
मुकुंद पिंगळे
नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील प्रयोगशील शेतकरी गणेश निसाळ यांनी सतरा वर्षापूर्वी दुग्घव्यवसायास सुरवात केली. शेतकऱ्यांचे नेटवर्क, यंत्रसामग्री, दोन आऊटलेटस व तंत्रज्ञान या माध्यमातून क्षमता बळकटीकरणासह व्यवसाय विस्तारीकरण साधले. दूध व त्या आधारित पदार्थांचा ‘एकता धन’ ब्रँड लोकप्रिय करीत महिन्याला १४ लाखांच्या यशस्वी उलाढालीचा पल्ला गाठला आहे.
नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील गणेश निसाळ यांची प्रगतिशील, प्रयोगशील शेतकरी अशी ओळख आहे. त्यांची तीन एकर शेती आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर २००६ मध्ये त्यांनी दुग्धव्यवसायात पाऊल टाकले. दहा म्हशी व चार गायींचे संगोपन व दररोज ६० ते ७० लिटर दूध उत्पादन असे सुरवातीचे व्यवसायाचे स्वरूप होते. परिसरात दुधाची विक्री व्हायची. मात्र अर्थकारण अजूनही सक्षम होत नव्हते. त्यामुळे मूल्यवर्धनातून एक पाऊल पुढे टाकत २००९ मध्ये घरगुती स्वरूपात दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती सुरू केली.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या पदार्थांना बाजारपेठ मिळू लागल्यानंतर आत्मविश्वास वाढला. मग व्यावसायिक विस्तार करण्याच्या दृष्टीने आतेभाऊ प्रवीण गुळवे यांच्यासोबत भागीदारीतून ‘एकता डेअरी’ सुरू केली. प्रक्रिया व्यवस्थापनात कुशलता येण्यासाठी ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून पुणे व नाशिक येथे ‘दुग्धजन्य पदार्थ निर्मिती’ प्रशिक्षण पूर्ण केले. शिवाय विविध प्रक्रिया उद्योग व संस्थांना भेटी देऊन तेथील तांत्रिक व्यवस्थापन अभ्यासले.
प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती
परिसरातील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारले आहे. त्यातून दररोज ८०० च्या लिटरच्या आसपास दूध संकलन होते. सुमारे पाचशे लिटर दुधाची विक्री होते. भगूर येथे ५० बाय ५० फूट आकाराचे युनिट उभारले आहे. तेथे उर्वरित दुधापासून पदार्थांची निर्मिती होते. यात चक्का, पनीर, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, खवा, लस्सी, ताक आदींचा समावेश आहे. सुमारे नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करून २५ केव्ही क्षमतेचे सौर पॅनेल येथे बसविले आहेत. त्यातून वीजबिलात ६० टक्के कपात करण्यात यश मिळवले आहे. दूध व प्रक्रिया पदार्थांचे आऊटलेटही येथे उभारले आहे.
गुणवत्ता, शुद्धता व स्वच्छता या बाबींवर मुख्य भर दिल्याने पदार्थांनी ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. ‘एकता धन’ या नावाने ब्रँड निर्माण केला आहे. महिन्याला सुमारे १३ ते १४ लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत त्यांनी यशस्वी पल्ला गाठला आहे. सुमारे आठ ते नऊ जणांना त्यांनी वर्षभराचा रोजगार दिला आहे.
प्रक्रिया व्यवसायातील ठळक बाबी
सुमारे १२ बाय १२ फूट आकारमानाच्या शीतगृहाची उभारणी. त्याद्वारे पदार्थांची योग्य साठवणूक शक्य झाली.
खवा, श्रीखंड निर्मिती, दूध पॅकिंग आदी यंत्रांसह बल्क मिल्क कूलरची सुविधा.
सन २०१४ मध्ये पाचशे लिटर क्षमतेचे दूध पाश्चरायझेशन युनिट उभारले. त्यातून दूध टिकवण व साठवणूक क्षमता विकसित केली.
''एफएसएआयआय’ या अन्न सुरक्षितता संस्थेचे प्रमाणीकरण.
देवळाली कॅम्प येथे दुसरे ‘आऊटलेट’ उभारले आहे.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गुणवत्तेनुसार दुधाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न.
उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने, क्षेत्रीय भेटी व प्रशिक्षणात सहभाग.
उत्पादनातील त्रुटी ग्राहकांकडून समजून घेत त्यानुसार सुधारणा.
कोजागरी व सणासुदीचे नियोजन
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाला अधिक मागणी असते. त्यामुळे त्यावेळची मागणी लक्षात घेऊन एक दिवस आधी पदार्थांचे उत्पादन बंद ठेवण्यात येते. त्याकाळात ९०० ते एक हजार लिटर दुधाची मागणी पूर्ण केली जाते. ग्राहक नियमित असल्याने कुठलीही भाववाढ न करता नियमित दरानेच ही विक्री असते. गणपती, दसरा, दिवाळी अशा विविध सणासुदीच्या काळात पदार्थांना असलेली मागणी लक्षात घेऊन बासुंदी, मलई बर्फी व पेढा आदी उत्पादने तयार केली जातात. या काळात सुमारे ७०० लिटरपर्यंत प्रक्रिया केली जाते.
ज्ञानाचे उपासक व सन्मान
गणेश कला शाखेतील पदवीधर असून त्यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही पदविका पूर्ण केली आहे. राज्यातील तसेच गुजरातमधील प्रदर्शने, चर्चासत्रे, कार्यशाळांना भेटी दिल्या. महत्त्वाच्या संस्था, डेअरी आदींचे कार्य दोन-तीन दिवस मुक्काम करून जाणून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या २०१६ मधील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गणेश यांचा सन्मान करण्यात आला आहे.
व्यवसायातील भागीदार प्रवीण यांनी शिरवळ (जि. पुणे) येथे दुग्ध व्यवसायातील प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा (राहुरी) पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे आयोजित ''दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आधुनिक तंत्रज्ञान'' या कार्यक्रमात गणेश यांनी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल २०२० या कार्यक्रमातही ऑनलाइन सहभाग त्यांनी घेतला होता.
ॲग्रोवनचे वाचक
गणेश आणि प्रवीण ॲग्रोवन''चे सुरवातीपासूनचे वाचक आहेत आत्तापर्यंतचे अनेक अंक त्यांनी जतन केले आहेत. त्यातील उपयुक्त लेख, यशकथा, प्रयोग, सेंद्रिय शेती, नव्या योजना, दुग्ध व्यवसाय आदी विषयांच्या स्वतंत्र फाईल्स बनवल्या आहेत. गणेश यांनी सेंद्रिय शेती, शेतकरी आत्महत्येची कारणे, दुग्धव्यवसाय, टेरेस फार्मिंग आदी विषयांवर चार पुस्तके लिहिली आहेत. ते कविताही करतात. श्री. महादेवाचे भक्त असलेल्या गणेश शेती, विज्ञान व अध्यात्म या विषयांवर विद्यार्थी व भाविकांसाठी कार्यक्रमही आयोजित करीत असतात.
गणेश निसाळ ९२२६७५९९३४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.