प्रक्रिया उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

सामाजिक क्षेत्रात असतानाही आपला स्वतःचा व्यवसाय असावा या उद्देशाने अमरावतीच्या रुक्मिणी नगरात राहणाऱ्या अर्चना जयवंत सवाई यांनी बेकरी उद्योगाला सुरुवात केली. उत्पादनांचा चांगला दर्जा राखल्याने मागणी वाढत गेली. आज या व्यवसायाची चांगली प्रगती झाली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी बारा महिलांना रोजगारही मिळवून दिला आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अर्चना जयवंत सवाई यांचे अमरावती शहरामध्ये सामाजिक क्षेत्रातही (Social Work) काम सुरू आहे. त्यांच्या कुटुंबाची अमरावतीजवळच १४ एकर शेती आहे. खरिपात कापूस (Cotton), तूर (Tur), सोयाबीन (Soybean) आणि हिवाळ्यात भाजीपाला पिकांच्या लागवडीवर (Vegetable Cultivation) भर असतो. महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या गप्पा करण्याऐवजी त्यासाठीचा आदर्श घालून द्यावा, असा संकल्प त्यांनी केला. यादृष्टीने त्यांनी प्रक्रिया उद्योगाच्या (Processing Business) दृष्टीने नियोजन सुरू केले. २०१३ मध्ये सूक्ष्म आणि मध्यम लघुउद्योग अंतर्गत स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण करून त्याआधारे स्वतःचा लघुउद्योग उभारण्याचा निर्णय अर्चनाताईंनी घेतला.

मुलाची शाळा, कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करून त्या प्रशिक्षणाला हजेरी लावत होत्या. कधी वाहन उपलब्ध न झाल्यास घरापासून दोन किलोमीटरपर्यंत पायीदेखील जावे लागले, असे त्या सांगतात. परंतु नवे काही तरी करण्याची जिद्द असल्याने ही अडचण ठरली नाही. अन्नप्रक्रिया उद्योगाबाबतच्या प्रशिक्षणामध्ये पाव, गव्हाच्या पिठापासून टोस्ट, नानकटाई निर्मिती, विविध प्रकारचे लोणचे तयार करण्याची प्रक्रिया आणि प्रात्यक्षिके घेण्यात आली. परंतु बहुतांश महिला लोणचे तयार करतात, त्यामुळे बेकरी पदार्थांना असलेली मागणी लक्षात घेता बेकरी व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय अर्चनाताईंनी घेतला.

बेकरी उद्योगाला सुरुवात ः

अर्चनाताईंनी २०१४ मध्ये पहिल्यांदा नानकटाई निर्मिती करण्याचे ठरविले. यासाठी सुरुवातीला स्वतःकडील ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून मिक्‍सरची खरेदी केली. या मिक्‍सरच्या माध्यमातून नानकटाईला लागणारे मिश्रण तयार होऊ लागले. पहिल्यांदा घरच्या ओव्हनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नानकटाई तयार केली जात होती. परंतु मागणी वाढल्याने हा पर्याय अपुरा पडत असल्याने अमरावती शहरातच राहणाऱ्या एका मैत्रिणीकडील मोठ्या ओव्हनचा वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली. या मैत्रिणीचा बेकरी व्यवसाय होता. परंतु कोरोना काळात तो बंद पडला, परिणामी तिच्याकडील यंत्रणेचा वापर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

कोरोना काळात अनेक बेकरी व्यवसाय बंद पडले होते. त्यामुळे अर्चनाताईंनी २०१८ मध्ये लघू उद्योगाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना उत्पादित नानकटाईचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. नानकटाईची चव ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने मागणी वाढू लागली. व्यवसाय वाढत असल्याने शहरातील व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वितरकांची नेमणूक केली. दरम्यान, शहरातील चहा विक्रेत्यांकडूनही नानकटाईची मागणी वाढू लागली. याचबरोबरीने सोशल मीडियावरून देखील उत्पादनांची चांगली जाहिरात केली. त्यांचाही चांगला फायदा झाला. अर्चनाताईंचे पती जयवंतराव हे राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच कर्मचाऱ्यांकडून देखील नानकटाईला मागणी वाढली आहे. राजेश आणि उषा मांगलेकर (चिखलदरा) हे अर्चनाताईंच्या संपर्कातील आहेत. त्यांच्याकडून देखील या व्यवसायाला हातभार लागतो. पुढे मांगलेकर दांपत्य त्यांचे बेकरी व्यवसायामध्ये भागीदार झाले.

