
Agriculture Success Story : सांगली शहरापासून दहा किलोमीटरवर वसलेलं मिरज (जि. सांगली) शहर. विविध रुग्णालयांचं जाळं, रेल्वे जंक्शन अशी त्याची ओळख. शिवाय नाट्यक्षेत्र, तंतुवाद्यांचे माहेरघर, शास्त्रीय संगीताचा ऐतिहासिक वारसा, कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकारांची देणगी अशी देखील शहराची खासियत आहे. इथली तंतुवाद्ये देशाबरोबर जगभर पाठवली जातात. ऐतिहासिक काळापासून मिरज हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
फुलांचा बाजार
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत मिरज येथे श्यामराव बंडुजी पाटील हा उपबाजार १९६० मध्ये सुरू झाला. सन १९६७ तेथे जनावरांचा बाजार भरू लागला. गाई, म्हशींसाठी तो प्रसिद्ध आहेच. शिवाय बकरी ईदसाठी शेळ्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील तो सर्वांत मोठा बाजार असतो. आज याच उपबाजारात
फुलांच्या बाजारानेही नाव केले आहे. खरे तर मिरज शहरातील जुन्या ‘लक्ष्मी मार्केट’मध्ये पूर्वी हा बाजार भरायचा. तीनच व्यापारी होते. हळूहळू त्यांची संख्या व बाजार वाढला. मुख्य शहरातच ठिकाण असल्याने रहदारीच्या समस्या उद्भवू लागल्या.
व्यापाऱ्यांनी महापालिका आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. कै. मदन पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार २००३-०४ मध्ये मिरज दुय्यम बाजार आवारात पर्यायी जागा उपलब्ध झाली. व्यापाऱ्यांना गाळे बांधून दिले.
बाजाराची कार्यपद्धती
दररोज सकाळी सात वाजता सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी येथे फुले घेऊन येतात. हार व सजावट करणारे व्यावसायिकही येतात. व्यापाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने स्पर्धेतून दर मिळण्यास मदत होते.
मुळात स्थानिक ग्राहकांची संख्या चांगली असल्याने दर्जेदार फुलांसाठी ते दरांसोबत तडजोड करीत नाहीत. त्यामुळे ते कायमस्वरूपी आहेत. काही वेळा दूरध्वनीवरूनही फुलांची मागणी केली जाते. त्यामुळे फूल उत्पादकांनाही काढणीचे आगाऊ नियोजन करता येते.
मिरज हे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर असून, रेल्वे जंक्शनमुळे येथून सर्वत्र रेल्वे जातात. त्यामुळे कर्नाटक, कोकणासह अन्य ठिकाणांहून खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
आवक
वर्षातील महत्त्वाच्या सणांना (उदा. श्रावण, गणपती, दसरा, दिवाळी) फुलांची मोठी आवक असते. सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले येथून प्रामुख्याने आवक होते. या दोन्ही जिल्ह्यांसह सोलापूर, कऱ्हाड, विजापूर, अथणी, चिकोडी, बेळगाव आदी भागांत ती पाठविली जातात.
अलीकडे प्लॅस्टिकची फुले बाजारात येऊ लागल्याने बाजारपेठेवर परिणाम होत आहे. फुलांना अपेक्षित दर मिळणे कठीण झाले आहे. शासनाने या फुलांवर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.
मिरज फुलबाजार- ठळक बाबी
दररोजची आवक
-निशिगंध- दोन टन.
-पिवळा व भगवा झेंडू- ५ ते ७ टन
-गुलाब- २० ते २५ हजार (नग)
-जांभळी व पांढरी शेवंती- ५०० किलो
दर (रुपये) (प्रातिनिधिक)
निशिगंध- २० प्रति किलो
झेंडू- ३० ते ४० प्रति किलो
साधा गुलाब- २०० रुपये प्रति शेकडा
बोर्डेक्स गुलाब- ३० रुपये (प्रति वीस फुलांची गड्डी)
डच गुलाब- ४० सेंमी - ७० रु. ५० सेंमी- ९० रु., ६० सेंमी १३० रु. (प्रति २० फुलांची गड्डी)
-व्यापाऱ्यांची संख्या- ३०
-दररोज सकाळी सात ते ११ पर्यंत सौदे. (खुल्या पद्धतीने)
-आठवड्यातील उलाढाल- सुमारे २० लाखांपर्यंत
-शीतगृहाची एकूण क्षमता- २२ टन, त्या प्रत्येकी दोन टनांचे सहा कप्पे.
-‘प्री कूलिंग’ क्षमता- २.५ टन
...या आहेत मागण्या
-पिण्याच्या पाण्याची सुविधा
-बाजार आवाराची दररोज स्वच्छता व स्वच्छता गृहांची दुरुस्ती.
-शेतकरी निवास सोय.
-पावसाळ्यात माल खराब होऊ नये यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.