Food Processing : प्रक्रिया उत्पादन विक्रीसाठी शेतकरी कंपनीचा ‘पीएस' ब्रॅण्ड

फरकांडा (ता.पालम,जि.परभणी) येथील पौळ अॅग्रो प्रोड्युसर कंपनीव्दारे हळद, मिरची पावडर निर्मिती केली जाते. या उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपनीने ‘पीएस' ब्रॅण्ड तयार केला आहे.
Food Processing | Food Processing and Nutrition
Food Processing | Food Processing and NutritionAgrowon

फरकांडा (ता.पालम,जि.परभणी) येथील पौळ अॅग्रो प्रोड्युसर कंपनीव्दारे (Agro Producer Company) हळद, मिरची पावडर निर्मिती केली जाते. या उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपनीने ‘पीएस' ब्रॅण्ड (P.S. Brand) तयार केला आहे. सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कंपनीतर्फे शेतीशाळा, प्रशिक्षण वर्ग यासारखे उपक्रम राबविले जातात. कंपनीने शेतीमाल खरेदी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Food Processing | Food Processing and Nutrition
प्रक्रिया उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

फरकांडा हे गाव परभणीपासून ताडकळस मार्गे ३५ किलोमीटर आणि पालमपासून ८ किलोमीटरवर गोदावरी नदी काठी वसलेले आहे.गावशिवारात गाळाची, खोल काळी माती असलेली सुपीक कसदार जमीन आहे. सोयाबीन,तूर, कापूस, हरभरा,ज्वारी,गहू,ऊस,हळद यासह भाजीपाला ही महत्त्वाची पिके आहेत.

गावातील अल्पभूधारक तरुण शेतकरी गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतात. गटातर्फे कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे काम केले जाते. गावातील उपक्रमशील अल्पभूधारक शेतकरी सोपान पौळ,शिवाजी पौळ यांच्यासह तरुण शेतकऱ्यांच्या पुढाकारातून फरकांडा,जवळा, गुळखंड गावांतील दहा शेतकरी एकत्र आले. या शेतकऱ्यांनी शेती विकास आणि प्रक्रिया उद्योगाच्यादृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापन करण्याचे ठरविले.

Food Processing | Food Processing and Nutrition
शेतकरी उत्पादन कंपनीचा उद्योग उभारताना...

पौळ अॅग्रो शेतकरी कंपनीची वाटचाल
कृषी विभागातर्फे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) अंतर्गत परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्या जात होत्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनी निबंधकांकडे ३१ मार्च, २०१५ रोजी पौळ अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली.त्यावेळी २५० शेतकरी कंपनीचे सभासद होते.
कंपनीने १० लाख रुपयांचा व्यवसाय आराखडा सादर केला.

स्वच्छता व प्रतवारी सयंत्र तसेच शेड उभारणीसाठी ७ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळाले. सुरवातीला पालम-ताडकळस राज्य रस्त्यावरील जवळा पालम येथे शेड उभारणी करून कंपनीतर्फे धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट सुरु करण्यात आले. शेतकरी सभासदांना सोयाबीन,गहू आदी धान्याची प्रतवारी करून देण्यास सुरवात झाली. परंतु आर्थिक समस्येमुळे कंपनीच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. फरकांडा येथे १२ गुंठे जागा भाडेतत्वावर घेण्यात आली. या ठिकाणी २० बाय ३० फूट आकाराच्या शेडची उभारणी करण्यात आली. मार्च २०२० मध्ये नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले.

त्यानंतर नवीन शेतकरी सभासदांची नोंदणी करण्यात आली. सध्या कंपनीचे ५०० शेतकरी सभासद झाले आहेत.या शेतकरी कंपनीचे पाच सदस्यीय संचालक मंडळ आहे. कंपनीचे अध्यक्ष सोपान प्रभाकर पौळ, सचिव शिवाजी ज्ञानराज पौळ आणि सदस्य म्हणून सदाशिव उद्धवराव पौळ, मुक्ताबाई ज्ञानोबा खंडागळे, सदाशिव हरिभाऊ पौळ यांचा समावेश आहे. पालम तालुक्यात हळदीचे मोठे क्षेत्र आहे परंतु प्रक्रिया उद्योग नाही.त्यामुळे या उद्योगातील संधी लक्षात घेऊन शेतकरी उत्पादक कंपनीने नवीन जागी हळद प्रक्रिया, मिरची पावडर निर्मिती उद्योग सुरु करण्यासाठी निश्चित केले.त्याचवेळी लॉकडाऊन असल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून हळद, मिरची पावडर उत्पादनास सुरवात केली.

