
Tribal Livelihood In Maharashtra : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा सह्याद्रीच्या कुशीत, दऱ्याखोऱ्यांमध्ये वसला आहे.रानमेवा व औषधी वनस्पतींनी समृद्ध असा हा पट्टा सध्या पावसाळ्यात बहरून गेला आहे. भीमाशंकर,आहुपे, पाटण, बोरघर या तीन खोऱ्यांमध्ये रानभाज्या मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात.
वाकडी, रानकुडे, चावीचा बार, टाकळा, भांगरी, कोळूची भाजी, सापकांदा, आघाडा, चाईचे डेर, शेवळे, चिचुर्डे, रुखालू, करटुले, कुरडू, शेवळा, लोथी, रताळ्याचे तसेच कवदरी कोंब आदी वैविध्य या भागात पाहण्यास मिळते. या भाज्या विविध पोषणमूल्यांनी भरपूर व आरोग्यदायी असतात.
या भागातील आदिवासी शेतकरी रानावनात जाऊन त्या गोळा करतात. गोणी किंवा टोपल्यात भरून घरी चांगल्या प्रकारे धुतल्या जातात. पानभाज्या असल्यास त्यांच्या जुड्या बांधल्या जातात. करटुले, चिचुर्डे आदींची किलोच्या दराने विक्री होते. आदिवासींसाठी रानभाजी हा उदरनिर्वाहासाठीचा महत्त्वाचा भाग असतो.
गावे झाली बाजाराची ठिकाणे
आंबेगाव तालुक्यातील काही गावे रानभाज्यांच्या बाजारपेठांची मुख्य ठिकाणे झाली आहेत. डिंभे हे त्यापैकीच एक गाव. सुमारे साडेचार हजारांपर्यंत गावची लोकसंख्या आहे. येथील शेतकरी ऊस, भाजीपाला घेतात. तळेघर गाव देखील पश्चिम पट्ट्यातील मोठी बाजारपेठ मानली जाते.
आदिवासीच्या दृष्टिकोनातून दोन्ही गावे दळणवळणासाठी महत्त्वाची आहेत. डिंभे धरण आणि जवळच भीमाशंकर हे महत्त्वाचे देवस्थान असल्याने या भागात पर्यटकांची मोठी रेलचेल असते. त्यामुळे रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी या बाजारपेठांमधून त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. डिंभे येथे रविवारी तर तळेघर येथे गुरुवारी बाजार भरतो.
आठवडे बाजाराव्यतिरिक्त अन्य दिवशीही आदिवासी महिला रानभाज्या घेऊन येतात. फळे व कंदवर्गीय भाज्यांचे दर प्रति किलो १०० रुपये त्याहून अधिक असतात. पालेभाज्यांचे दर प्रति गड्डी २० ते ३० रुपयांनुसार असतात.
दिवसाला आठवडी बाजारात एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. पूर्ण हंगामात जे काही उत्पन्न मिळते त्याचा आदिवासी कुटुंबाला चांगला आर्थिक आधार मिळतो. हा हंगाम संपल्यानंतर येथील शेतकरी कांदा, बटाटा, सोयाबीन तसेच अन्य शेतमजुरीच्या कामावर जातात.
भीमाशंकर देवस्थान आणि बाजारामुळे डिंभे व तळेघर व परिसरातील या दोन्ही गावांच्या परिसरात रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाली आहे. या भागातील शेतकरी खरिपात भात, कडधान्ये, रब्बीत हरभरा, मसूर अशी पिके घेतात. पूर्वीपेक्षा येथील ग्रामस्थांचे जीवनमान उंचावले आहे.
असे असले तरी या भागात रोजगाराच्या मोठ्या समस्या आहेत. ग्रामस्थांना पाच ते वीस किलोमीटर अंतरावर रोजगारासाठी जावे लागते. भरपूर पाऊस पडत असल्याने या काळात रोजगाराच्या संधीही कमी असतात. त्यावेळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे ठरते. उन्हाळ्यात मात्र पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.
रानभाजी महोत्सव
वनविभाग, कृषी विभाग यांच्या मदतीने भीमाशंकर, भोरगिरी, नाणेघाट, जुन्नर, भोमाळे आदी अनेक ठिकाणी रानभाजी महोत्सव साजरे झाले आहेत. त्या निमित्ताने रानभाज्यांवर आधारित पदार्थ, रानमेवा यांचे महत्त्व शहरी नागरिकांना पटवून देण्यात येते. महोत्सवातून काही लाखांची उलाढाल होत असल्याचे वन्यजीव अभ्यासक नवनाथ फलके यांनी सांगितले.
नवनाथ फलके ९४०५७८१८१८, वन्य जीव अभ्यासक, डिंभे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.