
Food Processing Business In Rural India : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्याच्या काही भागात धान (भात) लागवड राहते. या पाच जिल्हयात खरिपात सुमारे सहा लाख तर रब्बी (उन्हाळी) हंगामात सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवर धान लागवड होते. गोंदिया हा विदर्भातील दुर्गम जिल्हा आहे. या शहरापासून चार किलोमीटरवर चुटीया हे २१०० लोकसंख्येचे गाव आहे.
धान हेच गावचे प्रमुख पीक आहे. काही शेतकरी फुले- फळपिकांची व्यावसायिक शेतीही करतात. याच गावातील मनोज व कार्तिक या राऊत भावंडांची दोन एकर शेती आहे. पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले वडील मधुकर यांचे कोरोना काळात निधन झाले. त्यानंतर दोन्ही भावंडांवर घरची जबाबदारी आली.
अन्न प्रक्रिया उद्योगात पदार्पण
मनोज यांनी अमरावती येथील वसुधाताई देशमुख अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातून २०१९ मध्ये बी.टेक.ची पदवी घेतली. त्यानंतर ऑपरेशन मॅनेजमेंट या विषयातून पुण्यातून एमबीए केले. स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीनेच त्यांची सर्व धडपड सुरू होती. त्या अनुषंगाने नागपूर येथील प्रसिद्ध प्रक्रिया उद्योगात एक वर्ष नोकरी केली. या कार्यकाळात अन्न प्रक्रिया क्षेत्रातील बारकावे, उत्पादन निर्मिती, बाजारपेठ आदी बाबी अभ्यासल्या.
प्रशिक्षणातून सुरुवात
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत मनोज यांची महाराष्ट्रातून १५ जणांमध्ये अन्न प्रक्रियेतील प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यानुसार बारामती कृषी विज्ञान केंद्रात भाताचे मूल्यवर्धन व त्यापासून प्रक्रियाजन्य पदार्थांचे उत्पादन या विषयावर प्रशिक्षण घेतले. भाताच्या मुरमुऱ्याला वर्षभर सतत मागणी असते.
त्यापासून चिक्की, चॉकलेट, लाडू, इन्स्टंट भेळ यासारखे पदार्थ तयार होतात. त्यामुळे मुरमुरा उद्योगाकडे वळण्याचा निर्णय मनोज यांनी घेतला. लागणाऱ्या यंत्रसामग्रीची माहिती ऑनलाइन पद्धतीने मिळविलीच. शिवाय गोंदिया, नागपूर आणि रायपूर येथील मुरमुरा उद्योगांमधूनही यंत्रांची माहिती घेतली.
यंत्रणा झाली कार्यान्वित
शेतातच ५० बाय ४० फूट आकाराचे प्रक्रिया युनिट. यातील काही जागेचा गोदामासाठी उपयोग.
उद्योगात शेतीमाल भाजण्यासाठी रोस्टरची गरज भासते. सध्या मनोज यांच्याकडे पाचशे किलो (किंमत साडेसहा लाख रु.) व एक हजार किलो (किंमत नऊ लाख) प्रति तास मुरमुरा उत्पादन अशा क्षमतेचे दोन रोस्टर आहेत. रोस्टरला असलेल्या बॉयलरसाठी लाकडाचा भुस्सा वापरला जातो. पाच रुपये किलोप्रमाणे त्याची खरेदी होते.
बॅंकेकडून सहा लाख रुपयांचे कर्ज व ३५ टक्के अनुदान मिळाले. प्रकल्प किंमत २१ लाख ८५ हजार रुपये.
...अशी होते मुरमुरा निर्मिती
मुरमुरे तयार करण्यासाठी छत्तीसगड येथून महामाया हा खास प्रक्रियेसाठीचा तांदूळ मागवण्यात येतो. पॅराबॉइल्ड ब्राऊन (तपकिरी) प्रकारातील हा तांदूळ असून एक क्विंटलपासून ९० किलो मुरमुरा तयार होतो.
