Coconut Processing : नारळाच्या काथ्यापासून पर्यावरणपूरक उत्पादने

Coconut Products : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील हर्षवर्धन बोरवडेकर या २८ वर्षे वयाच्या युवकाने नारळ सोडणापासून काथ्या व त्यापासून जीवनावश्‍यक उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्याद्वारे प्लॅस्टिकच्या वापराला पर्याय शोधला असून, या पर्यावरणपूरक उत्पादनांना देशभर बाजारपेठ मिळविली आहे.
Coconut Processing
Coconut ProcessingAgrowon
Published on
Updated on

एकनाथ पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील हर्षवर्धन बोरवडेकर या २८ वर्षे वयाच्या युवकाने नारळ सोडणापासून काथ्या व त्यापासून जीवनावश्‍यक उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्याद्वारे प्लॅस्टिकच्या वापराला पर्याय शोधला असून, या पर्यावरणपूरक उत्पादनांना देशभर बाजारपेठ मिळविली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हे मूळ गाव असलेले हर्षवर्धन बोरवडेकर (वय २८) यांचे कुटुंब पिंगुळी (ता. कुडाळ) येथे राहते. म्हैसूर येथून ‘बिझनेस मॅनेजमेंट’ विषयात त्यांनी पदवी घेतली. शिक्षण घेत असतानाच नोकरी न करता स्वतःचा उद्योग उभारायचा असा संकल्प केला होता. मात्र तो चाकोरीबद्ध असण्यापेक्षा त्यात वेगळेपणा असावा असा विचार मनात होता. त्यामुळे पदवीच्या अखेरच्या वर्षात असतानाच पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. अभ्यासांती नारळाच्या सोडणांवर कमी प्रमाणात प्रकिया होते हे निर्दशनास आले. अलीकडील काळात प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करण्यासंबंधी सर्वत्र जागृती केली जात आहे. नारळाच्या सोडणांपासून काथ्या व त्यापासून जीवनावश्‍यक उत्पादने तयार केल्यास प्लॅस्टिक उत्पादनांना तो चांगला पर्याय तयार होईल असे हर्षवर्धन यांना वाटले.

Coconut Processing
Coconut Oil Benefits : नारळाच्या तेलाला आयुर्वेदात एवढं का महत्व?

उद्योगाचा प्रारंभ

केरळ काथ्या उद्योगात अग्रेसर असून काथ्यापासून ४०० हून अधिक उत्पादनांची निर्मिती करता येते
याची माहिती मिळाली. इथेच व्यवसायाची दिशा पक्की झाली. त्यानुसार केरळ राज्यातील अलेप्पी येथे एका संस्थेत एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. तेथे कोकोपीट, जिओ टेक्स्टाइल (भूवस्त्र) आदी उत्पादने तयार करण्यास हर्षवर्धन शिकले. सन २०१७ च्या दरम्यान पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडे काथ्या उद्योगाचा प्रस्ताव दिला. कुडाळ ‘एमआयडीसी’ येथे भूखंडासाठी अर्ज दाखल केला. शेड उभारणी, आवश्यक यंत्रसामग्रीसाठीही नोंदणी केली. अशा रीतीने उद्योगाचा ‘सेटअप’ तयार झाला आणि उद्योगाला प्रारंभ झाला.

Coconut Processing
Coconut Rate : उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नारळाच्या करवंटीचा उद्योग पूरक ठरला| ॲग्रोवन

उद्योगाचा विस्तार

उद्योगाच्या उभारणीसाठी २०१८ मध्ये २५ लाख रुपये कर्ज घेतले. या कर्जाच्या ३५ टक्के अनुदान पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत प्राप्त झाले. सुरुवातीला यंत्रमागाचे एक युनिट आणि पूरक यंत्रसामग्री खरेदी केली. सुमारे २१०० चौरस फूट आकाराच्या शेडची उभारणी केली. एकेक अनुभव घेत सुरुवातीला मोजक्या उत्पादनांची निर्मिती केली. त्यामध्ये जम बसू लागला व बाजारपेठांचा आत्मविश्‍वासही येऊ लागला. सोडण्यापासून काथ्या व त्यापासून विविध उत्पादने निर्मिती या प्रक्रियेत कमी वेळेत अधिक कार्यक्षम काम होण्याच्या दृष्टीने २०२२ मध्ये स्वयंचलित युनिट स्वखर्चाने खरेदी केले. त्यासाठी शेडचा आकार एक हजार चौरस फुटाने वाढविला. आज तीन स्वयंचलित यंत्रे बसविली आहेत. त्यासाठी १४ लाख रुपये खर्च आला. एकावेळी एक व्यक्ती दोन यंत्रे चालवू शकते.

