संदीप नवले
Vegetable Farming Planning : पुणे- सोलापूर महामार्गावर पुणे शहरापासून सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर मातोबाची आळंदी (ता. हवेली) हे गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे १० हजार ते १५ हजारांच्या आसपास आहे.
पुरंदर आणि हवेली या तालुक्यांच्या हद्दीवर हे गाव असून, पावसाचे प्रमाण तसे कमीच असते. गावाजवळून खडकवासला धरणाचा कालवा जात असल्याने येथील अनेक शेतकऱ्यांनी पाइपलाइन करून आपल्या शेतापर्यंत पाणी आणले आहे. त्यामुळे गावाचा परिसर काही प्रमाणात बागायती झाला आहे.
पालेभाज्यांमधील कुटुंब
गावातील युवा शेतकरी अभिषेक जवळकर पालेभाज्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘बीटेक’ची पदवी घेतली आहे. वडील सूर्यकांत यांचे निधन झाल्याने शेतीची जबाबदारी त्यांना आपल्या खांद्यावर घ्यावी लागली. त्यांचे बंधू ओंकार नोकरीत आहेत.
अभिषेक यांनी आपली सहा एकर शेती सांभाळताना पालेभाज्यांना प्रमुख व व्यावसायिक पिके बनविले आहे. पूर्वी ते कांदा, झेडू अशी पिके घेत. आजही पाण्याच्या उपलब्धतेनुसार काही प्रमाणात ही पिके ते घेतात. साधारणपणे २०२० पासून अभिषेक यांनी पालेभाज्या शेतीत सातत्य ठेवले आहे.
सुरवातीला हा पिकांचा पर्याय निवडल्यानंतर अनेक अडचणी आल्या. परंतु हार न मानता जिद्द कायम ठेवत या पिकांतील बारकावे जाणून घेत त्यात कुशलता संपादन केली. विक्रीच्याही सुरुवातीला अडचणी आल्या. परंतु गावापासून जवळ असलेले पुणे शहर, शेवाळवाडी व जागेवरच थेट विक्री करण्याच्या दृष्टीने चांगला बसवला.
...अशी आहे पालेभाज्यांची शेती
पालक व मेथी ही जवळकर कुटुंबाची सातत्याने घेतील जाणारी पिके आहेत. वीस गुंठे ते एक एकर या प्रमाणात ती असतात. जमीन हलकी असल्याने वाफसा लवकर मिळतो. ज्याचा पिकाला चांगला फायदा होतो.
पालक हे सुमारे सव्वा महिन्याचे पीक आहे. एका हंगामातील काढणी पूर्ण झाल्यानंतर नांगरट करून वाफे किॆवा पट्टा पद्धतीने पुढील हंगामातील उत्पादनासाठी पालकाचे पीक लागवडीसाठी सज्ज होते. वर्षभरात सुमारे सात ते आठ वेळा हे पीक घेण्यात येते. प्रति हंगामात २० गुंठ्यांत पाच हजार ते सहा हजार गड्ड्या मिळतात.
वर्षभराचा विचार केल्यास प्रति गड्डी दोन ते सहा रुपये त्यास दर मिळतो. उन्हाळ्यात गड्डीचा दर १० रुपयांपर्यंतही पोहोचतो. मेथी हे सुमारे २२ दिवसांचे पीक आहे. प्रति २० गुंठ्यांत सुमारे चार हजार गड्ड्या मिळतात. प्रति गड्डी सहा ते सात रुपये दर मिळतो. या पिकाचेही वर्षभरात चार ते पाच वेळा उत्पादन घेण्यात येते. मेथीला स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्यात येते.
काढणी, विक्री नियोजन
बाजारात ताज्या, हिरवेगार पालकाला अधिक दर मिळतो. वाहतुकीत खराब होऊ नये म्हणून ५० गड्ड्यांचे पोटल बांधले जाते. चारचाकी गाडीत व्यवस्थितरीत्या ठेवून ते विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जाते. त्यासाठी वेळेचे अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करावे. किमान चार ते पाच तासांत त्याचे व्यवस्थापन होते.
कारण वेळेत माल न गेल्यास मालाचे मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे गाडीचालकांनाही तशा वारंवार सूचना केल्या जातात. पुणे गुलटेकडी, हडपसरचे शाहूवाडी व जागेवर असे मार्केट अभिषेक यांना मिळते. काही व्यापारी मोबाईइल, मेल इ. द्वारेही ऑर्डर देतात.
उन्हाळ्यात अन्य ठिकाणांहून आवक कमी असल्याने या पालेभाज्यांना मागणी व दर चांगले असतात. पावसाळा आणि हिवाळ्यात पिकाला पोषक वातावरण असले, तरी उत्पादनात वाढ होते. त्या वेळी दरांत घट होत असल्याने काही वेळा परवडत नसल्याचीही स्थिती असते. त्यावर मात करण्यासाठी अभिषेक पुण्यात विक्री न करता मुंबईत व्यापाऱ्यांमार्फत विक्री करतात.
अर्थकारण, प्रगती
अभिषेक सांगतात, की पालकाचे प्रातिनिधिक उदाहरण घेतल्यास प्रति हंगामात ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. एकरी दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. वर्षभरात सात ते आठ अशा उत्पादनांतून काही लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या पिकांमध्ये सातत्य व ‘रोटेशन’ ठेवल्याने एका हंगामातील कमी दराचे नुकसान पुढील काळात चढ्या दरांमधून भरून काढता येते.
याच पालेभाज्यांनी आमचे अर्थकारण उंचावले आहे. पूर्वी साध्या घरात राहायचो. आता चांगला बंगला बांधला असून घरासमोर दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर आदी वाहने उभी असतात. आता दोन एकरांत केसर आंब्याची, तर १० गुंठ्यांत पपईची लागवड केली आहे.
घरच्या आर्थिक प्रगतीसोबत पालेभाजी शेतीच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना देखील जवळकर कुटुंबाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रति मजुराला प्रति दिन २५० ते ४०० रुपये वेतन मिळत असल्याने अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो आहे.
अभिषेक जवळकर ७३०४७०५७५७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.