Vegetable Farming : भाजीपाला लागवडीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

Vegetable Crops : लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) येथील वर्षा नितीन काळभोर यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन तीन एकरांत वर्षभर विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. दर्जेदार भाजीपाला तसेच थेट विक्रीच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित आर्थिक नफा मिळत आहे.
Varsha Nitin Kalbhor and Farm
Varsha Nitin Kalbhor and FarmAgrowon
Published on
Updated on

Planning of Cultivation of Vegetable Crops : पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी काळभोर गावामध्ये मागील सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा परिस्थितीतही या गावातील प्रयोगशील महिला शेतकरी वर्षा नितीन काळभोर यांनी गेल्या दहा वर्षांपासून हंगामनिहाय भाजीपाला लागवडीचे योग्य नियोजन केले आहे.

त्यांच्याकडे एकूण आठ एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकरात विविध भाजीपाला पिके आहेत. यामध्ये सध्या प्रामुख्याने मिरची वीस गुंठे, चवळी ४० गुंठे, कोथिंबीर २० गुंठे अशी लागवड आहे. त्यांच्या माहेरी शेती असल्याने त्यांना विविध पीक पद्धतीचे नियोजन माहिती होते. त्यांचा अवलंब त्यांनी तीन एकर भाजीपाला पिकांच्या नियोजनासाठी चांगल्या पद्धतीने केला आहे. पुणे बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वर्षा काळभोर यांनी हंगामानुसार भाजीपाला, फळभाज्यांची लागवड आणि विक्रीचे गणित चांगल्याप्रकारे बसविले आहे.

लागवडीचे नियोजन

वर्षा काळभोर यांनी भाजीपाला लागवडीसाठी तीन एकरामध्ये योग्य नियोजन केले आहे. शेण खत, सेंद्रिय खताच्या पुरेशा उपलब्धतेसाठी त्यांनी गोपालन केले आहे. सध्या त्यांच्याकडे दोन गाई असून, त्यापासून मिळणारे शेण, गोमूत्र यांचा वापर जमीन सुपीकतेसाठी केला जातो.

पहिल्या टप्यात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी पीक पद्धती निश्चित केली. टप्याटप्याने भाजीपाल्याची मागणी वाढत गेल्याने दहा गुंठे, वीस गुंठे, त्यानंतर एक एकरावर भाजीपाला लागवड करून उत्पादन घेण्यास सुरवात केली. आता वर्षभर तीन एकर क्षेत्रावर हंगामनिहाय विविध भाजीपाला तसेच फुलपिकांची लागवड असते.

Varsha Nitin Kalbhor and Farm
Vegetable Farming Success Story : भाजीपाला पिकांनी उंचावले दानापूरचे अर्थकारण

शहरी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन भाजीपाला लागवडीचे नियोजन असते. सध्या पालक, कोथिंबीर, शेपू, मेथी, चवळी, राजगिरा, चुका, मुळा, बीट, गाजर याचबरोबरीने मिरची, दुधी भोपळा, काकडी या पिकांची लागवड आहे.

गादीवाफ्यावर टप्याटप्याने भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे बाजारपेठेच्या मागणीनुसार भाजीपाला काढणी करता येते. फारसे नुकसान होत नाही. भाजीपाला पिकांच्या व्यवस्थापनात वर्षाताईंना पती नितीन तसेच सासरे चंद्रकांत, सासू नर्मदा यांची मदत होते.

ठिबक,आच्छादन तंत्राचा वापर

भाजीपाला पिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी गादीवाफ्यावर आच्छादन तंत्राचा वापर केला जातो. गादीवाफ्यामध्ये सेंद्रिय खते चांगल्या प्रकारे मिसळली जातात. त्यानंतर गादीवाफ्यावर ठिबक सिंचनासाठी लॅटरल अंथरून त्यावर प्लॅस्टिक आच्छादन केले जाते. आच्छादनाला शिफारशीत अंतराने छिद्रे पाडून विविध प्रकाराच्या भाजीपाला पिकांचे बियाणे किंवा रोपांची लागवड केली जाते.

गादीवाफा आणि आच्छादनामुळे रोपांची जोमदार वाढ होऊन उत्पादन चांगले येते. तणांचे चांगले नियंत्रण होते. जमिनीत वाफसा टिकून रहातो. भाजीपाला पिकांना योग्य प्रकारे पाण्याची उपलब्धता होण्यासाठी गरजेनुसार ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचनाचा अवलंब काळभोर यांनी केला आहे. पालेभाज्यांची लागवड वाफ्यामध्ये न घेता गादीवाफ्यावर केल्याने दर्जेदार उत्पादन मिळते असा त्यांचा अनुभव आहे. आधुनिक सिंचन पद्धतीमुळे पाण्याची चांगली बचत होत आहे.

Varsha Nitin Kalbhor and Farm
Vegetable Farming : हंगामी भाजीपाला, फळपिकांतून मिळवले आर्थिक स्थैर्य

ग्रेडिंग, पॅकिंगवर भर

पुणे बाजारपेठेतील भाजीपाला दराचा सातत्याने अंदाज घेऊन त्यानुसारच विविध भाजीपाला पिकांची काढणी केली जाते. सकाळी सात ते अकरा, संध्याकाळी तीन ते सात या वेळेत भाजीपाल्याची काढणी केली जाते.

भाजीपाल्याची काढणी केल्यानंतर त्यांची आकार आणि गुणवत्तेनुसार प्रतवारी केली जाते. त्यानंतर मागणीनुसार प्लॅस्टिक क्रेट किंवा पिशव्यांमध्ये पॅकिंग केले जाते. साधारणपणे दहा ते वीस किलो दरम्यान भाजीपाला पॅकिंग केले जाते. यामुळे भाजीपाल्याचे नुकसान कमी होते, असा त्यांचा अनुभव आहे. प्रतवारी आणि पॅकिंगनंतर भाजीपाल्यांची विक्री गुलटेकडी मार्केट, शेवाळवाडी-हडपसर येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.

याशिवाय काही व्यापारी शेतावर येऊन भाजीपाल्यांची थेट खरेदी करतात. सध्या दररोज ५०० ते एक हजार गड्डी पालेभाज्या तसेच ५० ते १०० किलो फळभाज्यांची विक्री होते. सध्या दहा किलो मिरची ६०० रुपये, दुधीभोपळा, काकडी ५०० रुपये या दराने विक्री केली जाते. भाजीपाला विक्रीतून त्यांना दर महिना व्यवस्थापन खर्च वजा जाता सरासरी २० ते २५ हजारांची मिळकत होते. बाजारपेठेतील आवकेनुसार दरामध्ये चढ उतार होत असतात. परंतु प्रतवारी आणि भाजीपाल्याच्या दर्जामुळे वर्षाताईंना अपेक्षित दर मिळविण्यात यश आले आहे.

बचत गटातून तंत्रज्ञान प्रसार

वर्षा काळभोर या राजनंदिनी शेतकरी महिला गटामध्ये कार्यरत आहेत. या गटामध्ये २० महिला शेतकरी असून दर महिना ५०० रुपयांची बचत केली जाते. दर महिन्याला गटाची बैठक होते. यामध्ये शेती आणि पूरक उद्योगाबाबत चर्चा केली जाते.

काहीवेळा शिवारफेरीचे आयोजन केले जाते. गटाच्या माध्यमातून शेती आणि पशुपालनातील नवीन तंत्रज्ञानाच्या प्रसारावर भर देण्यात आला आहे. गरजेनुसार गटामार्फत महिलांसाठी प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.

वर्षा काळभोर, ९५६१३०३७३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com