
Hapus Mango : सिंधुदुर्गातील देवगड तालुका हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. याचबरोबरीने काजू, फणस, जांभूळ, नारळ, आवळा, कोकम, मसाला पिकांची लागवडदेखील मोठ्या प्रमाणात आहे. या भागात फळ लागवडीच्या बरोबरीने प्रक्रिया उद्योग देखील वाढतो आहे. जामसंडे- विजयदुर्ग रस्त्यावर नाडण हे फळबागांनी समृद्ध गाव आहे.
या गावातील गीतांजली वेलणकर या पती गणेश वेलणकर, मुलगा गौरीश आणि ऋषिकेश यांच्या सोबत कुटुंबाची २५ एकर शेती सांभाळतात. यामध्ये दहा एकरावर हापूस आंबा बाग आहे. उर्वरित क्षेत्रावर काजू, नारळ आणि भात शेती आहे.
फळबागेच्या बरोबरीने त्यांनी बाजारपेठेची गरज ओळखून प्रक्रिया उद्योगाला देखील चांगल्या प्रकारे गती दिली आहे.
गीतांजली यांच्या सासूबाई विनता वेलणकर या घरगुती वापर आणि किरकोळ विक्रीसाठी आंबा वडी, फणस पोळी, आंबा लोणचे अशी उत्पादने तयार करायच्या. हाच प्रक्रिया उद्योग त्यांनी पुढे नेण्याचा संकल्प केला. घरगुती स्तरावर आंबापोळी, फणसपोळी उत्पादनाच्या बरोबरीने त्यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योगवाढीचा निर्णय घेतला.
माहेरी सांडगी मिरची, पापड, कणीक पीठ तयार करत असल्याने प्रक्रिया उद्योगाची त्यांना पहिल्यापासून माहिती होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात याच उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला. उत्पादने स्वतः तयार करायची आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यांची चव सर्वोत्तम आहे याची खात्री दिल्यानंतर ते उत्पादन ग्राहकांसाठी बाजारपेठेत आणायचे असा एक अलिखित नियम त्यांनी करून ठेवला.
दर्जा आणि वैशिष्टपूर्ण चवीमुळे ग्राहकांकडून प्रक्रिया उत्पादनांना मागणी वाढू लागली. गीतांजलीताईंनी १९९५ पासून घरगुती स्तरावर प्रक्रिया उत्पादनात सातत्याने विविध प्रयोग सुरू ठेवले.
फळ प्रक्रिया उद्योगावर भर
कोवळ्या फणसाची भाजी, तयार गऱ्यांची भाजी, बियांची भाजी,पिकलेल्या फणसाचे गोड गरे आवडीने खाल्ले जातात. परंतु या फणसाचा वापर आवश्यक तितका होत नव्हता. वटपौर्णिमेनंतर फणसाची मागणी कमी होत जाते. फणसाचे विविध उपयोग लोकांना अजूनही माहिती नसल्याने कोकणात दरवर्षी फणस वाया जातो.
त्यामुळे फणस प्रक्रियेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. गीतांजलीताई फणस पोळी, तळलेले गरे अशी उत्पादने तयार करीत होत्याच. ग्राहकांची मागणी आणि ‘ रेडी टू इट’ संकल्पनेतून कोवळ्या फणसाची भाजी आणि गरे भाजी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला.
अल्पावधीतच त्यांनी ही उत्पादने बाजारपेठेत आणली. परिसरातील शेतकऱ्यांकडून फणस खरेदी केला जातो.फळाच्या आकारानुसार दर दिला जातो.
बाजारपेठेतील मागणी वाढल्यामुळे त्यांनी प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दीड लाख रुपयांचे कर्ज काढले. परंतु कर्ज मिळविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते.
