
Eco-friendly House Update : मूळचे चंद्रपूर येथील उमाकांत निखारे हे नाशिक औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून ‘मुख्य अभियंता’ म्हणून २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर नाशिक शहरात स्थिरावले. शासकीय सेवेत कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जपताना पर्यावरण, ऊर्जा व जल संवर्धन क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.
हाच आदर्श आपल्या आयुष्यातही ठेवताना त्यांनी आपल्या घराची वास्तूही पर्यावरणपूरक बनविली आहे. त्यास वृदांवन असे नाव दिले आहे. यात ऊर्जा, जलसंवर्धन, पुनर्वापर व पुनर्भरण, सदैव वायुविजन, शून्य कचरा व्यवस्थापन या बाबींचा आधार घेत अद्ययावत उपकरणांचा वापर केला आहे.
यात स्थापत्य, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, संगणक, पर्यावरण व कृषी अशा अभियांत्रिकीतील विविध शाखांचा समावेश आहे. त्यामुळे शहरी भागातही पर्यावरण संवर्धन करताना राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास कमी करून श्रम, पैसा यांची बचत करून आरोग्यसंपन्न जीवन जगता येत याचा आदर्शच निखारे यांनी तयार केला आहे.
सौरऊर्जा निर्मिती
निखारे पूर्वी औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रात अभियंता पदावर अनेक वर्ष कार्यरत राहिले. त्यामुळे कोळसा जाळून होणाऱ्या वीज निर्मितीमुळे प्रदूषण होते ही बाजू विचारात घेत त्यांनी घराच्या छतावर सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित केलेले आहे. त्यातून वर्षभर २४ तास गरजेनुसार घरगुती कारणासाठी वीज वापर शक्य होतो.
अतिरिक्त ऊर्जा बॅटरीत संचयित केली जाते. यातून वापर होऊन शिल्लक असलेली वीज महावितरणाला पुरविली जाते. त्यातून आर्थिक वर्षाच्या अखेरीस महावितरणकडून काही अंशी आर्थिक परतावा मिळतो.
गेल्या काही महिन्यांपासून महावितरण वीजबिलाच्या पोटी १२६ रुपये इतका स्थिर आकार आहे. ‘तीन किलोवॉट क्षमतेच्या ‘हायब्रीड’ सोलर सिस्टिम’द्वारे स्वच्छ सूर्यप्रकाशात सरासरी १५ युनिट वीजनिर्मिती दररोज तयार होते.
अचूक पाणी वापर
महापालिकेच्या पाण्याचा स्वयंपाक, स्नान आदींसाठी तर कूपनलिकेच्या पाण्याचा वापर स्वच्छतागृहे परसबाग, झाडे यांच्यासाठी होतो. शिवाय बसविलेल्या ‘ग्रे वॉटर सिस्टिम’द्वारे पाण्याचा पुनर्वापर बगीच्या साठी होतो.
तळमजला, पहिला मजला व घरातील छतावर पाणी वितरण करण्यासाठी वेगवेगळी पाइपलाइन जोडणी केली आहे. महापालिका, ‘ग्रे वॉटर सिस्टिम’ व कूपनलिका यांचे शुद्ध पाणी साठविण्यासाठी स्वतंत्र वेगवेगळ्या टाक्या तयार केल्या आहेत.
त्या उंचावर असल्याने ‘ग्रॅव्हिटी’ तत्त्वावर पाणी खाली येते. शिवाय टाक्यांसाठी ‘कंट्रोलर’ व ‘लेव्हल सेन्सर’ उपकरणांचा वापर केल्याने पाण्याची पातळी योग्य राखली जाते. पाणी पंप सुरू असताना पाणी व विजेची बचत होते.
सांडपाण्यावर प्रक्रिया, पुनर्वापर
टाकाऊ पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर घरातील बाह्य भाग स्वच्छ करण्यासाठी तसेच परसबागातील झाडांसाठी होतो. प्रक्रियेसाठी ‘ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट’ बसविला असून, फॉग फिल्टर टॅंक, एरिएटर टॅंक, फिल्टर टॅंक व क्लीन वॉटर टॅंक अशा चार टाक्यांची विभागणी आहे.
मुबलक ऑक्सिजन
शास्त्रीय पद्धतींचा अभ्यास करून रोपांची मांडणी केली आहे. तळमजल्यात घराच्या तिन्ही बाजूंना कुंड्यांमध्ये विविध फुलझाडे, प्रवेश करताना व पार्किंग भागामध्ये हवा शुद्ध करणारी झाडे तीनस्तरीय पद्धतीने आहेत. बाल्कनीत कायमस्वरूपी वाफ्यांची निर्मिती करून त्यात विविध देशी प्रजातीच्या वेली, फळझाडे व फुलझाडे लागवड आहे.
