गोरक्ष गाडीलकर, महेंद्र ढवळे, संजय फुले
Opportunities in The Sericulture Industry : रेशीम धागा, लोकरी धागा, कापसापासून बनवलेला सुती धागा, ज्यूट इत्यादी नैसर्गिक धाग्यांच्या श्रेणीत गणले जातात. तर कृत्रिम धाग्याच्या श्रेणीत रेऑन, टेरीकॉट, पॉलिस्टर, टेरीलिन, नायलॉन यांचा समावेश होतो. या सर्व धाग्यांत रेशीम धाग्याला ‘धाग्यांची राणी’ असे संबोधले जाते.
रेशीम धाग्याचा शोध सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये लागला. रेशीम धाग्यांचे चार प्रकार आहेत. जागतिक स्तरावर सुमारे २२ प्रमुख राष्ट्रांमध्ये रेशीम उत्पादन होते. काही वर्षांचा अपवाद वगळता चीनचा रेशीम उत्पादनात ८० ते ८४ टक्के वाटा असून, चीन प्रथम क्रमांकावर आहे. सध्या १४ टक्के रेशीम उत्पादनात वाटा असलेल्या आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय उद्योग जगताचे पितामह जमशेदजी टाटा यांनी त्या काळी इटली, फ्रान्स, जपान, चीन, इंग्लंड अशा अनेक देशांना भेटी देऊन तेथील रेशीम शेती उद्योग आणि रेशीम वस्त्र निर्मितीची पाहणी करून भारतामध्ये १८९६ मध्ये बंगळूरजवळ रेशीम पार्कची उभारणी केली. त्या ठिकाणी जपानी दांपत्याच्या मदतीने रेशीम शेती उद्योगास सुरुवात केली.
अशा पद्धतीने भारतात विज्ञानावर आधारित रेशीम शेती उद्योगाची सुरुवात झाली. तेव्हापासून आपले जपानशी रेशीम शेती उद्योगात घनिष्ठ संबंध निर्माण झाले. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारच्या केंद्रीय रेशीम मंडळाची स्थापना झाली.
जपानच्या सहकार्याने जायका प्रकल्पाच्या माध्यमातून भारतात जपानी रेशीम कीटकांच्या जाती प्रजाती त्याचप्रमाणे रेशीम धागाकरण यंत्रसामग्री आदी तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यात जपानमधील तज्ज्ञांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
काही काळ रेशीम उत्पादनात अग्रेसर असणारा जपान मागील काही वर्षांपासून मनुष्यबळाअभावी रेशीम उत्पादनात मागे पडला आहे.
शेकडो वर्षे रेशीम वस्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान जगापासून गुपित ठेवणाऱ्या चीनचे जगातील इतर राष्ट्रांना रेशीम उत्पादनाचे तंत्रज्ञान देण्यामध्ये उदासीनता दिसून येते. रेशीम शेती उद्योगात रोजगाराची प्रचंड क्षमता असून, निर्यातीच्याही चांगल्या संधी आहेत.
जगभरातील रेशीम उद्योगाचा आलेख
मागील दशकात जागतिक स्तरावरील विविध देश करीत असलेल्या रेशीम उत्पादनाचा विचार करता चीन पहिल्या क्रमांकावर (८० ते ८४ टक्के वाटा) आणि दुसऱ्या क्रमांकावर भारत (१४ ते १६ टक्के वाटा) आहे.
तसे पाहिले तर पहिला क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये उत्पादनात फार मोठी दरी आहे. जागतिक स्तरावरील रेशीम उत्पादनाचा विचार करता भारताचा कधीही २० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा राहिलेला नाही.
जगामध्ये सध्या चीन आणि भारत यांचा रेशीम उत्पन्नात वरचष्मा असून इतर देशांचा रेशीम उत्पादनातील वाटा नगण्य स्वरूपात आहे. अलीकडच्या काळात रेशीम उत्पादनामध्ये चीन मागे पडत आहे.
