Success Story : संगमेश्वर तालुक्यातील संतोष भडवळकर यांनी शेतीमध्ये मिळवली स्वयंपूर्णता

Dairy Business : राजवाडी (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) येथील संतोष भडवळकर यांनी भातशेती, त्याला विविध भाजीपाला व छोटेखानी स्वरूपात दुग्ध व्यवसायाची जोड देत उत्पन्नाची विविध साधने निर्माण केली आहेत. त्यातून शेतीत स्वयंपूर्णता मिळवली आहे.
Success Story
Success StoryAgeowon

Success Story Update : रत्नागिरी जिल्ह्यात राजवाडी (ता. संगमेश्‍वर) येथील संतोष भडवळकर यांची वडिलोपार्जित सुमारे दीड एकर शेती आहे. आपल्या सुपीक जमिनीत ते पारंपरिक पद्धतीने भात शेती करायचे. मात्र आपल्या शेतीची मर्यादा पाहात अन्य शेतकऱ्यांकडील एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन आज अडीच एकरांवर ते भातशेती करतात.

भातलावणी करण्यापूर्वी संपूर्ण शेताची नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घेण्यात येते. राजवाडी गाव परिसरात पारंपरिक पद्धतीने लागवड होते. वाडा कोलम तसेच अन्य विविध जातींचा वापर संतोष करतात. यंदा रत्नागिरी ८ या जातीची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

घरच्या वापरासाठी त्यांना बारीक तांदूळ लागतो, त्यानुसार तशा वाणाची निवड केली आहे. दरवर्षी एकूण क्षेत्रातून २७ क्विंटल उत्पादन ते घेतात. त्यातील काही प्रमाणात भात संघाला विक्री होते.

मागील हंगामात क्विंटलला दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. अलीकडील काही वर्षांमध्ये १८०० ते १९०० रुपयांपर्यंत दर त्यांना मिळायचा.

Success Story
Dairy Business : शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाकडे कल वाढत असेल तर त्याचे स्वागतच

यातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग बियाणे आणि अन्य खर्चासाठी होतो. पॉवर टिलर घेतला असल्याने मशागतीचे काम सोपे झाले आहे. मजुरांवरील अवलंबित्वही कमी झाले आहे. गावामधील आजूबाजूचे शेतकरी एकत्र येऊन एकमेकांना शेतीसाठी सहकार्य करतात.

त्यातून श्रमांची विभागणी होते. कामे वेळेत व सुकर होतात. सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस मजुरांवर होणाऱ्या सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये खर्चाची बचत केल्याचे संतोष सांगतात.

भाजीपाला व दुग्ध व्यवसाय

भातशेतीचा हंगाम संपल्यानंतर भाजीपाला लागवडीला सुरुवात होते. एक एकर क्षेत्रात विविध पिके घेतली जातात. यात कारले, दोडका, भेंडी, गवार, कलिंगड, टॉमेटो आदि पिकांचा समावेश असतो. या पीक पद्धतीतून एकूण सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न साडेतीन ते चार महिन्यांच्या काळात मिळते.

शेतीला जोड म्हणून जर्सी व एचएफ या संकरित जातीच्या चार गायी आहेत. दिवसाला सुमारे १५ लिटरपर्यंत दूध संकलन होते. सकाळी उपलब्ध होणारे दूध वारणा सहकारी दूध संघाला दिले जाते. संध्याकाळचे दूध स्थानिक स्तरावर थेट विकले जाते. त्यास लिटरला ५० रुपये दर मिळतो. गाईसाठी ५० किलोचे खाद्य वारणा संघाकडून दिले जाते.

संतोष यांनी भात, भाजीपाला या शेतीला काजू बागेचीही जोड दिली आहे. त्यात वेंगुर्ला आणि देशी काजूची अशी साठ झाडे आहेत. त्यामधून साधारण १०० ते १२५ किलो काजू बी मिळते.

संपर्क - संतोष भडवळकर, ९६५७९६६४५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com