
सूर्यकांत नेटके
Desi Cow : सैन्यदल व देशाच्या संरक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या फक्राबाद (जि. अहिल्यानगर) येथील माणिकराव देशपांडे यांनी पत्नी मालती यांच्या मदतीने सेंद्रिय शेती व ‘गांगेय गोशाळा’ असा प्रकल्प उभारला आहे. त्या माध्यमातून देशी तूप, गोमूत्र अर्कावर आधारित उत्पादने व सेंद्रिय शेतमाल यांचे उत्पादन करून त्यास स्वतःची ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे. शेतीसह मानवी आरोग्य सुदृढ, धडधाकट राहावे हे व्रत ठेऊनच त्यांची वाटचाल वयाच्या पंचाहत्तरीतही उत्साहाने सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड हा दुष्काळी तालुका आहे. त्यातील फक्राबाद येथे माणिकराव दत्तात्रेय देशपांडे व पत्नी मालती असे दांपत्य राहते. माणिकरावांनी सैन्यात रडार इंजिनिअर म्हणून १५ वर्षे तर माजी राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (डीआरडीओ) येथे २६ वर्षे नोकरी केली. सन १९७१ च्या लढाईतील कार्यासाठी सैन्य दलाकडून त्यांना ‘पश्चिम स्टार’ गौरव मिळालेला आहे. कुटुंबाची १८ एकर शेती असून त्या व्यतिरिक्त १५ एकर शेती त्यांनी करारावर घेतली आहे.
सैन्यात वरिष्ठ पदाचा अनुभव घेतलेल्या माणिकरावांनी शेतीशी नाळ कायम ठेवली. सन २०१० मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांनी दोन देशी गायींपासून शेतीला सुरुवात केली. गायींच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ करीत आज त्यांच्याकडे ६० देशी गायी असून, बहुतांश गीर आहेत. पाच एकरांत मुक्तसंचार गोठा आहे. देशपांडे ऑरगॅनिक फार्म व त्या अंतर्गत ‘गांगेय गोशाळा’ असा प्रकल्प उभारला आहे. देशी गोवंश संशोधन केंद्र, नागपूर येथे दहा दिवसांचे प्रशिक्षण माणिकरावांनी घेतले आहे. वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही त्यांचा शेतीतील उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.
प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती
लोकांचे व त्याचबरोबर मातीचे आरोग्य सुदृढ, धडधाकट राहावे यासाठी देशी गोपालनावर आधारित सर्व शेती शंभर टक्के सेंद्रिय केली आहे. त्यास सेंद्रिय प्रमाणीकरणही मिळवले आहे. देशी गोवंशाची जनुकीय तपासणी करून गोठ्यात त्यांना उत्तम प्रकारे वाढवले आहे. महिन्याला ४० ते ५० किलोपर्यंत देशी तूप तयार केले जाते. महिन्याला दोनशे ते तीनशे लिटर गोमूत्र संकलित होते. त्यावर आधारित व आयुर्वेदिक वनस्पतींच्या वापरातून सुमारे नऊ प्रकारची अर्क उत्पादने तयार केली जातात. शेण- गोमूत्रावर आधारित साबण, मच्छर पळवून लावणारी उदबत्तीही तयार केली जाते.
सेंद्रिय शेतीमाल
-दरवर्षी १० एकरांपर्यंत ज्वारी, दोन ते तीन एकरांत खपली व काळ्या कुसळाचा गहू, चार एकरांत लिंबू, उडीद, मूग, हुलगा, मटकी, बाजरी, हरभरा आदी पिके.
-वर्षाला १० ते १५ टनांपर्यंत दर्जेदार शेणखत उपलब्ध. त्याचा शेतीत वापर.
-महिन्याला चार हजार लिटरपर्यंत जिवामृत स्लरी निर्मिती. शेतात वापर होऊन उर्वरित विक्री.
- ज्वारी- एकरी १२ ते १४ क्विंटल तर गव्हाचे एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन.