दर्शनी भागात विविध शोभेच्या झाडांच्या ‘हँगिंग’ कुंड्या लावल्या आहेत. टेरेसवर परसबागेच तयार करून फळे, फुलझाडे, पालेभाज्या व औषधी झाडांची लागवड केलेली आहे. त्यामुळे मुलबक ऑक्सिजन उपलब्ध होतो.
परसबागेतील उत्पादन
भाज्यांमध्ये पालक, कोथिंबीर, मेथी, कढीपत्ता, शेवगा, टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर, गिलके, वालपापडी, करांदा मटाळू, नागवेल, फळांमध्ये जांभूळ, चिकू, पेरू, आंबा, लिंबू, मसाल्यांमध्ये लवंग,अन्नपूर्णा, ऑल स्पाइस, आले, हळद, फुलांमध्ये गुलाब, जास्वंद, मोगरा, सदाफुली, सोनचाफा, सोनटक्का, कमळ, लिली, मधुकामिनी, मधुमालती, प्राजक्त आदी
कचरा व्यवस्थापनासाठी ‘सिक्स आर’ संकल्पना
- शहरी भागातील कचरा प्रामुख्याने महापालिकेच्या घंटागाडीत जातो. मात्र निखारे यांनी पुढील 6R पद्धतीचा अवलंब केला आहे.
Rethink: वस्तू घेतल्यानंतर उपयोग झाल्यावर पुढे काय करणार?
Refuse: उपयोग नाही अशा वस्तू घरी आणणे टाळले जाते.
Reduce: वस्तू एकदम जास्त विकत न घेता गरजेपुरतीच खरेदी.
Reuse: एखादी वस्तू आपल्या उपयोगाची नसेल, पण ती दुसऱ्याच्या उपयोगाची असू शकते. त्या वस्तूचा तसा पुनर्वापर करावा.
Recover/Repair: निकामी वस्तूची दुरुस्ती वा बदल करून त्यातून उपयोगाची वस्तू बनवू शकतो.
Recycle: पुनर्वापरासाठी त्या वस्तूवर प्रक्रिया. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी.
स्वयंपाक घरातील शिळे अन्न, खराब झालेला भाजीपाला- फळे, पालापाचोळा यांच्या वापरातून घरगुती पद्धतीने विनाखर्चिक गांडूळ खत तयार केले जाते. त्याला कुठला दुर्गंध येत नाही. घराच्या छतावर चार बाय चार फूट व दोन फूट उंचीच्या बॅगमध्ये पालापाचोळ्याचे रूपांतर गांडूळ खतात होते.
वास्तू उभारणीतील ठळक मुद्दे
-पावसाच्या पाण्याचे शंभर टक्के जल पुनर्भरण
-घराच्या वरील भागात टर्बो व्हेंटिलेटर. त्यामुळे घरात २४ तास खेळती, शुद्ध व थंड हवा.
-महावितरण व सौरऊर्जेचा इन्व्हर्टर अशा दोन भागांत वीजजोडणी.
-केंद्र सरकारच्या ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या मानकांप्रमाणे पंचतारांकित उपकरणांचा वापर.
-एलईडी दिव्यांचा वापर. काही दिव्यांमध्ये ‘इनबिल्ट मोशन सेन्सर’ असल्याने मानवी हालचालींवर ते सुरू किंवा बंद होतात. वायफाय स्विच बोर्ड.
-किमान वीजवापर करणाऱ्या तंत्रज्ञानावर पंखे चालवले जातात.
-स्वयंपाकासाठी सौरऊर्जेचा वापर. त्यामुळे महिन्याला लागणारा गॅस सिलिंडर तीन ते साडेतीन महिने पुरतो.
-स्वयंपाकासाठी इंडक्शन व इन्फ्रारेड कुकटॉप प्रकारातील उपकरणांचा उपयोग.
-सूर्यप्रकाशद्वारे पाणी तापविण्यासाठी ३०० लिटर प्रति दिन क्षमतेचे कार्यक्षम सौरबंब.
-झाडांसाठी स्वयंचलित सूक्ष्म सिंचन वितरण प्रणाली. झाडांच्या गरजेनुसार सिंचन, पाणी, श्रम व वेळेची बचत.
-प्रत्येक खोलीला दोन ते तीन खिडक्या. त्यामुळे मोकळा, स्वच्छ सूर्यप्रकाशय घरात हवा खेळती राहिल्याने नेहमी प्रसन्न वातावरण.
संपर्क : उमाकांत निखारे, ९८२२११५२९०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.