Vegetable Farming : भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम करणारे काढणीपूर्व घटक

Article by Yogesh Bhagure : भाजीपाल्यामध्ये उपलब्ध जीवनसत्त्वे, प्रथिने, कर्बोदके इ. यामुळे मानवी आहारामध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्याची कमी अधिक उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनाही कमी कालावधीची, हंगामी भाजीपाला पिके अनेक अर्थाने फायदेशीर ठरत आहेत.
Agriculture
Agriculture Agrowon

Vegetable Farming Management : भाजीपाल्यामध्ये उपलब्ध जीवनसत्त्वे, प्रथिने, कर्बोदके इ. यामुळे मानवी आहारामध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्याची कमी अधिक उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनाही कमी कालावधीची, हंगामी भाजीपाला पिके अनेक अर्थाने फायदेशीर ठरत आहेत.

या पिकांचा उत्पादनखर्चही तुलनेने कमी असून, देशांतर्गत आणि निर्यातीसाठी वाढत असलेली मागणी यामुळे उत्पन्नाचीही बऱ्यापैकी हमी देणारी ठरत आहेत. म्हणूनच भाजीपाला उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.

भारतासारख्या उष्णकटिबंधीय आणि विकसनशील देशामध्ये भाज्यांचे उत्पादन जास्त असले तरी त्यांची कमी टिकवणक्षमता ही मोठी समस्या बनत आहे. भाज्या लवकर खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीनंतर मिळेल त्या दरामध्ये विक्री कराव्या लागतात. बाजाराच्या चढ उताराचा अनेक वेळा त्यांना मोठा फटका बसतो. पिकांच्या टिकवण क्षमतेचा विचार करताना सामान्यतः आपल्याला पीक काढणीनंतरच्या प्रक्रिया डोळ्यासमोर येतात.

उदा. स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक, प्रक्रिया इ. घटक भाज्यांच्या टिकवणक्षमतेसाठी महत्त्वाचे आहेत. पण काढणीपश्चात घटकातील अनेक घटक आपल्या शेतकऱ्यांच्या हाताबाहेरचे आहेत. मात्र काढणीपूर्व स्थितीमध्ये काही घटक शेतीमालाच्या टिकवणक्षमतेवर परिणाम करत असतात. त्यावर पिकाच्या व्यवस्थापनादरम्यान लक्ष दिल्यास टिकवणक्षमता काही प्रमाणात वाढवून संभाव्य नुकसान कमी ठेवणे शक्य असते.

टिकवणक्षमतेवर परिणाम करणारे काढणीपूर्व घटक

यामध्ये प्रामुख्याने जमीन, लागवड केलेला वाण, वातावरणीय घटक, सिंचनाची सुविधा व सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता, खते, काढणीची अवस्था व पद्धत, रोग व कीड व्यवस्थापन यांचा समावेश होतो.

जमीन

भाजीपाला पिकांच्या टिकवण क्षमतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन होय. जमिनीच्या प्रकारानुसार टिकवण क्षमता बदलत असते. काळी ते मध्यम अशी सुपीक व पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असल्यास त्यात घेतलेली भाजीपाला उत्पादनाची टिकवणक्षमता ही हलक्या मुरमाड जमिनीपेक्षा जास्त असते. मातीमध्ये असलेल्या अपायकारक बुरशींचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा पिकांच्या साठवणूक क्षमतेवर परिणाम होतो. भाजीपाला लागवड करताना योग्य जमिनीची निवड महत्त्वाची ठरते.

Agriculture
Turmeric Farming : युवकाने विकसित केले हळदीचे दर्जेदार वाण

हवामान घटक

अ) तापमान : उष्ण व थंड अशा दोन्ही तापमानाचा भाजीपाल्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. कमी तापमानामुळे भाजीपाला पिकांच्या शरीरशास्रीय हालचाली संथ होऊन परिपक्वतेला उशीर होतो. त्यामुळे टिकवण क्षमता कमी होते. अधिक तापमानामुळे परिपक्वता लवकर येऊन टिकवण क्षमता कमी होते. काढणीवेळी जास्त तापमान असल्यास श्वासोच्छवासाचा वेग वाढतो. त्याचा टिकवण क्षमतेवर परिणाम होतो. एकदम कमी तापमान राहिले किंवा २७ अंशापेक्षा अधिक तापमान राहिल्यास टोमॅटोला सामान्य रंग येण्यात अडचणी येतात. त्या त्या हंगामातील पीक त्या हंगामात घ्यावे. त्यांची लागवड योग्य वेळी करावी. म्हणजे व्यवस्थापन आणि काढणीचा कालावधी अपेक्षित तापमानाच्या स्थितीमध्ये येईल. त्यातून उत्पादनाची टिकवणक्षमता वाढू शकते.

ब) वारा : जोराच्या वाऱ्यासोबत मातीचे कण येतात. पीकवाढीच्या काळात जोराच्या वाऱ्यामुळे झाडाची पाने फाटणे, मुख्य खोड किंवा फांद्या वाकणे, तुटणे असे परिणाम दिसून येतात. पाने फाटल्यामुळे प्रकाश संश्लेषणाच्या क्षमता कमी होते. परिणामी झाडाची अन्न निर्मितीची क्षमताच कमी होते. तसेच वाऱ्यासोबत आलेले मातीचे कण पाने व फळांवर आदळून पाने, फळे यांना इजा होते. इजेमधून सूक्ष्मजीवांचा शिरकाव होऊन रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. भाजीपाल्याची टिकवण क्षमता कमी होते.

