Okra Farming : खानदेशच्या शेतकऱ्यांना भावतेय भेंडीचे पीक

Okra Production : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेंडीचे पीक अधिक भावते आहे. दर्जेदार उत्पादनात भडगाव, जळगाव, धरणगाव, एरंडोल हे भाग ओळखले जात आहेत. तीनही हंगामांत लागवड होत असली तरी बाजारपेठांतील मागणी व त्या हंगामातील फायदे- धोके ओळखून शेतकरी हंगाम निवड करतात.
Okra Farming
Okra Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : जळगाव जिल्ह्यातील भरताचे वांगे सर्वदूर प्रसिद्ध आहे. आता हा जिल्हा भेंडीतही वेगळी ओळख तयार करू लागला आहे. चाळीसगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, भडगाव, पाचोरा, जळगाव, जामनेर आदी भागांत भेंडी लागवड वाढत आहे. बाजारपेठेतील संधी व मागणी लक्षात घेऊन पावसाळी, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामांतील लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो. कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात खरिपात एक हजार ते १२०० हेक्टर तर उन्हाळी हंगामात ८०० हेक्टरच्या आसपास भेंडी लागवड राहते.

लग्नसराईमुळे उठाव

यंदाच्या उन्हाळा हंगामातील भेंडीची आवक सुरू झाली आहे. ती पुढे वाढत जाईल. आगाप लागवड क्षेत्रात काढणीला गती आली आहे. मार्चच्या कालावधीत मुंबईसह स्थानिक बाजारपेठेत या भेंडीचा पुरवठा होतो. सध्या जेवढी आवक बाजार समित्यांत होत आहे त्यापेक्षाही अधिक पाठवणूक थेट शिवारातून होत आहे.

अनेक शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी आगाऊ नोंदणी केली आहे. साहजिकच बाजार समित्यांपेक्षा थेट खरेदीत मोठे व्यवहार व उलाढाल भेंडीतून होते. यंदाही दरवर्षीप्रमाणे धरणगाव, जामनेर व एरंडोलातून प्रति दिन २०० क्विंटल पाठवणूक मोठ्या खरेदीदारांच्या माध्यमातून मुंबईत अपेक्षित आहे.

सध्या दिवसाला ४० ते ५० क्विंटल आवक विविध भागांत आहे. गुजरातमधील सुरत, बडोदा आदी बाजार समित्यांमधील मोठ्या व्यापाऱ्यांकडूनही भेंडीला मागणी राहते. सध्या मेथी, वाटाणा, बटाटा, कोबी यांची आवक कमी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लग्नसराईत भेंडी मात्र भाव खाऊन जात आहे. सुरत, अहमदाबाद, मुंबई येथील मोठे खरेदीदार भेंडीची परदेशात निर्यात करतात.

Okra Farming
Okra Cultivation : जळगावात भेंडी लागवडीला वेग; क्षेत्र वाढणार

उन्हाळ्यात दर अधिक

मागील पावसाळा हंगामात सुरत, मुंबईहून मागणी कमी होती. ऑगस्ट कालावधीत प्रति दिन १५० ते २०० क्विंटल आवक होती. एकट्या जळगाव बाजार समितीत मागील जून व जुलैमध्ये दिवसाला सरासरी २१ क्विंटल आवक झाली. गिरणा काठांवरील गावांमध्ये लागवड अधिक होती. रब्बीत ती स्थिर होती.

त्याचे कारण या काळात भरीत वांगी, मेथी, वाटाणा आदींना भेंडीपेक्षा अधिक उठाव होता. हिवाळ्यात सर्वच पालेभाज्या व फळभाज्यांची रेलचेल होती. त्यामुळे भेंडीला अपेक्षित दर डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत मिळाला नाही. या कालावधीत प्रति किलो १५ ते २० रुपये दर होते. या तुलनेत उन्हाळी भेंडीचे दर अधिक राहिले आहेत.

