Goat Farming : शेळ्यांना पौष्टिक खाद्यासाठी विविध चारा पिकांचे नियोजन

Article by Krushna Jomegaonkar : पारंपरिक शेती सोबतच विविध चारा पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून अटकळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील प्रयोगशील शेतकरी अजित माणिकराव अटकळीकर यांनी अर्ध बंदिस्त शेळीपालन सुरू केले.
Goat Rearing
Goat RearingAgrowon

Goat Management : अटकळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील अजित अटकळीकर यांचा वडिलोपार्जित शेती व्यवसाय आहे. ३० एकर शेतीमध्ये ते दरवर्षी खरिपामध्ये सोयाबीन, तूर, रब्बीमध्ये गहू, हरभरा, ज्वारी लागवड करतात. परंतु दरवर्षी ओढवणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्याचे निश्‍चित केले.

२०१७ मध्ये अटकळीकर यांनी स्थानिक जातीच्या शेळ्या निवडून शेतामध्ये अर्ध बंदिस्त शेळीपालन सुरू केले. यासाठी त्यांनी ६० फूट बाय २२ फूट आकाराची शेड बांधली. शेळ्यांना मुक्तपणे फिरता यावे यासाठी ५० फूट बाय ६० फूट आकाराचा मुक्त संचार गोठा बांधला आहे. त्यामध्ये विविध कप्पे केले आहेत. परंतु स्थानिक जातीच्या शेळ्यांचे वजन वाढण्यासाठी लागणारा कालावधी अधिक असल्यामुळे त्यांनी बिटल जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्याचे ठरविले.

बिटल शेळ्यांची निवड

अटकळीकर यांनी २०१९ मध्ये स्थानिक शेळ्या कमी करून बिटल जातीच्या शेळ्यांचे पालन करण्याचा निश्‍चय केला. यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील शेळीपालकाकडून बिटल जातीच्या पाच शेळ्या आणि एका बोकडाची खरेदी केली. या शेळ्यांचे वजन झपाट्याने वाढते. या जातीच्या बोकडाला बाजारात चांगली मागणी असल्याने विक्री करण्यासाठी अधिकचे कष्ट करावे लागत नाहीत.

सध्या अटकळीकर यांच्याकडे २५ बिटल शेळ्या आहेत. या शेळ्यांसाठी त्यांनी एक एकर क्षेत्रावर तुती, नेपिअर गवत, लुसर्न या चारा पिकांची लागवड केली आहे. यासोबत रब्बी ज्वारीपासून उपलब्ध होणारा कडबा शेळ्यांना दिला जातो. हिरव्या व वाळलेल्या चाऱ्यापासून शेळ्यांचे चांगल्या प्रकारे पोषण होते. शेळ्यांची योग्य वाढ होते. वजनही चांगल्या प्रकारे वाढते, असा त्यांचा अनुभव आहे.

Goat Rearing
Goat Management : तापमानाचा अंदाज घेऊन शेळी व्यवस्थापनावर भर

तुती, नेपिअर, लुसर्न लागवड

अटकळीकर यांनी बहुवार्षिक चारा देणारे पीक म्हणून २० गुंठे क्षेत्रावर आठ फूट बाय दहा फूट अंतरावर तुतीच्या व्ही-वन या जातीच्या २०० रोपांची लागवड केली आहे. लागवडीनंतर वर्षभराने त्यांनी तुतीच्या फांद्या तिन्ही बाजूने दोरीच्या साह्याने खुंटीला बांधल्या. यामुळे झाड डेरेदार होऊन फांद्यांचे प्रमाण वाढले.

असा प्रयोग त्यांनी कर्नाटक राज्यात बघितला होता. तुतीच्या झाडांची उंची दहा फुटापर्यंत होते. तुतीची पहिली कापणी ६० दिवसांनंतर होते, त्यानंतर दर ४५ दिवसांनी छाटणी केली जाते. दररोज किमान ५० किलो तुती चारा उपलब्ध होईल अशा पद्धतीने छाटणीचे त्यांनी नियोजन केले आहे.

तुतीचा पाला शेळी, बोकडासाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेळ्यांच्या दुधाचे प्रमाण वाढून करडांची चांगली वाढ होते. तसेच शेळ्या, बोकडांचे वजन चांगल्या प्रमाणात वाढते.

शेळ्यांना वर्षभर हिरवा चारा मिळावा, यासाठी अटकळीकर यांनी पंधरा गुंठे क्षेत्रावर नेपियर गवताच्या विविध जातींची लागवड केली आहे. लागवडीनंतर पहिल्यांदा साठ दिवसांनी चारा कापणीला येतो. एकदा लागवड केल्यानंतर शेळ्यांना वर्षभर चारा देता येतो. या गवताची जोमदार वाढ होते, उत्पादनही चांगल्या प्रकारे मिळते. या गवतामधून शेळ्यांना प्रथिनांचा चांगल्या प्रकारे पुरवठा होतो. त्यामुळे शेळ्यांच्या आरोग्यासाठी हा चारा चांगला आहे.

शेळ्यांना पौष्टिक चारा मिळण्यासाठी अटकळीकर यांनी पंधरा गुंठे क्षेत्रावर लुसर्न (मेथी घास) या चारा पिकाची लागवड केली आहे. हा चारा शेळ्या आवडीने खातात.

सर्व चारा पिकांना लेंडी खताचा वापर केला जातो. आच्छादन म्हणून वाया गेलेल्या चाऱ्याचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून दर्जेदार चारा मिळत आहे.

Goat Rearing
Goat Poultry Farming : शेळी, कुक्कुटपालनावर भर द्यावा : डॉ. भिकाने

संतुलित आहारावर भर

शेळ्यांना दररोज हिरवा तसेच सुका चारा दिला जातो. प्रति शेळीस सकाळी दीड ते दोन किलो हरभरा, सोयाबीनचे कुटार आणि कडब्याची कुटी मिसळून दिली जाते. मुक्त संचार गोठ्यामध्ये दिवसभर शेळ्यांना हिरवा चारा उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये लुसर्न, नेपियर गवत आणि तुतीची पाने यांचा समावेश असतो.

मोठ्या शेळी, बोकडास पाच ते सात किलो आणि लहान करडांना तीन किलो या प्रमाणात हिरवा चारा दिला जातो. शेळ्यांना दररोज सकस चारा दिला जात असल्याने वेगळा खुराक देण्याची गरज भासत नाही.

शेळ्यांचे व्यवस्थापन

मुक्त संचार गोठा असल्याने शेळ्या, बोकडांचे आरोग्य चांगले राहते. गोठ्यामध्ये चारा आणि पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे पोषण चांगल्या पद्धतीने होते. सध्या अटकळीकर केवळ प्रजोत्पादनासाठी बोकडांची विक्री करतात.

शेळ्यांची विक्री केली जात नाही. दरवर्षी प्रजोत्पादनासाठी परिसरातील शेतकऱ्यांना ४,५ बोकडांची विक्री होते. आठ महिन्यांचा बोकड वजनानुसार २० ते २५ हजारांपर्यंत विकला जातो, असे अटकळीकर सांगतात. कमी चारा आणि कमी व्यवस्थापन खर्चामुळे शेळीपालन वाढविण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

अजित अटकळीकर, ८२७५२३९०५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com