क) पाऊस : टोमॅटो, ढोबळी मिरची, खरबूज, टरबूज इ. पिकांच्या फळवाढीच्या काळात मोठा पाऊस झाल्यास फळ तडकण्याचे प्रमाण वाढते. पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्यास पालेभाज्यांची गुणवत्ता घसरते. अशा भिजलेल्या भाज्या लवकर खराब होतात.

वाणांची निवड

भाजीपाला पिकांचे विशिष्ट वाण विशिष्ट हंगामासाठी शिफारस केलेले असतात. काही वाणांचा शिफारस ही केवळ काही प्रदेशांसाठीच असते. पण त्याचा विचार न करता शेतकरी शिफारस न केलेल्या हंगामातील लागवडीसाठी अशा वाणांचा वापर करतात. प्रतिकूल हवामानामुळे पिकाच्या वाढीवर, परिपक्वतेवर परिणाम होतो. एकूणच पिकाचा दर्जा खालावतो. उत्पादनाची टिकवण क्षमता कमी होते. आपण कशासाठी उत्पादन घेणार आहोत, त्यानुसार वाणांची निवड केली पाहिजे.

उदा. चिप्स करण्यासाठी बटाटा लागवड करणार असू, तर त्यासाठी खास जाती उपलब्ध आहेत. त्यांचाच वापर करावा. उदा. कुफरी चिप्सोना. जर टोमॅटो दूरवरच्या बाजारपेठेत पाठवण्याचे आपले नियोजन असेल, त्यासाठी फुले राजा हे टोमॅटोचे वाण फायदेशीर ठरते. वाणांची पक्वता गाठण्याच्या काळानुसारही वाणांची निवड करावा. काही वाण लवकर परिपक्व होतात, व काही वाण उशिरा परिपक्व होतात. जर लागवडीला उशीर होत असेल, तर अशा वेळी लवकर परिपक्व होणारे वाण फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे मोठे नुकसान टळते. हंगाम, लागवडीचा उद्देश व कालावधी यांचा विचार करूनच वाणांची निवड करावी.

Agriculture
Vegetable Farming : कारले शेतीत संपादन केली ‘मास्टरी’

समतोल अन्नद्रव्याचा अभाव

पिकाला संतुलित व शिफारशीनुसार खते देणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादन वाढीसोबत काढणीनंतरच्या टिकवणक्षमतेसाठी महत्त्वाचा असतो. अन्नद्रव्यांची कमतरता, असमतोल आणि अयोग्य वेळी केलेली अयोग्य खतांचा वापर अशा व्यवस्थापनातील त्रुटीमुळे भाजीपाला पिकांची टिकवण क्षमता कमी होते.

विशेषतः नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त व उशिरा वापर केल्यास कांद्याची साठवण क्षमता कमी होते. चांगल्या दर्जेदार उत्पादनासाठी मातीपरीक्षणानुसार पिकास मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये समतोल पद्धतीने द्यावीत. सोबतच चांगले कुजलेले शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत यांचाही वापर करावा. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अधिक असल्यास पिकांचे दर्जेदार उत्पादन मिळते. त्याची टिकवण क्षमता वाढत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

सिंचनाचे अयोग्य नियोजन अन् पाण्याचा खराब दर्जा

पीक अवस्थेनुसार योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करावा. ‍गरजेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी दिल्यास पिकाच्या वाढीवर / परिपक्वतेवर परिणाम होतो. शेतीमालाचे काढणीपश्चात आयुष्य कमी होते. कांदा, बटाटा, गाजर इ. पिकांची काढणी करण्याआधी जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० ते १२ दिवस पाणी बंद करावे. जमीन कायम वापसा स्थितीत राहील, अशा प्रकारे सिंचनाचे नियोजन करावे. शेतात पाणी साचू देऊ नये. पाणी बचतीसाठी आणि योग्य प्रमाणातच पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती उपयुक्त ठरते.

सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता हाही महत्त्वाचा विषय आहे. नद्या, ओढे, जलाशये यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आणि शहरांचे सांडपाणी सोडले जात आहे. अशा प्रदूषित पाण्याचा वापर सिंचनासाठी केल्यास ते सर्व घटक खाद्य भागांमध्ये येऊन आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. त्याच प्रमाणे रसायनांचा ताण पिकावर येऊन, त्यांची गुणवत्ता आणि काढणीपश्चात आयुष्य बाधित होते. योग्य गुणवत्तेचे पाणी सिंचनासाठी वापरावे.

पीक संजीवकांचा अभाव

वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळी संप्रेरके वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही कारणाने (उदा. हवामान घटक, व्यवस्थापनाचे घटक इ.) बाधा आल्यास त्याचा भाज्यांच्या टिकवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे केलेला सायटोकायनिनयुक्त संजीवकांचा वापर फळभाज्यांची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

कीड व रोग व्यवस्थापन

पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास भाजीपाल्यामध्ये रासायनिक घटकांचे अंश राहण्याची समस्या कमी होते. तसेच त्यांचे काढणीपश्चात आयुष्य वाढू शकते. कीड- रोग यांच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ, पोषण, परिपक्वता इ. बाबीवर विपरीत परिणाम होऊन टिकवणक्षमता कमी होते. उदा. कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असल्यास असा कांदा साठवणुकीदरम्यान सडण्याचे प्रमाण वाढते.

काढणीची योग्य अवस्था व पद्धत

पिकाची काढणी योग्य परिपक्वता आलेल्या अवस्थेत केली पाहिजे. योग्य परिपक्वतेच्या आधी किंवा उशिरा काढणी केल्यास भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात आयुष्य कमी होते. भाजीपाल्याची काढणी करताना झाडाला फारशी इजा होणार नाही, अशा प्रकारे कमीत कमी हाताळणीद्वारे करावी. काढणीनंतर शेतीमाल त्वरित सावलीत आणावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com