Vegetable Farming : कारले शेतीत संपादन केली ‘मास्टरी’

Karle Production : सोलापूर जिल्ह्यातील कोथाळे (ता. मोहोळ) येथील रवींद्र पवार यांनी आठ वर्षांपूर्वी कारले पिकाची कास धरली. अनुभव, अभ्यासातून एकेक बारकावे जाणून घेत या पिकात ‘मास्टरी’ संपादन केली. कृ
Vegetable Farming
Vegetable Farming Agrowon

सुदर्शन सुतार

Bitter gourd Farming : सोलापूर जिल्ह्यातील कोथाळे (ता. मोहोळ) येथील रवींद्र पवार यांनी आठ वर्षांपूर्वी कारले पिकाची कास धरली. अनुभव, अभ्यासातून एकेक बारकावे जाणून घेत या पिकात ‘मास्टरी’ संपादन केली. कृषी सेवा केंद्र सांभाळून कष्ट व सातत्यातून याच कारले शेतीतून घर, चारचाकी घेत मुलांना नजीकच्या शहरांमध्ये चांगले शिक्षण देण्यापर्यंत आर्थिक प्रगती साधल्याचा अभिमान त्यांनी मिळवला आहे.

सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोथाळे हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. भीमा नदीचा काठ व उजनीच्या डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र गाव परिसराला लाभले आहे.
खरे तर हा ऊसपट्टाच होता. पण अलीकडील वर्षांत दर आणि कमी पाऊसमानामुळे भागातील अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज, कांद्यासह अन्य भाजीपाला पिकांना अधिक महत्त्व दिले.
त्यामुळे या परिसरात या पिकांखालील क्षेत्रही विस्तारले आहे.

कारले शेती करणारे रवींद्र

गावातील रवींद्र विठ्ठल पवार बारावी शिक्षणानंतर शेतीकडेच वळले. त्यांचे वडील शेतीच करीत.
त्या वेळी ऊस, ज्वारी, गहू, अशी पिके ते घेत. भावासोबत वाटणी झाल्यानंतर २१ एकर शेती त्यांच्या वाट्याला आली. भीमा नदीवरून सात किलोमीटर पाइपलाइन करून त्यांनी शेतीला पाण्याची व्यवस्था केली. विहीर, बोअर आहेच. शिवाय कालव्याचेही पाणी मिळते. त्यामुळे १० एकर ऊस करणे शक्य झाले. पण आर्थिकदृष्ट्या उसाचे गणित जुळत नसल्याने रवींद्र यांनी हळूहळू सुधारित शेती पद्धतीकडे व त्यादृष्टीने फळभाज्यांकडे मोर्चा वळवला. टोमॅटो, दोडका, दुधीभोपळा यांचेही प्रयोग केले.


सन २०११ मध्ये कृषी सेवा केंद्र सुरू केले. त्यातून शेतकऱ्यांशी संपर्क- संवाद वाढू लागला. त्याद्वारे विविध पिके, त्यांचे वाण, प्रयोग जवळून माहीत होऊ लागले. त्यातूनच सुमारे आठ वर्षांपूर्वी कारले पिकाचा पर्याय मिळाला. या पिकाने पहिल्याच प्रयत्नात प्रति किलो सर्वाधिक ४० रुपये दर व समाधानकारक उत्पन्न मिळवून दिले. त्यातून उत्साह वाढला. त्यानंतर रवींद्र यांनी मागे वळून पाहिले नाही. या पिकाचा ते अभ्यास करू लागले. त्यातील बारकावे जाणून घेऊ लागले. कृषी सेवा केंद्र सांभाळून कारले शेतीत भरपूर कष्ट करू लागले. व्यवस्थापनात वेळोवेळी सुधारणा केल्या. त्यातूनच रवींद्र आज या पिकातील जणू ‘मास्टर’ झाले आहेत. पत्नी संध्या यांची साथ असल्यानेच पुढील वाटही त्यांना सुकर करता आली.

