Agriculture Success Story : पळासखेडा बुद्रुक (ता. जामनेर, जि. जळगाव) केळी, भाजीपाला व कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील वंदना प्रभाकर पाटील यांच्या कुटुंबाची पाच एकर बागायती शेती आहे. यामध्ये लिंबू, पेरू आदी पिकांची लागवड आहे.
गावातील महिलांना वर्षभर रोजगार मिळण्यासाठी वंदनाताईंनी दहा वर्षांपूर्वी गायत्री स्वयंसहायता समूहाची स्थापना केली. यामध्ये वंदना पाटील यांच्यासह कल्पना पाटील, प्राजक्ता पाटील, सुनंदा पाटील, ज्योत्स्ना पाटील, मीराबाई सोनवणे, कमलबाई सोनवणे, पुष्पा सोनवणे, मनीषा महाजन, सोनाली पाटील कार्यरत आहेत.
या समूहाला अर्चना सोनवणे, सुनीता सपकाळे यांचे मार्गदर्शन मिळते. समुहाने सुरुवातीला उडीद पापड, चकली, लोणचे निर्मिती सुरू केली. टप्प्याटप्प्याने लोणचे, पापड विक्री व्यवसायात महिलांना यश मिळाले. जळगाव, मुंबई, नाशिक आदी भागातील प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादने राज्यभर पोहोचल्याने मागणी वाढू लागली. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्णय समूहाने घेतला.
भाजीपाला निर्जलीकरणाला सुरुवात ः
लोणचे, पापड व्यवसायात यश मिळविल्यानंतर महिला समूहाने गेल्या वर्षी गायत्री फूड्सची स्थापना केली. सदस्यांनी सोलर ड्रायरच्या माध्यमातून भेंडी, टोमॅटो, ताकात भिजविलेली हिरवी मिरची, कारली आदींचे फ्लेक्स तयार करून निर्जलीकरणास सुरुवात केली. याचबरोबरीने आले, बीट, शेवगा, कांदा, लसूण पावडर आणि शेवगा शेंगांचे निर्जलीकरण केलेले तुकडे आदींची निर्मिती केली जाते. या उत्पादनांची ग्राहकांना थेट विक्री केली जाते. मागणीनुसार केळफुलांची पूड तयार केली जाते. या उत्पादनासही बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
महिला गटाकडे पल्व्हलायझर, सोलर ड्रायर, कटिंग व पॅकिंग यंत्र, पापड निर्मिती यंत्र आहे. यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांतून निधी उपलब्ध झाला. यांत्रिकीकरणामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या निर्मितीचा वेग वाढला आहे. समूहाला एक लाख ८१ हजार रुपये अनुदान मिळाले.
तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदरामध्ये तीन लाख ९२ हजार रुपये बीज भांडवल मिळाले. निर्जलीकरण केलेल्या पदार्थांच्या विक्रीसह पापड, लोणचे, भाजणी, चकली आदींची विक्री केली जाते. उपपदार्थ निर्मितीच्या वेळेस स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाते. तसेच दर्जेदार शेतीमालाचा उपयोग केला जातो.
प्रशिक्षणावर भर ः
सदस्यांनी पहिल्यांदा बाजारपेठेचा अभ्यास केला. त्यानुसार प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात तीन दिवस प्रक्रियेबाबत प्रशिक्षण घेतले.
दर्जेदार प्रक्रिया उत्पादन आणि विक्रीतील प्रगतीचा वाढता आलेख लक्षात घेऊन या गटाला शासनाकडून हिरकणी पुरस्कार आणि वंदना पाटील यांना महिला व बालकल्याण विभागाकडून अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाला.
जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या समूहाला कृषी दिनाला विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे. विविध शहरांत शासनाकडून आयोजित कृषी प्रदर्शनांत सहभागासंबंधी गटाला पुरस्कार मिळाले आहेत.
