Himachal Pradesh Budget 2024 Announcement : दूधाला मिळणाऱ्या दरामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सातत्याने घसरणाऱ्या दूध दरामुळे दुग्धव्यवसाय करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. दुधाला योग्य दर मिळावा, यासाठी दूध उत्पादकांकडून राज्यभर आंदोलनेही करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ मिळाली नाही. दुधाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी, अशी मागणीही राज्यातील शेतकरी करत आहेत.
दुसरीकडे मात्र, देशात दुधाला एमएसपी देणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी शनिवारी (ता.१७) सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. दूधाला एमएसपी देणारे हिमाचल हे पहिले राज्य असल्याचे सुक्खू यांनी म्हटले आहे.
दूध उत्पादकांना होणार फायदा
दुधाला एमएसपी देण्याच्या घोषणेमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना या मोठा फायदा होणार आहे. १ एप्रिल २०२४ पासून सरकार एमएसपीप्रमाणे दुधाची खरेदी करणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा अधिक दर बाजारात मिळत असेल, तर त्यांनी तेथे दुधाची विक्री करावी. तसेच एप्रिल २०२४ पासून दूध उत्पादकांकडून घेतली जाणारी मार्केटींग फी सुध्दा माफ करण्यात आल्याची घोषणा सुक्खू यांनी केली आहे.
किती मिळणार एमएसपी?
हिमाचलमध्ये गायी आणि म्हशीच्या दुधाची खरेदी आता एमएसपीने केली जाणार आहे. यानुसार गायीच्या दुधाला ४५ रुपये आणि म्हशीच्या दुधासाठी ५५ रुपये प्रतिलिटरचा खरेदी दर तेथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. सध्या हिमाचलमध्ये गायीच्या दुधाची ३८ रुपये दराने खरेदी केली जात आहे. तर म्हशीच्या दुधाचा खरेदी ४७ रुपये दराने केली जाते. ज्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही शेतकरी दुधाची एमएसपीने खेरदी करण्याची मागणी करत आहे. सातत्याने घसरणाऱ्या दूध दरामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या वर्षी ३४ रुपये दराने घेतले जाणारे दूध सध्या २५ रुपयांपर्यंत घसरले आहे.
त्यामुळे दुधाला रास्त दर मिळावा, अशी मागणी शेतकीर करत आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गायीच्या दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अनुदानासाठी घालण्यात आलेल्या अटीशर्थीही जाचक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.