आजचा उद्योग दृष्टिक्षेपात

-आज सुमारे सहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. सिंधू क्वायर इंडस्ट्रीज या नावाने उद्योग आहे.
हर्षवर्धन यांना वडिलांसह आई शैलजा यांचीही उद्योगात मदत होते.
-वर्षभरात होते ३०० टन नारळ सोडणांवर प्रकिया. त्यासाठी स्थानिक नारळ उत्पादक व काही व्यापाऱ्यांकडून प्रति किलो दोन ते तीन
रुपयांनी सोडणे खरेदी केली जातात.
-त्यापासून तयार होतात विविध उत्पादने. उदा. १८० टन कोकोपीट, ४० टन काथ्याची दोरी, ८० टन पायपुसणी, कुंड्या, हस्तकलेच्या शोभिवंत वस्तू व जमिनीची धूप थांबविण्यासाठीचे जिओ टेक्स्टाइल. (भूवस्त्र)

-कोकोपीटची प्रति किलो पाच रुपये, दोरी ६० रुपये (प्रति किलो), पायपुसणी प्रतिनग १५० ते ५०० रुपये असे दर आहेत.
-उद्योगात चार ते पाच जणांना मिळाला कायमस्वरूपी रोजगार. यातील महिलांना त्यांच्या घरीच यंत्र दिले आहे. त्यांच्याकडून हस्तकलेच्या विविध वस्तू बनवून घेतल्या जातात.
-नव उद्योजकांनाही येथे प्रशिक्षण दिले जाते. अशा अनेक इच्छुक व्यक्ती येथे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात.
.
व्यवसायाचा आलेख

वर्ष वार्षिक उलाढाल रुपये
२०२१-२२ – १४ लाख
सन २०२२-२३ – १९ लाख
सन २०२३-२४ – २९ लाख

उत्पादनांचे ‘प्रमोशन’ (इन्फो)

उत्पादनांना बाजारपेठ मिळविण्यासाठी हर्षवर्धन यांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. त्यासाठी विविध प्रदर्शनांमधून भाग घेण्यास सुरुवात झाली. नवी दिल्ली येथे ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रेड सेंटर’ येथे
भारतातील मोठे प्रदर्शन दरवर्षी भरते. येथे हर्षवर्धन आपला स्टॉल घेतात. यंदाही १४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत हे प्रदर्शन झाले. मुंबई येथील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’, क्वायर बोर्ड तसेच देशभरात ज्या ज्या ठिकाणी हस्तकलेच्या संदर्भाने प्रदर्शने भरतात त्या त्या ठिकाणी उत्पादने सादर करून त्यांचे प्रमोशन केले जाते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा, मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर यासह अन्य शहरांमध्ये उत्पादनांना बाजारपेठ तयार केली आहे.

नावीन्यपूर्ण उत्पादने (इन्फो)

अलीकडे फुलझाडांसाठी प्लॅस्टिक कुंड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याला पर्यावरणपूरक पर्याय देण्याच्या हेतूने हर्षवर्धन यांनी काथ्यापासून कुंडी बनविण्याचा संकल्प केला. सुरुवातीला काही कुंड्या केरळहून आणून विक्री केल्या. आता स्वतःच्याच युनिटमध्ये त्यांची निर्मिती केली जाते. त्यामध्ये उत्तम पद्धतीने रोपलागवड करता येते. या कुंड्यांना मागणी वाढू लागली आहे. भेटवस्तू म्हणूनही त्यांचा वापर वाढला आहे. हर्षवर्धन विविध प्रयोग करीत असतात. त्यांनी मालवणी भाषेत मजकूर असलेले मॅट्‍स बनविले आहेत. त्यावर ‘पाय फुसान येवा, कुत्रो आसा आमचो, पायतान भायर’ असा मालवणी भाषेतील मजकूर आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या मॅट्‍सचा वापर होऊ लागला आहे.

गौरव

सन २०२२ मध्ये सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाकडून हर्षवर्धन यांना सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून २०२४ चा जिल्हा उद्योग पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हर्षवर्धन बोरवडेकर, ८६००७३०६२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com