थेट शेतकऱ्यांकडून खरेदी ः
प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. पळासखेडा, जामनेर भागांतील शेतकऱ्यांकडून टोमॅटो, कांदा, आले, शेवगा, कढीपत्ता खरेदी केला जातो. टोमॅटो, कांद्याचे दर कमी असताना शेतकऱ्यांकडून बाजारातील प्रचलित दरानुसार थेट खरेदी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचतो.
महिलांना मिळाला रोजगार ः
प्रक्रिया उद्योगातून महिला समूहाने आर्थिक स्रोत भक्कम करीत दर महिन्याला दीड लाखांपर्यंत उलाढाल वाढविली आहे. यातून गटाला खर्च वजा जाता ४० ते ४५ हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. सणावाराच्या काळात ही उलाढाल वाढते.
वर्षभर समूहातर्फे विविध पदार्थांची निर्मिती केली जाते. यामध्ये गटातील सदस्या सक्रिय असतात. काम अधिक असल्यास गावातील ८ ते १० महिलांनाही रोजगार दिला जातो. या महिलांना वर्षातून किमान १५० दिवस काम मिळते. प्रति दिन २०० रुपये मजुरी दिली जाते.
शहरी बाजारपेठेत विक्री ः
लोणची, पापड विक्रीमुळे राज्यभर ग्राहकांशी थेट संपर्काचा फायदा प्रक्रिया उत्पादनांच्या विक्रीसाठी झाला. कढीपत्ता, शेवगा पाने, केळफूल, आले, लसूण पावडरीला जळगाव, मुंबई, पुणे बाजारपेठेत चांगली मागणी आहे. मुंबई येथील एका खरेदीदाराने केळफुलाच्या पावडरीसाठी कायमस्वरूपी मागणी नोंदविली आहे.
विविध उपपदार्थांच्या विक्रीसाठी मुंबईस्थित स्मिता पाटील यांची चांगली मदत होते. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन १०० ग्रॅम पाऊच पॅकिंगमध्ये विक्री केली जाते. तसेच मागणीनुसार किलोमध्येही पावडरीची विक्री केली जाते.
उत्पादनांचे दर (प्रति किलो)
शेवगा पानांची पावडर - ८०० रुपये
कढीपत्ता पावडर - ५०० रुपये
लसूण पावडर - ५०० रुपये
बीट पावडर - १००० रुपये
आले पावडर - ७०० रुपये
शेवगा शेंगा पावडर - ६०० रुपये
टोमॅटो पावडर - ७०० रुपये
कांदा पावडर- ७०० रुपये
टोमॅटो फ्लेक्स - ७०० रुपये
कारली फ्लेक्स - ७०० रुपये
भेंडी फ्लेक्स - ६०० रुपये
हिरवी मिरची फ्लेक्स - ५०० रुपये
ताकतील ओली मिरची - ५०० रुपये
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना ः
वंदना पाटील यांनी शेती आणि प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी गायत्री शक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली आहे. ही कंपनी येत्या काळात कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहे. सध्या कंपनीच्या ३०० महिला सभासद आहेत.
या महिला समूहाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, निवृत्त कृषी उपसंचालक अनिल भोकरे, ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, विषय विशेषज्ञ तुषार गोरे, पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, विषय विशेषज्ञ डॉ. धीरज नेहेते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील विपणन कामकाज सांभाळणारे हरेश्वर भोई आदींचे मार्गदर्शन मिळाले आहे.
सामाजिक कामात सहभाग ः
१) चिंचोली (ता. जामनेर) येथे पाणी फाउंडेशन, ग्रामपंचायतीच्या जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग.
२) गावामध्ये १०० वृक्षांची लागवड आणि संवर्धन.
३) दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या मनोबल प्रकल्पास अर्थसाह्य.
४) कोविड काळात १६ ग्राम पंचायतींना सुमारे नऊ लाख रुपयांच्या मास्कची विक्री.
संपर्क ः वंदना पाटील, ७२७६७४२९५५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.