Animal market
Animal marketAgrowon

Success Story : जातिवंत बैल बाजारासाठी प्रसिद्ध अंजनसिंगी

Article by Vinod Ingole : शेतीसाठी लागणारे जातिवंत बैल व अन्य जनावरांच्या खरेदीसाठी अमरावती जिल्ह्यात भरणारा अंजनसिंगी (ता. धामणगाव रेल्वे) येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे.
Published on

Animal Market : अमरावती जिल्ह्यात मुंबई- हावडा रेल्वे मार्गावरील धामणगाव (रेल्वे) हे प्रसिद्ध ठिकाण आहे. या मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्यांना या ठिकाणी थांबा आहे. यवतमाळ जिल्ह्यात जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय नसल्याने प्रवासी याच ठिकाणी उतरून पुढे वाहनांचा मार्ग धरतात. त्यादृष्टीने धामणगावचे वेगळे महत्त्व आहे.

अंजनसिंगीचे महत्त्व

धामणगाव बाजार समिती अंतर्गत मंगरूळ (दस्तगीर), तळेगाव, अंजनसिंगी या ठिकाणी जनावरांचे उपबाजार भरतात. यातील मंगरूळ दस्तगीर येथील बाजार नव्याने म्हणजे गुरुवार २२ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आला आहे. यातील धामणगावपासून १७ किलोमीटरवर असलेल्या अंजनसिंगी येथील बाजार जुना व विदर्भात प्रसिद्ध आहे. सन १९८५ पूर्वीपासून तो भरायचा.

त्यावेळी बाजाराचे नियंत्रण ग्रामपंचायतीकडून व्हायचे. आज दोन हेक्‍टर ४३ आर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर तो दर बुधवारी भरतो. बाजार समितीचे सभापती कविता श्रीकांत गावंडे तर उपसभापती मंगेश बोबडे आहेत. अंजनसिंगीत जनावरांची थेट विक्री होते. रोखीने व्यवहार होत असल्याने परवान्याची गरज राहात नाही. खरेदी विक्रीचा व्यवहार होताना संबंधितांकडून आधारकार्ड मागून त्याची नोंद पावतीवेळी घेतली जाते. त्यामुळे कोणता गैरप्रकार होत नाही अशी माहिती बाजार समितीचे सचिव प्रवीण वानखडे यांनी दिली.

Animal market
Oil Production : लाकडी घाणा तेलाचा तयार केला ब्रॅण्ड

जनावरांची विविधता व विक्री

आर्वी, अंजनसिंगी, धामणगावासह मध्यप्रदेशातील व्यापारी येथील खरेदी विक्री व्यवहारात सहभागी होतात. दिवाकर भगत हे जनावरांचे व्यापारी २५ वर्षांपासून येथील बाजाराशी जोडले आहेत. येथे सर्वाधिक बैलजोड्यांची संख्या राहते. एक ते दीड लाखांपर्यंत जोडी उपलब्ध होते. बाकी गावरान म्हशी, गाई, शेळ्यांचीही उपलब्धता होत असल्याचे ते म्हणाले.

बैल खरेदी करताना त्याची चपळता तपासली जाते. त्यासाठी बैलजोडी चालवून दाखवा असा आग्रह धरला जातो. काही खरेदीदार बैलांच्या दातांवरून त्याच्या वयाचा अंदाज घेत खरेदी करतात. विविध गुणवैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतरच या ठिकाणी सौदा होतो. बैल हे त्यांच्या शिंगांवरून तरुण असल्याचे जाणता येते.

त्यामुळे खुरसाळणी प्रमाणे शिंगे घासली जातात. यातून बैलाचा रुबाबही वाढतो. या ठिकाणी रशीद खान हे अनेक वर्षांपासून शिंगसाळणीचे काम करतात. त्यासाठी प्रति शिंग १०० रुपये ते आकारतात. नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथे भरणाऱ्या बाजारातून खरेदी करून काही व्यापारी अंजनसिंगीला बैल विक्रीसाठी आणतात.

अंजनसिंगीच्या बाजारात पूर्वी याच भागातील गावरान गायी यायच्या. आता पंजाब, हरियाना भागातील जातिवंत संकरित गायींचेही प्रमाण वाढले आहे. पन्नास हजारांपासून ते एक लाखांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. बाजारात आठवड्याला सरासरी ५० गायींचे व्यवहार होतात.मुऱ्हा म्हशींची आवकही येथे होते. त्यांच्या किमती ७५ हजारांपासून एक लाखांपर्यंत आहे.

Animal market
Success Story : बागायतीमधून मिळविले आर्थिक स्थैर्य

सुविधा

जनावरे उतरविण्यासाठी ‘रॅम्प’ ची सुविधा बाजार समितीने उभारली आहे. परिसरात असलेल्या एकमेव शेडमध्ये केवळ गायी ठेवल्या जातात. परिणामी शेडची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी आहे. शेतकऱ्यांसाठी पिण्याचे थंड पाणी, निवासाची सोय आहे.

सोबत आणलेल्या जेवणाचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी शिदोरी भवन उभारण्यात आले आहे. जनावरांसाठी पाण्याचे दोन हौद, सावलीसाठी शेड, हिरवी झाडे आहेत. संपूर्ण परिसराला तार कुंपण असल्याने परिसर सुरक्षित आहे.

बाजारातील आवक व विक्री

बाजारात नोंदणी शुल्क दोन रुपये, बाजार शुल्क शेकडा एक टक्‍का, शासकीय देखरेख (सुपरव्हिजन) १०० रूपयांमागे पाच पैसे असे शुल्क आकारले जाते. गेट आवक प्रति जनावर पाच रुपये तर शेळी विक्रीसाठी आणल्यास तीन रुपये आकारणी होते. २०२२-२३ मध्ये सहा हजार जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बाजारात झाले.

त्यातून अडीच लाख रुपयांचे बाजार शुल्क बाजार समितीला प्राप्त झाले. बैलांना बांधण्यासाठी विविध प्रकारचे दोर, गळ्यात घालण्यासाठी तांब्याचा पत्रा असलेल्या घंटा आदी साहित्य विक्रीत येथील अरुण पाटील-रोंगे यांनी अनेक वर्षांपासून ओळख मिळवली आहे.

दर आठवड्याला त्यांचा चार- पाच हजार रुपयांचा व्यवसाय या ठिकाणी होतो. चर्मकार असलेले शंकर सावरकर हे चामड्यांपासून तयार साहित्य विकतात. त्यामध्ये बैलांच्या गळ्यात बांधण्यासाठीचे चामडी पट्ट्यावर असलेल्या घुंगरांच्या माळांचा समवेश आहे.

प्रवीण वानखडे ९९७५२०४८७५

(सचिव, बाजार समिती, धामणगाव रेल्वे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com