
Agriculture Success Story : आळंदा (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथील बाळकृष्ण सीताराम रामचवरे हे आरोग्य खात्यातील विस्तार अधिकारी पदावरून २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांची एके ठिकाणी सुमारे सव्वादोन एकर शेती आहे. पारंपरिक पिकांमधून उत्पादन फारसे मिळत नसल्याने नवे मात्र आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक घेण्याच्या उद्देशाने ते पर्यायी पीक शोधत होते.
त्यांचा मुलगा प्रसादने ‘एम फार्म’ची पदवी घेतली असून, तो ‘डॉक्टरेट’साठी प्रवेश परीक्षेची तयारी करतो आहे. लातूर येथे शिकवणीच्या उद्देशाने राहत असलेल्या त्याच्या पाहणीत मित्राची ड्रॅगन फ्रूट शेती आली. अधिक विचार व अभ्यास करून या पिकाचा प्रयोग करण्याविषयी त्याने वडिलांना सांगितले. एकमत झाल्यानंतर हे धाडस करण्यासाठी पुढे पाऊल टाकले.
सुरू झाली ड्रॅगन फ्रूटची शेती
सन २०२१ च्या जूनमध्ये सुमारे पावणेदोन एकरांत ड्रॅगन फ्रूटची लागवड झाली. त्यासाठी सोलापूर भागातून रोपे आणली. अकोला जिल्ह्यासाठी हे पीक नवेच होते. मात्र प्रसाद यांनी वेबसाइट, यू-ट्यूब व आशियातील काही शेतकऱ्यांसोबत चक्क सोशल मीडियाद्वारे चर्चा करून पिकाविषयी अधिक माहिती घेतली.
त्यानुसार व्यवस्थापन केले. अनुभवातूनही काही गोष्टी ते शिकले. पहिल्या वर्षी जुलै २०२१ च्या दरम्यान पहिले उत्पादन मिळाले. बराचसा माल नातेवाईक-परिचितांना वाटप करण्यातच संपला. जेमतेम आश्वासक उत्पन्न मिळाले.
परंतु पीक यशस्वी झाल्याचा हुरूप वाढला. मागील वर्षी उत्पन्नाचा आकडा १२ लाखांपर्यंत गेला. यंदाचा हंगाम ३० नोव्हेंबरला आटोपला. एकूण क्षेत्रातून सुमारे १४ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. मागील व त्या वर्षीही दोन ते तीन लाखांच्या रोपांची विक्री झाली आहे. विविध राज्यांतील शेतकरी रोपे घेऊन गेले आहेत.
जागेवरून विक्री केल्याचा फायदा
जागेवरून केलेल्या विक्रीचा सर्वांत मोठा फायदा झाला. अकोला-बार्शीटाकळी मार्गालगतच शेत असल्याने तेथेच ‘ड्रॅगन फ्रूट’ मांडून स्टॉल उभारला. या ठिकाणावरून ये जा करणारे प्रवासी, ग्राहक थेट खरेदी करतात. अशा रीतीने ३० ते ३५ टक्के माल जागेवरच विकला गेला. त्यास किलोला १६० ते २०० रुपये दर मिळवला.
दोन वर्षांपासून ही विक्री सुरू असल्याने नेहमीचे ग्राहक तयार झाले आहेत. अकोला, अमरावती, नागपूर, वाशीम, यवतमाळ आदी बाजारपेठांतही माल जातो. त्यात किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला आहे. हा मार्ग हैदराबादकडेही जातो. त्यामुळे ५-१० किलोच्या पेट्यांमधून तिकडेही माल घेऊन जाणारे ग्राहक आहेत.
लागवडीतील ठळक बाबी
जंबो रेड व सी हे दोन वाण. दोन्ही आतून व बाहेरून लाल. जंबो रेडला फळे तुलनेने कमी लागतात. पण वजन ९५० ग्रॅमपर्यंत मिळते. दुसऱ्या वाणाला फळे जास्त, वजन मात्र ६०० ग्रॅमपर्यंत.
लागवडीसाठी आवश्यक सिमेंटचे खांब, २० एमएम. जाडीचे लोखंडी रॉड, रोपे व अन्य सामग्री असा सुरुवातीला एकूण आठ ते साडेआठ लाखांपर्यंत खर्च. आता दरवर्षी सुमारे ४० हजारांपर्यंत उत्पादन खर्च.
प्रत्येकी दहा फुटांवर सिमेंट खांब. प्रत्येक खांबाला चार रोपे. मध्यभागीही खांब उभारून सघन पद्धतीने लागवड.
येलो वाणाची ५० रोपे व्हिएतनाम येथून मागवली आहेत. त्याचेही समाधानकारक उत्पादन मिळाले आहे.
या पिकाला पाणी खूप कमी लागते. हिवाळ्यात चार दिवसांतून, तर उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी व मेमध्ये एकवेळ पाणी देण्यात येते.
जमीन अति पावसात चिबडणारी. त्यात ड्रॅगन फ्रूट लावणे आव्हानात्मक होते. मात्र योग्य व्यवस्थापनातून तंत्र जमवले. गादीवाफ्यावर लागवड केल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली.
शेताला लागूनच भावाची रसवंती. त्यातील पाचटाचा खत म्हणून वापर. अधिकाधिक सेंद्रिय, जैविक घटकांचा वापर.
जुलै ते नोव्हेंबर हा काढणी हंगाम.
उष्ण तापमानावर पर्याय
अकोला जिल्ह्याचे तापमान उन्हाळ्यात ४५ अंशांच्या पुढे जाते. अशावेळी एप्रिल-मेमध्ये ड्रॅगन फ्रूट बागेत ग्रीननेटच्या पट्ट्यांचा वापर होतो. त्यातून तापमान नियंत्रित होते. दोन झाडांमध्ये ज्वारी, बाजरीसारखी उंच वाढणारी आंतरपिके घेतात. त्यामुळेही झाडांच्या दोन्ही बाजूंनी उष्ण झळांचा त्रास कमी होतो. आंतरपिकांतून थोडेफार उत्पादन मिळते.
मुलगा रमला प्रयोगात
एकीकडे ‘डॉक्टरेट’च्या प्रवेश परीक्षेची तयार करण्याबरोबर प्रसाद शेतीतील प्रयोगांमध्येही रमला आहे. ड्रॅगन फ्रूटच्या ‘मार्केटिंग’साठी त्याने या फळाचे महत्त्व सांगणारी माहितीपत्रके व व्हिजिटिंग कार्ड्स प्रसिद्ध केली. त्यातून ग्राहकांमध्ये जागरूकता व प्रसार होण्यास मदत झाली.
प्रसाद सांगतो की कमी पाण्यात व कमी देखभालीत येणारे ड्रॅगन फ्रूट हे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आश्वासक पीक आहे. त्याच्या बागेत भाजीपाला, सोयाबीन आदी पिके आम्ही घेतो. सेंद्रिय भाजीपाल्याची देखील जागेवरून विक्री होते. ड्रॅगन फ्रूट लागवडीतून शिल्लक राहिलेल्या क्षेत्रात यंदा पपई लागवड केली आहे. आतापर्यंत ४० हजारांची फळे विकली आहेत.
- प्रसाद रामचवरे, ७७१९९९६०२५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.