प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी त्यांनी पल्पर, बॅनसीलर, ड्रायर, पल्प मिक्सर, हॉटगन, पॅकिंग यंत्र, खवा यंत्राची खरेदी केली. याचबरोबरीने म्हैसूर येथील केंद्रीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेमध्ये आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. फळांच्या हंगामानुसार उत्पादनात बदल केला जातो. ग्राहकांच्या मागणीनुसार गणेशोत्सवात मोदक, दिवाळीत चकली, असे पदार्थदेखील त्या तयार करतात.
दरवर्षी तीन टन कोवळा फणस भाजी, एक टन तयार गरे भाजी तयार केली जाते. तसेच आठ टन आंबा फळांवर प्रक्रिया करून पल्प, पोळी, लोणचे निर्मिती होते. तसेच ८०० किलो आवळ्यावर प्रक्रिया करून लोणचे, सरबत, कॅण्डी, सुपारी निर्मिती होते.
मागणीनुसार परिसरातील शेतकऱ्यांना देखील आंब्यावर प्रकिया करून पल्प पॅकिंग करून दिला जातो. त्यांच्या प्रक्रिया उद्योगात वर्षभर २५ महिलांना रोजगार मिळाला आहे. याशिवाय प्रक्रिया हंगामात आणखी दहा ते बारा महिलांना रोजगार दिला जातो.
उत्पादनांना राज्यभर मागणी
बाजारपेठेत उत्पादनांना स्वतंत्र ओळख होण्यासाठी गीतांजलीताईंनी ‘विनता फूड्स’ ब्रॅण्ड तयार केला आहे.
सुरुवातीच्या काळात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या बाजारपेठांमध्ये उत्पादनांची विक्री केली. त्यानंतर रेल्वे स्थानकातील स्टॉलवर उत्पादने विक्रीकरिता ठेवण्यात आली. त्यानंतर पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, गुजरात, कर्नाटकमध्ये त्यांची उत्पादने जातात. देशभरातील ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून घरपोच उत्पादने पाठविली जातात.
उत्पादने आणि दर (५०० ग्रॅम)
१) कोवळा फणस भाजी- १०० रुपये
२) गरे भाजी-११० रुपये
३) आळूवडी-१७५ रुपये
४) आवळा लोणचे-१७५ रुपये
५) मिरची लोणचे-१७५ रुपये
६) आंबा लोणचे- १७५ रुपये
७) मँगो पल्प -१७५ रुपये
उत्पादन आणि दर (१०० ग्रॅम)
१) आंबा पोळी - ८५ रुपये
२) विना साखरेची आंबा पोळी- ९५ रुपये
३) तळलेले गरे- ९० रुपये
४) तळलेले मसाला गरे -९५ रुपये
याशिवाय बेसन लाडू, नाचणी लाडू, कुळीथ पीठ, मेतकूट, वेसवार मसाला, उपवासाची भाजी अशा विविध उत्पादनांची निर्मिती.
नवीन उत्पादनांवर भर
गीतांजली ताई सातत्याने प्रकिया उद्योगात वेगवेगळे प्रयोग करीत असतात. कोवळ्या फणसानंतर आता त्यांनी तयार फणसांच्या गऱ्यांची भाजी ‘रेडी टू इट’ प्रकारामध्ये आणली आहे. सुरण, काटे कणगर या कंदापासून भाजी निर्मितीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. फणसाच्या चारखंडाचा उपयोग जनावरांच्या पशुखाद्य निर्मितीमध्ये करता येईल का, हा प्रयोग करीत आहेत. ड्रायफूट्सचे लोणचे बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
दिवाळीत चकली, चिवडा अशी उत्पादने तयार केली जातात. मोठ्या प्रमाणात चकली तयार करण्यासाठी त्यांना यंत्राची गरज होती. बाजारपेठेत या यंत्राची किंमत १५ ते २० हजार रुपये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कल्पकता लढवून चकली निर्मितीचे यंत्र अवघ्या हजार दीड हजारात तयार केले आहे.
संपर्क - गीतांजली वेलणकर, ८६९८८१११९८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.