्यावा, असे आवाहन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.