Vegetable Farming
Bitter Gourd : कारले पिकात मिळवली 'मास्टरी'

...अशी आहे रवींद्र यांची कारले शेती

- आठ वर्षांपासून या पिकात सातत्य.
-दरवर्षी जून आणि ऑक्टोबर अशा दोन टप्प्यांत लागवड. या पद्धतीमुळे बाजारपेठेत दीर्घकाळ
कारले विक्रीस उपलब्ध राहते व दरांच्या चढ-उताराची जोखीम कमी करता येते.
-लागवडीसाठी पाण्याची निचरा होणाऱ्या, मध्यम, भारी जमिनीची निवड.
-गेल्या आठ वर्षांत विविध वाणांमध्ये बदल. एकरी अधिक उत्पादनक्षमता, विषाणूजन्य रोगास कमी बळी पडणारी व बाजारपेठेत मागणी असलेली अशी वैशिष्ट्ये पाहून वाणांना पसंती.
-दरवर्षी एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर. (घरच्या दहा म्हशी). शेणखतामुळे
रोगांची समस्या कमी होईन फळाची गुणवत्ता वाढते असा अनुभव.
-गादीवाफा व पॉली मल्चिंगचा वापर. सहा बाय तीन फूट अंतरावर लागवड.

Vegetable Farming
Vegetable Farming : कुटुंबाने बनविला भाजीपाला शेतीत ‘ब्रॅण्ड’

-पूर्वी मांडव पद्धतीचा वापर करायचे. पण त्यामुळे वारा-वादळात पीक कोलमडू लागले.
त्यामुळे ही पद्धत बदलून आता बांबू काठ्यांचा वापर. दर दहा फुटांवर दोन काठ्या व त्यास आडवी तिसरी काठी. या पद्धतीवर रवींद्र बॉक्स पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत पीक कोलमडत नाही.
उभ्या पद्धतीने वाढते.
-सुमारे ७० ते ७५ दिवसांनी ‘हार्वेस्टिंग’ सुरू. जूनचा प्लॉट नोव्हेंबरच्या सुमारास तर ऑक्टोबरचा प्लॉट मार्च-एप्रिलच्या सुमारास संपतो.

उत्पादन व अर्थकारण

एकरी सरासरी १५ ते २० टनांच्या दरम्यान दरवर्षी उत्पादन मिळते. एकरी उत्पादन खर्च सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत होतो. यंदा दीड एकरांत ३५ टनांच्या पुढे उत्पादन जाऊन दरही किलोला ३५ ते ४५ रुपयांपर्यंत, तर उत्पन्नही सात लाखांच्या आसपास मिळाल्याचे रवींद्र यांनी सांगितले. विक्री जागेवर होते. तसेच पुणे, गुलबर्गा, सोलापूर, लातूर आदी ठिकाणी देखील माल पाठवला जातो.

साधली आर्थिक प्रगती

रवींद्र म्हणाले, की कारले शेतीतील उत्पन्नातूनच सोलापूर येथे २३ लाखांचा फ्लॅट घेता आला.
एक फोर व्हीलर देखील घेतली आहे. मुलगा यशराज आणि रजनी यांना लातूर व सोलापूर येथे
उत्तम शिक्षणासाठी ठेवणे शकय झाले आहे. रवींद्र यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून कोथाळेसह इचगाव, बोराळे, वाघोली, बेगमपूर आदी गावांतील सुमारे २५ शेतकरी कारले शेतीकडे वळले
आहेत. त्यातून ५० एकरांवर लागवड झाली आहे. या शेतीमुळे सामूहिक विक्री करून संघटिपणे चांगला दर मिळवणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.दर आपल्या हाती नाहीत. अनेक वेळा कारले शेतीतून उत्पादन खर्चही वसूल न झाल्याचे अनुभव आले. पण सतत कष्ट करणे व सातत्य ठेवणे यास पर्याय नाही. मी तेच केले. एकरी उत्पादकता नेहमीच चांगली मिळवण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबींमुळेच शेतीत यश मिळवता आले.
रवींद्र पवार, ९९२३५५५५८२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com