Okra Farming
Okra Cultivation : चांगल्या फायद्यासाठी जाणून घ्या निर्यातक्षम भेंडी उत्पादनाचे तंत्र

चमकदार, टवटवीत, हिरव्यागार भेंडीला उठावही अधिक असतो. त्या दृष्टीने शेतकरी व्यवस्थापन करतात. यात पॉली मल्चिंग, जैविक कीडनाशकांच्या वापरावर भर देतात. काही अवर्षणप्रवण भागात एप्रिलमध्ये सिंचनाचे स्रोत कमकुवत होतात. मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात भेंडी कमी असते. या तुलनेत जळगावात पावसाळी व हिवाळी भेंडी लागवड अधिक पाहण्यास मिळते.

मागील पावसाळ्यात सरासरी १५ रुपये प्रति किलो दर मिळाला. हिवाळ्यात किंवा डिसेंबर ते फेब्रुवारी काळातही दर पातळी २० रुपयांवर अपवादानेच पोहोचली. सध्या २५ रुपये दर मिळत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत त्यात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. जळगाव बाजार समितीत २०२३ व २०२४ मध्ये सरासरी दर २२ ते २५ रुपये राहिले. जागेवर तीस रुपये दर मिळाल्यास नफ्याचे प्रमाण वाढते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

शेतकरी अनुभव

बांबरूड, (ता. पाचोरा) येथील गोपाल कोकणे यांची चार एकर शेती आहे. पैकी दीड एकरांच्या आसपास ते दरवर्षी भेंडी घेतात. सुमारे नऊ वर्षांचा त्यांचा या पिकातील तगडा अनुभव तयार झाला आहे. ते सांगतात, की दरवर्षी ऑक्टोबरच्या सुमारास माझी लागवड असते. मार्चपर्यंत प्लॉट संपतो. प्लॉट सुरू झाल्यानंतर तो संपेपर्यंत दररोज एक ते दीड क्विंटल यानुसार एकूण ८० ते १०० पर्यंत तोडे होतात.

प्रति किलो किमान २५ ते कमाल ४०, ६० रुपयांपर्यंत दर मिळतो. एकूण क्षेत्रातून अडीच लाख ते तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. जळगाव बाजार समितीतच विक्री करतो. या प्रयोगानंतर मार्चनंतर सुमारे एक एकरभर क्षेत्रात पुन्हा भेंडी घेतो. ही भेंडी मेमध्ये सुरू होते. ऑगस्टपर्यंत हा प्लॉट सुरू राहतो.

या उन्हाळी भेंडीला २५ ते ३० रुपयांचा दर मिळतो. एक लाखाचे उत्पन्न मिळते. कोकणे सांगतात, की वर्षभरातील विविध हंगामांत विविध भाज्या घेत असतो. त्यांच्या खर्चासाठी उन्हाळी भेंडीतून चांगल्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होते. या भेंडीनंतर पुढे काकडीचे पीक घेण्यात येते. हे पीकदेखील कमी कालावधीत ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न देऊन जाते.

कोकणे सांगतात, की आई विमलबाई, पत्नी कल्याणी देखील शेतात राबतात. सध्याच्या मजूरटंचाईच्या काळात घरातील सदस्यांनीच केलेली शेती परवडते. भेंडी पिकातील उत्पन्नाने मोठी आर्थिक बचत करणे व त्यातून स्वावलंबी होणे शक्य झाले. कोणाकडे पैशांसाठी हात पसरण्याची वेळ आलेली नाही. घरातील लग्नसराई, जनावरांचे शेड आदी खर्चही त्यातूनच झाले.
गोपाल कोकणे ८८३०४४९२९३
शिरसोली (ता. जळगाव) येथील अनिल पवार म्हणाले, की सुमारे पाऊण एकरांत भेंडीची लागवड केली आहे. उन्हाळी भेंडीला सिंचन, खते, फवारणी आदींचे काटेकोर नियोजन करावे लागते. अलीकडेच काढणी सुरू झाली असून, एक दिवसाआड ५० ते ६० किलो काढणी होत आहे. सध्या दर बऱ्यापैकी असले तरी मजूरटंचाई, मजुरीखर्च, प्रतिकूल हवामानामुळे कमी उत्पादन अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनिल पवार ७३८३९९३१७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com