
Agriculture Success Story : नाशिक जिल्हा द्राक्ष, डाळिंबासह विविध भाजीपाला पिकांसाठीही प्रसिद्ध आहे. येथील भाजीपाल्याची मुंबई महानगरीसह गुजरातेतील अहमदाबाद, बडोदा, सुरत शहरांमध्येही विशेष ओळख आहे. मॉलमध्ये विक्री होणाऱ्या भाजीपाल्याच्या थेट शेतकऱ्यांकडून खरेदीसाठी १५ वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्तरावरील कंपनीने चितेगाव (ता.निफाड) येथे भाजीपाला संकलन केंद्र सुरू केले.
त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. हळूहळू अन्य कंपन्याही खरेदीसाठी दाखल होऊ लागल्या. आता चितेगावसह शेजारील चेहडी व चांदोरी या गावांच्या हद्दीत छत्रपती संभाजीनगर महामार्गावर १५ हून अधिक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भाजीपाला संकलन केंद्रे सुरू केली आहेत.
पिकतो ३५ प्रकारचा शेतमाल
ग्राहकांची आवड, कल लक्षात घेऊन संकलन केंद्रांकडून तशी मागणी होऊ लागली. त्यानुसार नेहमीच्या भाज्यांबरोबर शेतकरी परदेशी किंवा अन्य भाज्याही उत्पादित करू लागले. आजमितीस पालेभाज्या, फळभाज्या, परदेशी भाज्या व फळे मिळून सुमारे ३५ प्रकारचा शेतमाल शेतकरी घेत आहेत.
स्थानिक पातळीवर विक्रीची हमी व गुणवत्तेनुसार दर मिळत असल्याने त्यांच्यात हुरूप आला. यात वेलवर्गीय भाजीपाल्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. अडीच हजारांहून अधिक शेतकरी येथे जोडले आहेत.
नेहमीच्या पालेभाज्यांसह कांदा-लसूणपात, पुदिना, अळू, कढीपत्ता, गवती चहा, नेहमीच्या फळभाज्यांसह गिलके, काकडी, पांढरा मुळा, शेवगा, गाजर, मधुमका, वाल, घेवडा तर परदेशी भाज्यांमध्ये रेड कॅबेज, ब्रोकोली, लेट्यूस आईसबर्ग, झुकिनी, रंगीत ढोबळी मिरची, चायनीज कॅबेज, चायना काकडी आदींचा समावेश आहे.
फळांमध्ये द्राक्ष, लिंबू, डाळिंब, कलिंगड, खरबूज, आंबा, ड्रॅगन फ्रूट आदी समाविष्ट आहेत. कोरफड, तुळस, उत्सवांवेळी आंब्याची तसेच कडुनिंब, अशोकाची पाने देखील उपलब्ध असतात. नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्यांतील मिळून पंचवीसच्या सुमारास गावे या केंद्रांशी जोडली आहेत.
हे होतात शेतकऱ्यांना फायदे
बाजाराप्रमाणे लिलावात थांबण्याची वेळखाऊ प्रक्रिया नाही. हमाली, तोलाई, अन्य कमिशन नाही.
स्थानिक पातळीवर विक्रीव्यवस्था असल्याने वाहतूक खर्चात बचत.
प्रतवारीनुसार खरेदी, त्यामुळे दरनिश्चिती व स्पर्धात्मक दर. बाजाराच्या तुलनेत आर्थिक फायदा.
थेट खात्यावर पैसे वर्ग.
निर्माण झाल्या रोजगार संधी
दहाहून अधिक नामवंत ब्रॅंडच्या कंपन्या (ऑनलाइनसहित) संकलन केंद्र यंत्रणेशी जोडल्या असून पंधराहून अधिक संकलन केंद्रे आहेत. त्यातून परिसरात दररोज ५०० लोकांसाठी रोजगार तयार झाला आहे. यात अल्पभूधारक व भूमिहीन घटकांचा प्रामुख्याने समावेश आहे. शेतीमाल वाहतुकीत पुरुष तर हाताळणी, प्रतवारी व पॅकिंग प्रक्रियेत महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. वाहतूक व्यवसायात स्थानिक शेतकऱ्यांचाही समावेश आहे. अनेक उच्चशिक्षित पदवीधर या कंपन्यांमध्ये विविध विभागांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत.
तंत्रज्ञानाच्या मदतीने मार्गदर्शन
भाजीपाला उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी संबंधित कंपन्यांनी कृषीविद्यावेत्त्यांची नेमणूक केली आहे. त्याद्वारे वाण निवड, लागवडीच्या सुधारित पद्धती, अन्नद्रव्ये, किडी-रोग व्यवस्थापन, काढणीपश्चात हाताळणी प्रतवारी याबाबत ते आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. काही कंपन्यांनी मोबाइल ॲप विकसित केले आहेत.
त्याद्वारे हवामान अंदाजासहित आवश्यक शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात येते. पॅकिंग करताना ‘ट्रेसिबिलिटी’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामध्ये बारकोड सहित लेबल पॅकिंग असते. ज्यावर वजन, काढणी तारीख, पॅकिंग वजन, दर व वापराची वैधता मुद्रित असते. शेतीमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे तपशील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पाहता येणारी सुविधा कंपन्यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे.
संकलन केंद्रांची कार्यपद्धती
खरेदी, गुणवत्ता नियंत्रण, पुरवठा साखळी व बिलिंग असे चार विभाग कार्यरत.
शेतकरी एक किंवा त्याहून अधिक केंद्रांशी नोंदणी करू शकतो.
त्यानंतर ओळख क्रमांक, थेट खात्यावर पैसे जमा करण्यासाठी बँक तपशील समाविष्ट होतात.
शेतकऱ्यांनी ज्या भाजीची लागवड केली आहे त्याची पाहणी खरेदी विभागाच्या प्रतिनिधीतर्फे थेट बांधावर जाऊन होते.
गुणवत्ता व प्रतवारीनुसार दर निश्चित होतो.
व्यवहार होऊन केंद्रावर मालाची प्राथमिक हाताळणी, वजन होते.
त्यानंतर प्रतवारी व प्रमुख शहरांमध्ये माल रवाना होतो.
काही कंपन्या ‘होम डिलिव्हरी’ पद्धतीने विक्री करतात. त्या २५० ग्रॅम ते एक किलो वजनात पर्यावरणपूरक पॅकिंग केंद्रावरच करतात.
शेतकऱ्यांकडून भाडेतत्वावर रस्त्यालगत दोन हजार ते १० हजार चौरस फूट आकाराची ही संकलन केंद्रे.
काही कंपन्यांकडे शीतकरण, रिफर व्हॅनची सुविधा.
कामकाजात संगणकीय प्रणालीचा वापर.
दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत कामकाज सुरू.
७५ ते १०० वाहनांमधून पॅकिंग केलेला शेतीमाल मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, बडोदा आदी शहरांमध्ये होतो रवाना.
मॉल्सच्या रूपाने तो ग्राहकांसाठी होतो उपलब्ध.
काही कोटींची होते उलाढाल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.