एकनाथ पवार
Rabbit Rearing Management : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर-घोटगे मार्गावर निरुखे (ता. कुडाळ) हे निसर्गसंपन्न गाव आहे. वैशिष्ट्यपूर्ण जांभळासाठी ते ओळखले जाते. खरिपात भात, नाचणी तर उन्हाळ्यात कुळीथ, मूग, चवळी, भुईमूग अशी पिके शेतकरी घेतात. आंबा, काजू, फणस, कोकम आदीचीही लागवड आहे. अलीकडील वर्षांत बांबूचे क्षेत्र शेकडो एकराने वाढले आहे.
शेतीची आवड जपलेले नीलेश
गावात नीलेश गोसावी यांचे घर आहे. वास्तविक त्यांचे बालपण, शिक्षण मुंबईत झाले. पण लहानपणापासून गावाची प्रचंड ओढ असल्याने मार्चमध्ये शाळेला सुट्टी पडताच ते आपल्या दोन बहिणींसह गाव गाठायचे. नवनवीन गोष्टी शिकायची आवड त्यांना होती. जूनमध्ये शाळा सुरू व्हायची. परंतु त्याचवेळी गावी खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतीतील काही कामांचा आनंद लुटून आठवडाभरानंतर ते मुंबईत परतायचे. ‘इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन’ या विषयातून त्यांनी अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली आहे. एका नामांकित आयटी कंपनीत सध्या ते कार्यरत आहेत. नोकरीच्या निमित्ताने दोन वर्षे त्यांना अमेरिकेतही राहावे लागले.
ससेपालनाचा मिळाला मार्ग
नोकरीच्या व्यस्ततेतही नीलेश यांनी शेतीची ओढ कायम जपली. गावी शेती वा पूरक व्यवसायांमध्ये मोठी संधी आहे. त्यामुळे गावी परतून काहीतरी वेगळे करून दाखवले पाहिजे असे त्यांना वाटायचे. ‘ॲग्रोवन’ तसेच यू-ट्यूब चॅनेलवर ते शेतीसंबंधीचे ‘व्हिडिओ’ पाहायचे. सन २०२० मध्ये कोरोनाकाळात गावी येणे झाले. गणेशोत्सव झाल्यानंतर गावीच राहायचा निर्णय घेतला. त्या काळात ॲग्रोवनच्या माध्यमातून मधमाशीपालन, वराहपालन अशा संधी अजमावल्या. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अनुकूल ठरू शकेल अशा व्यवसायाच्या शोधात ते होते. त्यातून ससेपालनाचा मार्ग योग्य वाटला. जिल्ह्यात कुठेही हा व्यवसाय दिसून आला नव्हता. एक वर्षभर मार्केटचा अभ्यास केला. फायदे-तोटे पाहिले. हरियाना भागात हा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढीस लागल्याची माहिती मिळून तेथे तीन दिवसांचे प्रशिक्षणही घेतले.
व्यवसायाची उभारणी
ससेपालनासाठी घरानजीक शेड उभारण्याचे काम सुरू झाले. परंतु रस्ता नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. वाळू, सिमेंट डोक्यावरून वाहून नेण्याचे कष्ट उपसावे लागले. बांधकामासाठी तब्बल दीड हजार चिरे लागले. ते देखील डोक्यावरूनच वाहून न्यावे लागले. अखेर सर्व संकटांवर मात करूनव्यवसायाला सुरुवात झाली. पैदाशीसाठी ७० नर व ३० मादी ससे हरियानावरून आणले होते. कोकणातील वातावरणात जमवून घेताना त्यांना प्रचंड त्रास झाला. काही सशांची मरही झाली. व्यवसायाच्या सुरुवातीलाच पहिलाच झटका बसला. परंतु एकेक गोष्ट अनुभवातून शिकत नीलेश पुढे जात राहिले. अनुभवासह अभ्यासातून व्यवस्थापनातही काही बदल केले. हळूहळू व्यवसायात जम बसून त्यात आर्थिक स्थैर्य मिळवण्यात नीलेश यशस्वी झाले.
नीलेश यांचे ससेपालन- ठळक बाबी
सुमारे अडीच वर्षांचा तयार झाला अनुभव.
सध्या सहा जातींचे संगोपन. यात न्यूझीलंड व्हाइट, सोव्हिएत चिंचीला, ग्रे जाएंट, ब्लॅक जाएंट, कॅलिफोर्निया, डच आदींचा समावेश.
स्वगुंतवणुकीतून ५० बाय ३० फूट आकाराचे शेड. यात २० पिंजरे आहेत. पैदाशीसाठी प्रति पिंजऱ्यात एक ससा असतो. सध्या सर्व मिळून संख्या साडेतीनशेपर्यंत. तेजस कदम सध्या संपूर्ण फार्म व्यवस्थापन पाहतात.
महिन्यातून दोनदा लसीकरण. जन्म झाल्यानंतर पिल्लांचा एक महिना सांभाळ त्याची आई करते.
त्यानंतर स्वतंत्र व्यवस्था. मादी एकावेळी दोनपासून कमाल दहा ते बारापर्यंत पिल्लांना जन्म देते.
पिले तीन महिन्यांपर्यंत वाढवून वजन दीड ते दोन किलोपर्यंत झाल्यानंतर विक्री करण्यात येते.
दिवसातून दोनदा खाद्य. काळी कोरडा चारा (ड्राय फीड) तर संध्याकाळी हिरवा पाला. (उदा. फ्लॉवरचा पाला). मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुऊन मगच तो दिला जातो.
बाजारपेठ, विक्री व्यवस्था
नीलेश सांगतात, की तीन प्रकारे सशांची विक्री होते. त्यानुसार दर अवलंबून असतात. पाळण्यासाठी हजार रुपये जोडी, मटणासाठी प्रति किलो सहाशे रुपये तर प्रयोगशाळांना ज्या वजनाचे ससे लागतात त्यानुसार दर आकारले जातात. मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, गुजरात येथे बाजारपेठ आहे.सशांची विष्ठा खत म्हणून अत्यंत उपयोगी असते. एक ससा वर्षभरात एक टनांच्या आसपास खत देतो. प्रति किलो ५० रुपये दराने त्याची विक्री नीलेश करतात. पहिल्या वर्षी (२०२२) सुमारे चार लाख, त्यापुढील वर्षी ६ लाखांच्या दरम्यान, तर यंदा सुमारे सात ते आठ लाखांच्या आसपास या व्यवसायातून उलाढाल झाली आहे.
नीलेश यांनी व्यवसायाच्या प्रसारासाठी the abumgu movement या नावाने ससेपालनाचे यू-ट्यूब चॅनेल सुरू केले आहे. ससेपालनात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केला आहे. त्यांच्या पुढाकारातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ, पुणे येथे दोन, अंबरनाथ येथे एक असे ससेपालन प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यांच्याकडून ससे खरेदी करण्याचा करारही नीलेश करतात. ससेपालन हा तसाकमी ठिकाणी दिसणारा व्यवसाय असल्याने पंधराशेहून अधिक व्यक्तींनी तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्या आहेत. आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपनीतील नोकरी सांभाळून नीलेश यांची शेतीत सुरू असलेली वेगळी धडपड उल्लेखनीयच म्हणावी लागेल.
नीलेश गोसावी ९८३३९०४९०२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.