Mango Orchard : डोंगरावरील आमराईतून उत्पन्नच नव्हे, आत्मिक आनंदही...

Mango Success Story : भारतीय हवाई दलातून सेवानिवृत्ती, त्यानंतर औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरीचा अनुभव घेतलेले लक्ष्मण गावडे (गावडेवाडी, जि. पुणे) आता पूर्णवेळ शेतीत रमले आहेत. शेतीची आवड जपत मोठ्या कष्टाने व जिद्दीने डोंगर फोडून तेथे त्यांनी आमराई तसेच सीताफळ बाग फुलविली आहे.
Mango Orchard
Mango OrchardAgrowon
Published on
Updated on

Pune Mango Story : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी प्रसिद्ध आहे. येथील लक्ष्मण भिकाजी गावडे वयाच्या ६७ व्या वर्षी देखील शेतीत दररोज काम करताना दिसतात. शेतीतून निव्वळ व्यावसायिक उत्पन्न मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट नाही. तर शेतीची आवड जपताना दररोज आत्मिक आनंदाचा अनुभवही ते घेतात.

गावडेवाडी दुष्काळी गाव असल्याने गावातील अनेकांनी पूर्वी नोकरी- व्यवसायानिमित्त शहराकडे धाव घेतली होती. गावडे यांनीही शिक्षणानंतर हवाई दलात तांत्रिक विभागात नोकरी केली.

सन १९८९ मध्ये ते अंबाला येथून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पुणे शहर परिसरातील दोन प्रसिद्ध औद्योगिक कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरीचा अनुभव घेतला. औद्योगिक सुरक्षा विषयातील लघू अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. त्यामुळे ‘सेफ्टी व सेक्युरिटी ऑफिसर’ अशा दोन्ही पदांचा त्यांना अनुभव घेता आला.

शेतीच्या विकासाचे प्रयत्न

लहानपणापासून शेतीची आवड जपलेल्या गावडे यांनी नोकरी कार्यकाळातच शेती विकसित करण्याचा ध्यास बाळगला होता. त्यांनी संपूर्ण डोंगराळ जमीन खरेदी केली होती. दर शनिवारी व रविवारी वा सुट्टीच्या काळात ते गावी यायचे. त्या काळात डोंगर खोदून जमीन पिकाऊ करण्याचे कष्ट ते घ्यायचे.

जमीन तयार झाली आणि त्या जागेवर २०१० मध्ये केसर आंब्याची शंभर झाडे त्यांनी लावली. डोंगरावर सिंचन करणे तसे सोपे नव्हते. ठिबक सिंचन आणि पाइपलाइनसाठी पुरेसे पैसेदेखील नव्हते. पारंपरिक विहिरीवरून पाणी शेंदून, डोक्यावर वाहून त्यातूनच झाडे जगविली, टिकविली आणि वाढविली देखील.

पाच वर्षांच्या संगोपन काळात टप्पाटप्‍प्याने झाडांची संख्या ते वाढवत गेले. तशी ठिबक सिंचनाची सोयही केली. गेल्या १३ वर्षांच्या काळात प्रमुख किंवा बहुतांशी केसर आंब्यासह अन्य वाणांची मिळून सुमारे २४० झाडे गावडे यांच्या आमराईत फुलत आहेत. यात बहुतांशी केसर (१७०) तसेच ६० हापूस, वनराज व बदाम प्रत्येकी ३, तोतापुरी व राजापुरी प्रत्येकी २, तर दूधपेढा आंब्याचे एक झाड आहे.

Mango Orchard
Mango Orchard : अति घन लागवड आंबा बागेत आधुनिक पद्धतीने छाटणी फायद्याची

झाडांचे व्यवस्थापन

फळहंगाम संपल्यावर जुलैमध्ये झाडांच्या आळ्यामध्ये मशागत केली जाते. शेतातील काडी कचरा जाळला जात नाही. तर शेणखत, पालापाचोळा, सोयाबीन भुसा, ऊसपाचट यांचे जैविक मल्चिंग केले जाते. पावसाळ्यात बोर्डोचा वापर केला जातो.

ऑक्टोबर - नोव्हेबरमध्ये बागेची स्वच्छता आणि मशागत करून झाल्यावर फळधारणा होत जाईल तशी पाण्याची मात्रा वाढविली जाते. बागेत सोयाबीन, वांगी, हिरवी मिरची, भुईमूग यांचे आंतरपीकही घेतले आहे.

अलीकडील काळात मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. मात्र शेतात एक कायमस्वरूपी जोडपे तैनात केले आहे. शिवाय काढणीच्या काळात स्थानिक मजुरांची मदत घेतली जाते.

फळांची विक्री व्यवस्था

गावडे म्हणाले, की आमच्या भागात अनेक शेतकऱ्यांकडे आंबा बाग आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची रेलचेल असते. आम्हालाही विक्रीसाठी बाजारपेठेत जाण्याची गरज भासत नाही. फळांचे वजन २५० ते ३०० ग्रॅमपर्यंत असते. या वर्षी काही फळे ४०० ते ५०० ग्रॅम वजनाची भरली. दरवर्षी सर्व बाग मिळून १२ ते १४ टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यास ५० ते ७० रुपये प्रति किलो दर मिळतो.

यंदा गारपिटीचा तडाखा बागेला बसला. फार उत्पन्न हाती लागले नाही. दर ६५ रुपयांपर्यंत मिळाला. दरवर्षी खर्च वजा जाता काही लाख रुपयांचे उत्पन्न हाती मिळते. हापूस आंब्याचे उत्पादन सुरू व्हायचे आहे. त्यानंतर उत्पन्नात वाढ होईल.

Mango Orchard
Mango Season : आमराया म्हणजे राजसी थाट आणि रसाळ्याची संस्कृती

सीताफळ शेती

गावडे यांना आंब्याच्या बागेबरोबर सीताफळाच्या बागेचाही मोठा आधार आहे. सुमारे तीस वर्षांपासून ही बाग त्यांनी जोपासली आहे. झाडांचे पुनरुज्जीवनही केले आहे. बागेत सुमारे २५० झाडे, तर एनएमके गोल्ड हे वाण आहे. फळांचे बॉक्स पॅकिंग केले जाते. प्रति बॉक्समध्ये फळाच्या आकारानुसार दोन, तीन ते चार फळे असतात.

प्रति बॉक्सला ५० रुपयांच्या पुढेही दर मिळाला आहे. तीस बॉक्सचा एक मुख्य बॉक्स तयार करून वाशी मार्केटला तो पाठविण्यात येतो. अशा प्रतवारीमुळे फळांना चांगला दर मिळण्यास मदत मिळते, असे गावडे सांगतात.

सिंचनाची केली व्यवस्था

आमराई वाढू लागली तसे पाणी कमी पडू नये यासाठी सिंचनाची शाश्‍वत सोय करणे गरजेचे होते. त्यामुळे या वर्षी जुनी विहीर मोठी करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी विहिरीचा घेर १२ फूट होता.

तो आता ३२ फूट करण्यात आला असून, खोली ५० केली आहे. विहिरीच्या कामासाठी नऊ लाख रुपये खर्च आला आहे. विहिरीला पाणी आहे. शिवाय कॅनॉलवरून देखील पाणी आणले आहे. अजून तीन एकरांवर आमराई वाढविण्याचा विचार असल्याचे गावडे यांनी सांगितले.

संपर्क - लक्ष्मण गावडे, ७०२०८०१४७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com