दररोज वीस क्विंटल मुरमुरा उत्पादन होते. त्यासाठी एकूण खर्च एक लाख रुपये होतो.
निर्मिती प्रक्रियेत हॉपरमध्ये तांदूळ घालणे ही पहिली पायरी असते. कन्व्हेअर बेल्टने तो रोस्टर यंत्रात पाठवला जातो. त्या ठिकाणी तापमान १५० अंश सेल्सियस राहते. एक मिनिट कालावधीपर्यंत ही प्रक्रिया चालते. या वेळी आर्द्रताही नियंत्रणात ठेवली जाते.
पुढे मुरमुरा मिक्सर मशिनमध्ये घालण्यात येतो. हे यंत्र कन्व्हेअर बेल्टच्या माध्यमातून पुढे जाताना त्यावर ड्रममधील मिठाचे पाणी सोडण्यात येते. या प्रक्रियेमुळे मुरमुरा खाण्यासाठी चविष्ट होतो. सोबत तो फुगतोही. त्यानंतर दुसऱ्या रोस्टरमध्ये २३० ते २५० अंश सेल्सिअस तापमानात मुरमुरा तापवला जाते. त्यानंतर चाळणीच्या माध्यमातून प्रतवारी होऊन स्वच्छ, साफ मुरमुरा तयार होऊन बाहेर पडतो.
विशिष्ट तापमानात मुरमुऱ्याला जसे ‘रोस्ट’ करावे लागते त्याचप्रकारे त्याला फुगवावे देखील लागते. त्यासाठी खास वाळूचा उपयोग होतो. रोस्टरमध्येच ही प्रक्रिया होते. प्रति वीस क्विंटलसाठी ५० ते १०० किलो वाळूची गरज भासते. ती मुंबईहून प्रति टन ७० हजार रुपये दराने मागवली जाते.
उद्योगातील योगदान
कुटुंबातील सर्व सदस्य उद्योगात राबतात. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व व खर्च कमी केला आहे. उद्योगात गावातील सहा- आठ जणांना रोजगार दिला आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, ‘आयडीबीआय’ बॅंकेचे जिस्नू मंडल, कृषी विभाग अधिकारी, ‘आत्मा’चे सुनील खडसे, उकेश नान्हे व मित्रांचे उद्योग उभारणीत योगदान असल्याचे मनोज यांनी सांगितले.
तयार केली बाजारपेठ
ऑनलाइन, वेबसाइट व गोंदिया जिल्हाभरात तयार केलेले घाऊक व किरकोळ वितरक यांच्या माध्यमातून बाजारपेठ तयार केली आहे. सुरवातीला विक्रेत्यांना नमुना भेट देत मुरमुऱ्याची गुणवत्ता पटवून दिली. बाजारपेठांच्या मागणीनुसार विविध पॅकिंग तयार केले आहेत. आठ किलो पॅकिंगची विक्री किसान ब्रॅंडने, सहा किलो ओम ब्रॅंडने तर पाचशे ग्रॅम व एक किलो पॅकिंगमधील मुरमुरा विक्री आई छाया यांच्या ब्रॅंडनेमने होते.
प्रति किलो ५० रुपये अशी किंमत आहे. सन २०२२ च्या सुमारास उद्योगाच्या सुरुवातीस साडेतीन ते चार लाख रुपयांची वार्षिक उलाढाल होती. सन २०२३ मध्ये साडेपाच लाख रुपये तर आजमितीस नऊ लाख रुपयांच्या उलाढालीचा पल्ला उद्योगाने गाठला आहे. वैष्णवी उद्योग असे सद्यःस्थितीत नाव असले तरी लवकरच बी.टेक. मुरमुरावाला असे नामकरण करणार असल्याचे मनोज सांगतात.
मनोज राऊत, ७२६३८९३९०९
कार्तिक राऊत, ७३५०८६०२५२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.