Food Processing | Food Processing and Nutrition
Poultry Farming : अंडी विक्रीसाठी तयार केला ब्रॅण्ड

हळद, मिरची पावडर निर्मितीवर भर ः
कंपनीने हळद पावडर निर्मिती सयंत्र अमरावती येथून आणि मिरची कांडप यंत्र औरंगाबाद येथून खरेदी केले. त्यासोबत स्वयंचलित पाऊच पॅकिंग यंत्र खरेदी करण्यात आले. मिरची कांडप यंत्राव्दारे ताशी ४० किलो पावडर तयार होते. हळद ग्राईंडरव्दारे ताशी २० किलो हळद पावडर निर्मिती होते. सुरवातीला मिरची पावडरीसाठी परळी वैजनाथ (जि.बीड) येथून लाल मिरची खरेदी केली जात असे. आता कर्नाटकातील बेडगी येथून मिरची खरेदी केली जाते. सुरवातीला महिन्याला १० क्विंटल मिरचीपासून पावडर तयार केले जात असे. परंतु दर्जेदार पावडरीला मागणी वाढली आहे. आता महिन्याकाठी ४० क्विंटल मिरची लागते. कंपनीचे २० शेतकरी
सभासद हळदीचे उत्पादन घेतात. त्यांच्याकडून हळद खरेदी केली जाते.वर्षाकाठी ५० क्विंटल हळद प्रति क्विंटल ५,००० ते ६,००० रुपये दराने खरेदी केली जाते.

कृषी विभागाच्या सहाकार्याने तंत्रज्ञान प्रसार ः
तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के.आर.सराफ यांच्या मार्गदर्शनामुळे कंपनीमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. कंपनीच्या विविध उपक्रमांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी.लोखंडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक पी.बी.बनसावडे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, कृषी सहायक दत्तराव दुधाटे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रकाश सोळंके यांचे मार्गदर्शन मिळत असते.

Food Processing | Food Processing and Nutrition
Food Processing : प्रक्रिया उद्योगातून तयार केला ब्रॅण्ड

सभासदांना सोयाबीन, हरभरा, हळद आदी पिकांची लागवड, व्यवस्थापन, काढणी, काढणी पश्चात साठवणूक, प्रक्रिया याबाबत शेतकरी चर्चासत्र, प्रशिक्षण, शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांना सुधारित जातींचे बियाणे वाटप करण्यात आले. गतवर्षी ६० एकरावर सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. पीक विमा तसेच कृषी विभागासह विविध शासकीय योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी फरकांडा येथे कंपनीतर्फे जनसुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘पीएस' ब्रॅण्डः
कंपनीने उत्पादनांची २०१८ मध्ये एफएसएसएआय कडे नोंदणी केली. ‘पीएस' ब्रॅण्ड या नावाने लाल मिरची पावडर, हळद पावडरीचे पाऊच पॅकिंग करून विक्री केली जाते. मिरची पावडरची २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम पॅकेटमध्ये पॅकिंग केले जाते. मिरची पावडर प्रति किलो १७० रुपये, हळद पावडर प्रति किलो १३० रुपये असा दर आहे. परभणी जिल्ह्यातील पालम,गंगाखेड, जिंतूर, पूर्णा तालुका आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील किराणा दुकाने, हॉटेल व्यावसायिकांकडून मिरची तसेच हळद पावडरीला मागणी आहे. बेकरी, फरसाण व्यावसायिकांकडून हळद पावडरला मागणी आहे. दर १५ दिवसांनी प्रत्येक ग्राहकांकडून मागणी घेऊन कंपनीच्या वाहनाव्दारे उत्पादनांचा पुरवठा केला जातो.

उलाढालीचा चढता आलेख ः
कंपनीने प्रक्रिया उद्योगांसाठी खेळत्या भांडवलासाठी आराखडा सादर केल्यानंतर एका बँकेने आठ लाख रुपये कर्ज दिले. त्याची नियमित परतफेड सुरु आहे. २०२०-२१ मध्ये मिरची पावडर २० क्विटंल, हळद पावडर ४ क्विंटल २०२१-२२ मध्ये मिरची पावडर २०० क्विंटल, हळद पावडर ३० क्विंटल आणि यंदाच्यावर्षी आजपर्यंत मिरची पावडर १६० क्विंटल, हळद पावडरची २० क्विंटल विक्री झाली आहे.पहिल्या वर्षी २८ लाख, दुसऱ्या वर्षी ५१ लाख आणि यंदाच्यावर्षी आत्तापर्यंत ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

हमीभाव खरेदी केंद्र ः
१) केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत किमतीने शेतीमालाची खरेदी करण्यासाठी कंपनीने फरकांडा येथे खरेदी केंद्र सुरु केले.त्यामुळे या भागातील दहा गावातील शेतकऱ्यांना केंद्राची सुविधा झाली. या केंद्रावर २०२१ मध्ये २२८ शेतकऱ्यांचा २,४०० क्विंटल हरभरा, २०२२ मध्ये ८०० शेतकऱ्यांच्या ९,१८९ क्विंटल हरभऱ्याची हमीभावाने खरेदी.
२) पालम येथील अडत व्यापारी शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करताना कडती घेतात. विविध कारणांनी कमी दर देतात.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

हे लक्षात घेऊन यंदा कंपनीतर्फे १,२०० क्विंटल सोयाबीनची प्रति क्विंटल ५,२०० ते ५,६०० रुपये दराने खरेदी.अडत, कडती घेतली जात नाही, फक्त हमाली घेतली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा.
३) सभासदांना शेतीमाल साठवणुकीसाठी गोदामाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीतर्फे मा.बाळासाहेब ठाकरे ग्राम परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत प्रस्ताव सादर. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एक हजार टन शेतीमालाची साठवणूक शक्य.

संपर्क ः सोपान पौळ ः८००७७२३६१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com