
Agriculture Success Story : नांदेड जिल्ह्यात काठेवाडी हे देगलूर तालुक्यातील गाव आहे. तेलांना राज्याची सीमा येथून एक किलोमीटरवर तर कर्नाटकची सीमा पाच किलोमीटरवर आहे. गावातील युवा शेतकरी नारायण पाटील यांची तीस एकर शेती आहे. एमएबीएडपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. पूर्वी वडील व्यंकटराव देशी कापूस, ज्वारी, तूर, उडीद, मूग आदींची पारंपरिक शेती करायचे.
परंतु त्यातून फार काही उरायचं नाही. शिक्षणानंतर २००८ मध्ये नारायण यांनी नोकरीपेक्षा शेतीचीच जबाबदारी स्वीकारली. एकाच ठिकाणी असलेल्या या शेतीला सिंचनाची जोड देत केळी, मोसंबी, आले, हळद आदी फळबाग व व्यावसायिक, नगदी पिकांची जोड देण्यास सुरुवात केली.
दुष्काळाने पाहिली परीक्षा
सुरुवातीच्या वर्षी कूपनलिका घेऊन दीड एकरांत केळी लागवड केली. त्यातून आश्वासक उत्पादन व उत्पन्नही मिळाले. उत्साह वाढून पाच एकरांत मोसंबी घेतली. त्यासाठी कूपनलिकांची सोय केली. सन २०१३ मध्ये उत्पादन सुरू झाले. परंतु २०१४ च्या दुष्काळाने मोठी परीक्षा पाहिली. मोसंबी पूर्ण वाळून गेली. केळीचेही मोठे नुकसान झाले. परिणामी दोन्ही पिके थांबवावी लागली. मात्र खचून न जाता पुन्हा उमेदीने वाटचाल सुरू ठेवली.
सेंद्रिय शेतीला सुरुवात
दुष्काळाचे संकट होतेच. त्यात भर म्हणून रासायनिक खते व कीडनाशके यांच्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली होती. अशावेळी सन २०१४ च्या दरम्यान नारायण सेंद्रिय शेतीकडे वळले. सन २०२८ ते २०१९ च्या दरम्यान संपूर्ण शेती शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीवर आणली. आजमितीला चार- पाच एकर पपई, अंदाजे त्याच आसपास आले, हळद अशी पिके असतात.
माहीम वाणाच्या आल्याचे एकरी ऐंशी ते शंभर क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मागील तीन चार वर्षांत नांदेड मार्केटला ८ ते १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. यंदा मात्र त्यात कमालीची घसरण होऊन तो दीड हजार ते दोन हजार रुपयांवर आला आहे.
त्यामुळे यंदा हे पीक नफ्यात राहिले नाही. आले बेण्याची शेतकऱ्यांनाही विक्री होते. परिसरात कोणते जलस्रोत नाहीत. पावसाचे पाणी हाच काय तो मुख्य आधार. नगदी पिकांना बारमाही पाण्याची व्यवस्था लागते. त्यासाठी कूपनलिका घेतल्या. काहींना चांगले पाणी लागले. सोबतच ५० लाख लिटरचे शेततळे घेत त्यास सौरपंपाची जोड दिली.
पपई, हळदीची शेती
पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर २०१६ पासून पपई लागवड (वाण तैवान ७८६) सुरू केली. या पिकात विषाणूजन्य रोगाची गंभीर समस्या असल्याने दरवर्षी हे पीक न घेता एकाड एक वर्ष घेण्याची पद्धत अवलंबिली आहे. दर नोव्हेंबरला लागवड होते. प्रति झाड ४० ते किलो माल मिळतो.
दिल्ली, उत्तर प्रदेशातील व्यापारी जागेवर येतात. हैदराबाद येथेही बॉक्स पॅकिंगमघून माल पाठवला जातो. प्रति किलो १०, २० ते २५ रुपये दर मिळतो. सेलम वाणाच्या हळदीचे एकरी २५ क्विंटलपर्यंत (वाळलेल्या) उत्पादन मिळते. अलीकडील काळात क्विंटलला नऊ हजार ते १२ हजार रुपये दर नांदेड बाजारपेठेत मिळाला आहे.