गृह उद्योगाची केली उभारणी

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेतून अर्चनाताईंना पाच लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्यासोबतच स्वतःकडील दीड लाख रुपयांची जुळणी करून व्यवसायाकरिता लागणाऱ्या यंत्राची खरेदी केली. प्रक्रिया उद्योगाला एक किलो पिठापासून सुरुवात केल्यानंतर आज दररोज १२० किलो पिठाची गरज लागते. सरासरी १५० ते १६० रुपये किलो घाऊक दराने नानकटाईची विक्री होते. सध्या महिन्याला १०० ते १२५ किलो नानकटाईची निर्मिती होते.

प्रक्रिया उत्पादनाला ब्रॅण्डनेम असल्याशिवाय मार्केटिंगचा अपेक्षित उद्देश साध्य होत नाही हे लक्षात आल्यावर अर्चनाताईंनी कृष्णराज गृह उद्योगाच्या नावाने उत्पादनांची विक्री सुरू केली. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये कुटुंबासोबतच कृषी विभागाची देखील पूरक साथ मिळाली. कृषी विभागाने उत्पादनाच्या विक्रीसाठी विविध कृषी प्रदर्शनात स्टॉलची उपलब्धता करून दिली. गेल्या काही वर्षांत त्यांची वार्षिक उलाढाल १५ लाखांवर पोहोचली आहे. नानकटाईसोबतच इडली पीठ, ढोकळा पीठ, चकली पीठ १६० रुपये किलो, चहा मसाला २०० ग्रॅम ४५ रुपये आणि बिट्टया पीठ ९० रुपये किलो या दराने विक्री केली जाते. बेकरी उद्योगाच्या माध्यमातून अर्चनाताईंनी बारा महिलांना वर्षभर रोजगार दिला आहे. मुलगा सुमंत याची देखील बेकरी उद्योगाच्या विस्ताराला मदत झाली आहे.

लग्नसराईमध्ये गिफ्ट पॅक

अर्चनाताईंनी लग्नसराईचा देखील उत्पादनांच्या ब्रॅण्डिंगसाठी उपयोग केला. लग्नात नवरीला साडीसोबत चिवडा, वडी देण्याची प्रथा आहे. त्याचबरोबरीने आता नानकटाईचे गिफ्ट पॅक दिले जाते. यंदाच्या लग्नसराईत हा ट्रेंड चांगलाच वाढला. अनेकांकडून लग्नसोहळ्याच्या निमित्ताने नानकटाईच्या पाकिटांना मागणी वाढली आहे.

वृक्ष लागवडीला प्रोत्साहन

वटपोर्णिमेला वडाची पूजा करण्यासोबतच अर्चनाताई ओळखीच्या महिलांच्या घरी जात त्यांना फळरोपांची भेट देतात. तसेच फळझाडांची लागवड आणि जोपासना करण्याबाबत आवाहन करतात. गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमात त्यांनी सातत्य राखले आहे. सामाजिक वारसा जपणाऱ्या अर्चनाताईंच्या वृक्ष लागवडीच्या कामाची दखल घेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचा गौरव केला. तसेच प्रक्रिया उद्योगाची दखल घेत घातखेड (अमरावती) कृषी विज्ञान केंद्राने महिला उद्योजक, तसेच राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

-- -----------------------------------------------------

अर्चना सवाई ः ८८०६९५९१९२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com