
Nagpur News: नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागरुकता वाढल्याने सेंद्रिय शेतीमालाच्या मागणीतही वाढ नोंदविली गेली आहे. त्याची दखल घेत करंभाड (ता. पारशिवणी नागपूर) येथील सुखदेव गुरवे यांनी सेंद्रिय शेतीमाल उत्पादनात सातत्य राखत या मालाला शाश्वत बाजारपेठ मिळविण्यातही ते यशस्वी झाले आहेत.
सुखदेव गुरवे यांची ९ एकर शेती. केळी, मोसंबी, सफरचंद लागवडीचा प्रयोगही त्यांनी केला असून अशा फळपिकांची प्रत्येकी दहा झाडे आहेत. अर्धा एकरावर केळी लागवड आहे. या सर्व फळपिकाचे उत्पादन ते नैसर्गिक पद्धतीनेच घेतात. सुरुवातीला त्यांनी ३८ जनावरांचे संगोपन केले. त्यापासून मिळणाऱ्या दुधाची विक्री नागपुरात होत होती.
परंतु मजुरांची उपलब्धता होत नसल्याने आजच्या घडीला केवळ चार गाई त्यांच्याकडे आहे. या गाईंपासून मिळणाऱ्या शेणाचा वापर बायोगॅसकरिता होतो. स्वयंपाकाकरिता बायोगॅस वापरण्यावरच त्यांचा भर आहे. यातून ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबनाचा उद्देश साधता आला आहे.
अशी आहे बाजारपेठ
शेतात उत्पादित सेंद्रिय शेतीमालाला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बाजारपेठ मिळविण्यात गुरवे यशस्वी झाले आहेत. सुरुवातीला पारंपरिक जात्यावर डाळ भरडण्यावर त्यांचा भर होता. परंतु यावर मजुरी खर्च अधिक होत होता. त्यामुळे आता डाळमिलवरच डाळ तयार केली जाते. २ क्विंटल तूरडाळीची विक्री दरवर्षी होते. बाजारपेठेचा अंदाज घेत आणि आपला नफा गृहित धरून डाळ विक्रीचा दर निश्चित केला जातो.
जय श्रीराम या वाणाचा तांदूळ २२ क्विंटल विकला जातो. हरभरा डाळ ८० क्विंटल, मूग डाळ, धनिया, केळी अशा विविध शेतीमालाची विक्री ते करतात. काही ग्राहकांकडून केळीच्या पूर्ण घडाची मागणी असते. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून थेट विक्रीबरोबरच नागपुरातील काही सेंद्रिय उत्पादन विक्री करणाऱ्या दालनातही हा शेतीमाल विक्रीसाठी ठेवण्यात येतो. नागपूर नॅचरल, अभ्युदय नॅचरल, श्री-भारत या सेंद्रिय दालनांनादेखील हा माल देण्यावर भर आहे. या प्रयोगातून सात लाख रुपयांचे उत्पन्न होते. साडेतीन लाख रुपयांचा खर्च वजा जाता साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो, अशी माहिती गुरवे यांनी दिली.
२८ गरीब मुलींची केली लग्न
१९९९ पासून गुरवे यांनी समाजातील गरीब, गरजू मुला-मुलींच्या लग्नासाठी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता शेतातच त्यांनी वर-वधुसाठी दोन खोल्याही बांधल्या आहेत. वधुचे पालक आल्यास आणि त्यांची इच्छा असल्यास लग्न लावून दिले जाते. २०० पाहुणे वर तर तितकेच वधूकडील आणि १०० पाहुणे हे गुरुवे यांच्याकडील राहतात. अशा प्रकारे ५०० पाहुण्यांच्या जेवणाची सोय ते स्वखर्चाने करतात. अशाप्रकारची सामाजिक जाणीव, संवेदना त्यांनी जपली आहे. आजवर या माध्यमातून त्यांनी २८ लग्न लावून दिली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.