सेंद्रिय निविष्ठांचा वापर
सेंद्रिय निविष्ठांमध्ये ट्रायकोडर्मा, जिवाणू संवर्धके, शेणखत स्लरी, जिवामृत यांचा वापर.
सेंद्रिय पद्धतीचा वापर सुरू केल्यापासून रासायनिक निविष्ठांवर हेक्टरी ५० हजारांची बचत.गरजेनुसार शेणखत २० ट्रॉली बाहेरून आणले जाते. त्यापासून ११ हौदांमधून गांडूळ खत व व्हर्मिवॉशची निर्मिती.
पीक अवशेष, धैंचा, बोरू आदी हिरवळीच्या खतांचा वापर. पीक फेरपालट.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बायोमिक्स घटकाचा वापर.
बांधावरील वनस्पतींपासून दशपर्णी अर्क निर्मिती.
नारायण यांच्या संत सावता माळी शेतकरी गटाला पोकरा प्रकल्पांतर्गत अवजारे बॅंकेतून छोटा ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांचा लाभ मिळाला आहे.
प्रतिकूलतेतही शेती टिकवली
सन २०१४ व २०१५ मध्येही दुष्काळाने केळी, मोसंबी, आले व हळद या पिकांना मोठा फटका दिला. सन २०१९-मध्ये अतिवृष्टीत पपईचे ४० ते ५० टक्के नुकसान झाले. सन २०२३ मध्येही अतिवृष्टीचा सामना करावा लागला. आता संपूर्ण शेतीला उतार देऊन पाण्याचा जमिनीखालून निचरा करण्याची तसेच नाल्याला जोडण्याची व्यवस्था केली आहे. बांधबंदिस्ती केली आहे. यंदाही जूनमध्ये आलेल्या पावसाने १० एकरांतील पपईचे मोठे नुकसान झाले. तीस ते ४० टक्केच माल हाती लागेल अशी शक्यता आहे. सर्व संकटांमध्येही शेती टिकवून ती यशस्वी करण्याचे आव्हान पेलले आहे.
शेतीतील प्रगती
नारायण यांना वडिलांचे मार्गदर्शन लाभते. पत्नी उषा शिक्षिका असून त्यांचीही समर्थ साथ आहे. मुलगी रोशनी नववी तर मुलगा तेजस पाचवीत शिकत आहे. शेतीतील उत्पन्नातूनच काही लाख रुपये खर्च करून तार कुंपण, जमीन सपाटीकरण आदी सुधारणा केल्या.
शेतात पक्क्या घराचे बांधकाम केले. फळबागांव्यतिरिक्त कापूस. सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके घेण्यात येतात. सन २००९ पासून शेतीचा जमा-खर्च, पाऊस आदींच्या नोंदी ठेवल्या आहेत. सगरूळ येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या वॉटररशेड प्रकल्पाचे नारायण सचिव आहेत.
सन्मान, पुरस्कार
नांदेड जिल्हा परिषदेकडून २०२२ मध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शेतीनिष्ठ शेतकरी.
‘ॲग्रोवन’कडून छत्रपती संभाजीनगर येथे २०२९ मध्ये युवा शेतकरी सन्मान.
कृषी विभाग- आत्माकडून कृषी महोत्सवात उत्कृष्ट सेंद्रिय शेती.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने २०१९ मध्ये सेंद्रिय शेतीनिष्ठ.
नवी दिल्ली येथे मिलेनियर फार्मर्स ॲवॉर्ड (२०२४)
सगरोळी कृषी विज्ञान केंद्राकडून कृषी वेद या महोत्सवात
नैसर्गिक शेती सन्मान.
नारायण पाटील ७५८८४२९४८२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.