- जनावरांसाठी आठ एकरांपर्यंत मका, देशी वाणाचे गवत, झुंजवा (कांडी गवत) आदींची लागवड.
- चाऱ्यासाठीही पूर्णपणे शेणखत, गोमूत्राचा वापर. त्यातून दर्जेदार उत्पादन मिळून दुधाचा दर्जा चांगला राहतो.
उत्पादनांना तयार केले ग्राहक
आपल्या सेंद्रिय, आरोग्यदायी उत्पादनांना बाजारपेठ तयार करण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक आदी भागांमध्ये देशपांडे यांनी ग्राहकांसाठी शिबिरे घेतली. त्यांना या उत्पादनांचे महत्त्व समजावून दिले.
आज त्यांचे सुमारे अडीचशे ग्राहक तयार झाले आहेत. त्यातून जागेवरून, कुरिअर व आघाडीच्या कंपनीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म याद्वारे उत्पादनांची विक्री होत आहे. विक्रीसाठी स्वतःचे ॲप विकसित केले असून, उत्पादनांच्या प्रमोशनसाठी ‘सोशल मीडिया’ताही आधार घेतला जातो. तुपाची लिटरला साडेतीन हजार रुपये दराने विक्री होते. सेंद्रिय मालाला वेगळी चव असल्याने किलोला ज्वारी ७० ते ७५ रुपये तर खपली गहू १२० रुपये दराने विकला जातो. महिन्याला एकूण दोन ते तीन लाखांची उलाढाल होते.
व्यवस्थापनातील बाबी
-गायी व वासरांना ताक पाजले जाते. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या धान्याचा खुराक, गहू, ज्वारी, मका, बाजरी, वेगवेगळ्या डाळी यांचा भरडा भिजवून दिला जातो. त्यातून जनावरांची वाढ चांगली होते. प्रतिकारशक्ती चांगली राहते. गायी आजारी पडण्याचे प्रमाण अल्प आहे.
-व्यवस्थापनासाठी आठ मजूर तैनात आहेत.
--सततच्या आणि केवळ सेंद्रिय घटकांच्या वापरातून जमिनीची सुपीकता वाढीस लागली आहे.
सन्मान
देशी गोपालन, तूप निर्मिती व सेंद्रिय शेतीतील कार्य यांची दखल घेऊन कृषी- आत्मा विभागाकडून तसेच नाशिक येथील एका फोरमकडून उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने देशपांडे दांपत्याचा सन्मान करण्यात आहे.
जलसंधारण कामांसाठी पुढाकार
जामखेड तालुक्यात पाण्याचे कायम दुर्भिक्ष असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी माणिकरावांनी आपल्या गावी जलसंधारणासाठी पुढाकार घेतला. त्याद्वारे गावकरी, विविध संस्था व कंपन्यांचा ‘सीआर फंड’ यांच्या मदतीतून तीन बंधारे, चार ओढ्यांचे पुनरुज्जीवन झाले. साडेआठ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता तयार झाली. परिसरातील जलस्रोत बळकट होऊन शेतीला पाणी उपलब्ध झाले. माणिकराव पंधरा वर्षांपासून सेवा सहकारी सोसायटीचे बिनविरोध अध्यक्षही आहेत.
कुटुंबाचा सहभाग
माणिकरावांचे मोठे चिरंजीव जयदीप अहिल्यानगर येथे वकिली व्यवसाय करतात. धाकटे चिरंजीव
धनराज नाशिक येथे प्राध्यापक असून ते घरच्या उत्पादनांचे प्रमोशन, ब्रॅंडिंग व विक्री यात मोठी मदत करतात. मुलगी रेणुका व्यवसायानिमित्त अमेरिका येथे असते.
संपर्क : माणिकराव देशपांडे, ९८३४९७२६४०, ९४२१४३६७०३
धनराज देशपांडे, ९४२२३१२०९७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.