भारतातील रेशीम उत्पादन आणि मागणी यामध्ये फार मोठी तफावत आहे. त्यामुळे आपल्याला रेशीम आयात करावे लागते. यामुळेच आपल्याकडे रेशीम उत्पादनात अमर्याद संधी आहेत.
रेशीम कोषापासून धागा निर्मिती, धाग्यापासून कापड निर्मिती, तुती पाल्यापासून ग्रीन टी निर्मिती, प्यूपापासून औषधी तेल निर्मिती, मत्स्य उद्योगात प्यूपापासून फिश मिल निर्मिती केली जाते. त्याचबरोबर रेशीम धाग्यातील सेरिसिन या रसायनापासून कर्करोगावरील औषध निर्मिती करतात.
रेशीम वस्त्रापासून पडदे, उशी कव्हर, गालिचा निर्मिती केली जाते. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जगात रेशीम वस्त्रांबाबत असणारे आकर्षण लक्षात घेता निर्यातीला देखील चांगल्या संधी आहेत.
या सर्व गोष्टींची दखल घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने रेशीम शेती उद्योग गतिमान करण्यासाठी विविध धोरणांची आखणी केली आहे. त्यामुळे शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांनी रेशीम शेती उद्योगात तयार होणाऱ्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.
मागील दहा वर्षांतील जागतिक स्तरावरील देशनिहाय रेशीम उत्पादन (टन)
देश २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१
बांग्लादेश ४३ ४४.५ ४४ ४४ ४१ ४१ ४१ ४१ ४१
ब्राझील ८.५ ८ ८ ९ १० १० १० १० ९
बल्गेरिया १,३०,००० १,४६,००० १,७०,००० १,५८,४०० १,४२,००० १,२०,००० ६८,६०० ५३,३५९ ४६,७००
चीन ०.६ ०.५ १ -- -- -- १ १ १
कोलंबिया ०.७ ०.८२ १ १ १ १ २ २ २
इजिप्त २६,५३८ २८,७०८ २८,५२३ ३०,३४८ ३१,९०६ ३५४६८ ३५,८२० ३३,७७० ३४,९०३
भारत १६ १० ८ ४ ३ ३ ३ ३ ३
इंडोनेशिया १२३ ११० १२० १२५ १२० ११० २२७ २७० २७२
इराण ३० ३० ३० ३२ २० २० १६ १६ १०
जपान १८ १५ ५ ६ ७ ७ ८ ८ ८
मादागास्कर ३०० ३२० ३५० ३६५ ३६५ ३५० ३७० ३७० ३७०
उत्तर कोरिया -- -- -- - -- -- १ १ १
रुमानिया १ १.१ १ २ २ २ २ २ २
फिलीपाईन्स १.६ १.२ १ १ १ १ १ १ १
कोरिया ०.७ ०.५ -- -- -- -- १ १ १
सिरीया ६८० ६९२ ६९८ ७१२ ६८० ६८० ७०० ५२० ५०३
थायलंड ४ ४ ३ २ २ २ २ २ २
ट्युनिशिया २५ ३२ ३० ३२ ३० ३० ५ ५ ५
तुर्की -- -- -- -- -- -- ३ ३ ३
युगांडा ९८० ११०० १२०० १२५६ १२०० १८०० २०३७ २०३७ २०३७
उझबेकीस्तान ४७५ ४२० ४५० ५२३ ५२० ६८० ७९५ ९६९ १०६७
एकूण १५९७७६ १७८०५८ २०२०७३ १९२५१२ १७७५०७ १५९८५५ १०९१११ ९१७६५ ८६३११
- संजय फुले, ९८२३०४८४४०
(गोरक्ष गाडीलकर हे रेशीम संचालनालय, नागपूर येथे संचालक आणि महेंद्र ढवळे हे उपसंचालक आहेत. संजय फुले हे जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे येथे रेशीम विकास अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.