
Nagpur News : वडिलांसोबत लहानपणी शेतात जात असताना वखरण, नांगरण, डवरण, बैलबंडी किंवा रेंगी हाकलण्याचे तंत्र कळाले होते. मात्र उच्च शिक्षणानंतर देखील प्रत्यक्ष शेती कसण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते. वडिलांच्या निधनानंतर मात्र ती परिस्थिती आली आणि शिक्षिकेची नोकरी सोडणाऱ्या वैजयंती घारपुरे-गोखले या आज यशस्वी शेतकरी म्हणून नावारूपास आल्या आहेत.
नागपुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधून वैजयंती यांनी डॉ. दीपक कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात वस्त्रोद्योग विषयात पदविका पूर्ण केली. त्याचकाळात आलेल्या मंदीमुळे त्यांचे अभियंता म्हणून काम करण्याचे स्वप्न भंगले. मात्र निराश न होता त्यांनी इंग्रजी साहित्यात एमए व त्यानंतर बीएड पूर्ण केले. याच शिक्षणाच्या बळावर एका शाळेत शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या.
घारपुरे कुटुंबात आई-वडिलांसह चार मुली. वैजयंती यांचे वडील श्रीपाद शेती कसत होते. त्यातील उत्पन्नाच्या बळावरच कुटुंबाच्या गरजा भागत होत्या. दरम्यान लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांतच वैजयंती यांच्या वडिलांचे निधन झाले. परिणामी शेतीचा सारा भार त्यांच्या आईवर आला. वडिलांसोबतच आई वृषाली यांचे शेतीतील कष्ट अनुभवणाऱ्या वैजयंती यांनी देखील शिक्षिकेची नोकरी सोडत शेतीतच राबण्याचा निर्णय घेतला.
आई-वडिलांकडून शेती व्यवस्थापनाचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते. त्याच्या जोडीला कृषी विभागात कार्यरत काका श्याम घारपुरे यांच्याडून देखील शेती व्यवस्थापनाचे धडे घेतले. हिंगणानजीक असलेल्या सुकळी (घारपुरे) शिवारातील शेतीत कापूस, तूर, धान, सोयाबीन, भाजीपाला या पिकांच्या लागवडीवर त्यांनी भर दिला.
हेक्टरी ३३ क्विंटल तूर उत्पादन घेत त्यांनी पीक उत्पादकता स्पर्धेत जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविला. त्याबद्दल २५ हजार रुपयांचा रोख पुरस्कार आणि प्रमाणपही मिळाले. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम अनुभवले असल्याने त्यांनी जैविक पध्दतीने शेती व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले आहे. गांडूळ तसेच शेणखताचा प्रभावी वापर त्या शेतीत करतात. यामुळे शेतमालाचा दर्जा राखता येत असल्याने शेतमालाला चांगला दर मिळतो.
जैविक शेतीचे आरोग्याप्रती देखील अनेक फायदे आहेत. परिणाम या शेती पध्दतीचा प्रसार व्हावा यावर देखील वैजयंती यांनी भर दिला आहे. अनेक गावांमध्ये त्या कार्यशाळा घेत जैविक शेती पध्दतीचा प्रसारही करतात. केंद्रिय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. मणिकंदन यांच्या मार्गदर्शनात बायोचार युनिटची उभारणी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.