Sericulture : प्रयोगशील शेतीत लाभतेय ‘ती’ ची रेशीम साथ...

Silk Farming : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात गुरुवारी (ता. ११) रेशीमशेती हा चर्चासत्राचा विषय होता.
Silk Farming
Silk Farming Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : सिद्देश्वर ज्ञानेश्वर भानुसे हे बोरगाव (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील प्रयोगशील रेशीम उत्पादक. केवळ रेशीमशेतीमुळेच आपण आर्थिक प्रगती साधू शकलो आणि महत्त्वाचे म्हणजे या तुती लागवडीत ‘तू’ आणि ‘ती’ची साथ मोलाची ठरली.

पत्नी आणि कुटुंबियांच्या सहकार्याने कशापद्धतीने आपण लखपती झालो, याचे अनुभव ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनातील रेशीम शेतीच्या चर्चासत्रात मांडले. त्यांच्या अनुभवाने उपस्थितांनाही रेशीमशेतीची प्रेरणा मिळाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात गुरुवारी (ता. ११) रेशीमशेती हा चर्चासत्राचा विषय होता. प्रयोगशील रेशीम शेतकरी म्हणून भानुसे यांनी आपले अनुभव मांडले. ते म्हणाले, मी गेल्या सात वर्षांपासून रेशीम शेतीत आहे.

साडेतीन एकरांवर असणारी माझी रेशीम शेती दरवर्षी दहा लाखांचे उत्पन्न मिळवून देते आणि या रेशीमशेतीला साथ मिळाली आहे, माझी पत्नी सौ. संगीता आणि बंधू नागेश्वर आणि वहिनी सौ. कावेरी यांची.

संपूर्ण रेशीम शेतीचे व्यवस्थापन या चौघांवरच आहे. केवळ स्वतःपुरते न थांबता, गावातील १५ शेतकऱ्यांना एकत्र करत रेशीम उत्पादक गट सुरू केला. या गटामध्ये चर्चा होते, ती केवळ रेशीम शेती आणि पीकपद्धतीची, आर्थिक गुंतवणुकीची, अशी माहितीही त्यांनी दिली.

Silk Farming
Sericulture Management : रेशीम शेतीत व्यवस्थापन तंत्रातून मिळविले यश

या वेळी त्यांनी अनेक तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. पण त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तुती लागवड यशस्वी का झाली, याचे गमक म्हणजे ‘तू आणि ती’ ची साथ... थोडक्यात नवरा आणि बायको या दोघांनी केलेली मेहनत आणि शेतीमधील चढउतार, यश अपयशाला दिलेली साथ.

ते बोलता बोलता म्हणाले, की, आज आम्ही दोघे नवरा- बायको विचारपूर्वक कष्ट करतो, त्यामुळे आजच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये टिकून आहोत. गावात आमचा रेशीम शेतकऱ्यांचा गट टिकून आहे. आम्ही गटातील सर्व जण शेती करताना बायकोच्या मताची देखील दखल घेतो, तिचे मत आम्हाला नियोजनात उपयोगी ठरते.

Silk Farming
Sericulture Industry : शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती उद्योग पर्याय ठरावा

उत्पन्नातील १० टक्के वाटा पत्नीच्या नावे

भानुसे यांनी आपल्या अनुभवातून एक उद्बोधक किस्साही सांगितला, ते म्हणाले, आमच्या रेशीम शेतकऱ्यांच्या गटात ठरलंय की, वर्षभरात रेशीम शेतीमधून जे उत्पन्न येईल, त्यातील १० टक्के वाटा पत्नीच्या बँक खात्यात आम्ही सर्व जण जमा करतो.

तो पैसा तिची स्वतःची कमाई आहे. कारण, रेशीम शेतीतले ६० टक्के कष्टाचे काम या महिलाच करतात. आम्ही कुटुंबाच्या खर्चाला तिच्या मेहनतीची कमाई वापरत नाही. त्यामुळे आमची तुती लागवड आणि शेती यशस्वी आहे.

आर्थिक बचत हा महिलांचा स्वाभाविक गुणधर्म आहे, माझी पत्नी दरवर्षी किमान ५० हजाराची बचत करते, यातून एक तर ती सोने खरेदी करते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च करते, मुला-मुलींना पॅाकेटमनी देते आणि जेव्हा रेशीम शेतीमध्ये गुंतवणुकीची आवश्यकता असेल, तेव्हा मलाही पैसे देते. स्वतःच्या कष्टाचा पैसा हाती आल्यामुळे महिला उत्साहाने रेशीमशेतीला बळ देतात, यातून आमची उत्पन्नवाढ होते आहे. थोडक्यात शेतीमधील महिलांच्या मेहनतीला न्याय द्या, तिचे मत निश्चितपणे नियोजनात घ्या, तुम्ही ‘ती’ ला नाराज करू नका, शेती तुम्हाला नाराज करणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com